सलील उरुणकर
उद्योग-व्यवसाय करताना लवचिकता असणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे असते. ही लवचिकता केवळ आपल्या वर्तनातच नाही तर ग्राहकांना अपेक्षित असलेल्या उत्पादन किंवा सेवेतही ठेवावी लागते. उदाहरणार्थ अनेक मोठे उद्योग-व्यवसायांच्या ते सुरवातीच्या टप्प्यात देत असलेल्या सेवा किंवा निर्माण करीत असलेले उत्पादन आणि सध्या अस्तित्वात असलेल्या त्यांच्या सेवा किंवा उत्पादनामध्ये फरक दिसतो. एक जगप्रसिद्ध उदाहरण द्यायचे झाले तर ट्विटर (आताचे एक्स) या मायक्रोब्लॉलिंग प्लॅटफॉर्मचा जन्म मुळात एक साईड प्रोजेक्ट म्हणून झाला होता. २००५ मध्ये सुरू झालेल्या ओडिओ नावाच्या पॉडकास्टिंग कंपनीला अॅपल कंपनीच्या आयट्यून्स सेवेमुळे ‘पिव्होट’ करावे लागले. ऑडिओ कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत असलेल्या जॅक डॉरसे याची इन्स्टंट मेसेजिंग संकल्पना स्वीकारत ऑडिओच्या संस्थापकाने आपली मूळची पॉडकास्टिंगची व्यावसायिक सेवा व दिशा पूर्णतः बदलली.
पिव्होट म्हणजे नवउद्योजकाने आपल्या व्यावसायाच्या स्वरुपात केलेला धोरणात्मक व नियोजित बदल. स्टार्टअप कंपन्या जेव्हा सुरू होतात त्यावेळी त्या जुन्या व्यवसायपद्धती बदलून नव्या व्यवसायपद्धती बाजारात आणत असतात. बऱ्याचदा हा बदल करण्याच्या प्रयत्नात असताना ग्राहकवर्ग किंवा बाजारपेठेतील मानसिकता, त्यांची गरज, पसंती किंवा व्यावसायिक स्पर्धेचा अंदाज न आल्यामुळे नवउद्योजकांना अपयश येते. हे अपयश येऊ नये यासाठी आपल्या बिझनेस मॉडेलमध्येच बदल करण्याचा निर्णय काही नवउद्योजक घेतात. हा बदल जेव्हा सारासार विचार करून धोरणात्मक व नियोजनपूर्वक पद्धतीने केला असेल तर त्याला पिव्होट करणे असे म्हणतात. असे पिव्होट करताना पुन्हा आपल्या सेवा किंवा उत्पादनाला बाजारपेठेत नव्याने सादर करावे लागते. ते नवे उत्पादन किंवा सेवा बाजारपेठ व ग्राहकवर्गाला अनुकूल ठरले तर पिव्होटचा निर्णय यशस्वी झाला असे म्हणतात. त्यामुळे असा धोरणात्मक निर्णय घेणे वाटते तेवढे सोपे नसते.
हेही वाचा : Money Mantra: ‘ममाअर्थ’चा पब्लिक इश्यू खुला, जाणून घ्या याविषयी सर्वकाही
बास्केटबॉल खेळामध्ये परिस्थितीनुरूप एखाद्या खेळाडूकडून जागेवरच क्षणार्धात मात्र विचारपूर्वक बदलण्यात येणारी बॉलची दिशा याला पिव्होट असे संबोधले जात असत. त्याच संदर्भाने ‘दि लीन स्टार्टअप’ या पुस्तकातून एरिक रिझ यांनी पिव्होटची संकल्पना स्टार्टअप कंपन्यांच्या व्यवसायासंदर्भात सर्वप्रथम वापरली. हे पुस्तक लोकप्रिय होताच पिव्होट या शब्दाची आणि संकल्पनेची चर्चाही स्टार्टअप कंपन्या व नवउद्योजकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली. या पुस्तकातच पिव्होट कधी करायला पाहिजे याबाबत एक सूत्र दिले आहे. ते सूत्र म्हणजे व्यवसाय सुरू केल्यानंतर सातत्याने अभिप्राय घेत उत्पादन वा सेवेत सुधारणा करीत गेल्यास व त्यातून शिकत गेल्यास नवउद्योजकांना पिव्होट कधी करायचा किंवा आहे त्याच व्यवसाय स्वरुप आणि पद्धतीनुसार काम सुरू ठेवावे का याचे उत्तर मिळते.
हेही वाचा : Money Mantra : आर्थिक नियोजन – समज, गैरसमज आणि वास्तव
व्यवसाय करताना मर्यादित स्वरुपात प्रयोग केल्यास, फार नुकसान न होता, बाजारपेठेतून मिळणारा प्रतिसाद तपासता येतो. मात्र, प्रयोग करताना त्याच्या निष्कर्षांतून काही चुकीचे निर्णय घेतले गेल्यास, किंवा ते निर्णय घेताना घाई किंवा उशीर केल्यास नवउद्योजकांना फटका बसू शकतो. व्यवसायाची मूळ संकल्पना यशस्वी होत आहे किंवा नाही याबाबत ना अतिआत्मविश्वास चांगला ना संशयी वृत्ती चांगली. या व्यतिरिक्त स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य घटकांकडूनही निर्णयावर प्रभाव टाकला जाण्याची शक्यता असते. कधी कधी नवउद्योजकांना अयशस्वी होण्याची भीती सतावते आणि ते अवेविवेकी निर्णय घेतात. त्यामुळे पिव्होट कितीही आकर्षक वाटत असले तरी ते कधी आणि कसे करायचे याचे भान राखून प्रत्येकाने आपल्या व्यवसायाचा, कर्मचाऱ्यांचा, गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विचार करूनच घ्यावयाचा निर्णय आहे.