जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय याबाबत आपण आधीच्या लेखांमधून सविस्तर माहिती घेतली आहेच. पोर्टफोलिओचे परतावे हे त्याच्या बांधणी आणि जोखीम व्यवस्थापन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतात. “Do not keep all eggs in one basket” हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जोखीम व्यवस्थापन अगदी हेच आहे. आपले पैसे कुठल्या पर्यायामध्ये, कधी आणि किती असले पाहिजे याचे उत्तर पोर्टफोलिओ विविधीकरणामध्ये (पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन) मिळते.
विविधीकरण करताना तीन स्तरांवर काम करणे आवश्यक आहे – पहिला स्तर मालमत्ता वर्ग, दुसरा स्तर गुंतवणूक पर्याय आणि तिसरा स्तर गुंतवणूक योजना. मालमत्ता वर्ग म्हणजे समभाग, रोखे, स्थावर मालमत्ता, मौल्यवान धातू, इतर कमॉडिटीज, चलन, आणि रोकड. यांच्यातील प्रमाण ठरवून आपण मालमत्तेचे वर्गीकरण म्हणजेच ॲसेट ॲलोकेशन करतो. गुंतवणूक पर्याय म्हणजे – समभाग, समभाग संलग्न म्युच्युअल फंड योजना, मुदत ठेव, सरकारी व खासगी रोखे, रोखे संलग्न म्युच्युअल फंड, निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता, शेतजमीन, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्स), सोने, चांदी, सोने-चांदीसंलग्न म्युच्युअल फंड आणि ईटीएफ, इतर धातू, धान्य, तेल, ऊर्जा, अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पाउंड, चिनी युआन, जपानी येन, युरो, डेरिव्हेटिव्ह, पुरातन वस्तू, दुर्मीळ नाणी, पेंटिंग्स इत्यादी. गुंतवणूक योजना म्हणजे विशिष्ट गुंतवणूक – रिलायन्स कंपनीचा शेअर, स्टेट बँकेचा बॅलन्स्ड म्युच्युअल फंड, माइंडस्पेस रिट्स, मॉलमधला गाळा, हिरानंदानी इस्टेटमधील सदनिका, कोकणातील आंब्याची बाग, रिझर्व्ह बँकेने काढलेली स्मरणार्थ नाणी इत्यादी.
पहिल्या स्तराची सुरुवात ही नेहमीच मालमत्ता वर्गाची अपेक्षित कामगिरी बघून करावी लागते. उदाहरण घ्यायचे झाल्यास, जेव्हा शेअर बाजार खूप महाग असतो, तेव्हा तिथे गुंतवणुकीचे प्रमाण कमी ठेवावे, ५ टक्के ते १० टक्के. मात्र जेव्हा तो स्वस्त होतो तेव्हा ८० टक्त्यांपर्यंतसुद्धा पैसे गुंतवलेले चालतात. स्थावर मालमत्ता घेताना खूप जास्त रक्कम गुंतवावी लागते किंवा कधीकधी तर कर्ज घ्यावे लागते. तेव्हा इथेदेखील गुंतवणूक करताना पुढे मिळणारे भाडे, आणि मूळ किमतीमध्ये अपेक्षित वाढ यांचे विश्लेषण करावे लागते. सोन्या-चांदीतील गुंतवणूक करतानासुद्धा जागतिक पातळीवर काय चाललंय हे पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक मालमत्ता वर्गाचे एक निश्चित ऋतुचक्र असते, आणि ते समजून केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते. महागाईच्या काळात कोणती गुंतवणूक उपयुक्त आहे आणि कोणती नाही हे समजून घेऊन त्यानुसार प्रत्येक मालमत्ता वर्गाचे प्रमाण निश्चित करावे. हे सर्व करायच्या आधी विमा आणि आपत्कालीन निधी प्राधान्यक्रमाने बाजूला काढणे अतिआवश्यक आहे. शिवाय नजीकच्या काळात अपेक्षित मोठ्या खर्चासाठी वेगळी तरतूद करून मग उरलेल्या गुंतवणूक आणि रोकड यांची सांगड घालावी लागते. आपले राहते घर आणि व्यवसायासाठी वापरलेली स्वतःची जागासुद्धा यातून वगळावी. कारण त्यातून भाड्याचा खर्च वाचतो, मात्र मिळकत होत नसते.
पहिल्या स्तराचा निर्णय झाल्यावर मग आपण येतो दुसऱ्या स्तरातील गुंतवणूक पर्यायांकडे. इथे आपल्याला भरपूर वाचन, चिंतन, चर्चा करून मग पर्यायाची निवड करायची आहे. थेट समभाग घ्यायचे की म्युच्युअल फंड घ्यावे, सरकारी रोखे की खासगी रोखे, फ्लॅट की दुकान की रिट्स, सोने-चांदी – अशा प्रश्नांची उत्तरे आपण इथे शोधतो. प्रत्येक गुतंवणूकदाराला हे सर्व योग्य पद्धतीने करता येईलच असे नाही. म्हणूनच अधिकृत आर्थिक सल्लागाराकडून माहिती घेऊनच गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-VPF मध्ये पीएफपेक्षा जास्त फायदा, मोठी रक्कम हातात येणार अन् कर सूटही मिळणार
या पुढची पायरी म्हणजे गुंतवणूक योजना. समभाग संलग्न गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या कंपन्या काय प्रमाणात ठेवायच्या, कुठला म्युच्युअल फंड किती प्रमाणात घ्यायचा, स्थावर मालमत्तेसाठी कुठल्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करायची इत्यादी निर्णय आपण इथे घेतो. सरतेशेवटी आपल्या खिशातील पैसे नक्की कुणाला, कशासाठी, किती आणि किती काळासाठी आपण देणार आहोत, ते या स्तरात निश्चित केले जाते. जरी एकाच प्रकाराची गुंतवणूक असली, तरीसुद्धा तिच्यात हिस्से करावे लागतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास बॅलन्सड म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे एचडीएफसीसी हायब्रिड फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड, एसबीआय इक्विटी हायब्रिड फंडमध्ये घालायचे. कारण पोर्टफोलिओ वेगळे असतील तर जोखीम विभागली जाते. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत देखील एकापेक्षा अधिक मालमत्ता जर एकाच ठिकाणी असेल तर परतावे एकाच प्रकारचे मिळतात आणि वाढ सारखीच होते.
पोर्टफोलिओ विविधीकरण आणि ॲसेट ॲलोकेशनमध्ये कधी कधी गोंधळ होऊ शकतो. गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुसार, गरजेनुसार आणि गुंतवणूक परिस्थितीनुसार आपण ॲसेट ॲलोकेशन करतो. साधारणपणे तिशीतील गुंतवणूकदाराकडे ७० टक्के समभाग अपेक्षित असतात, तर निवृत्तीजवळ असलेल्या गुंतवणूदाराकडे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत रोखे संलग्न गुंतवणूक असू शकते. शिवाय खर्च जास्त आणि जोखीम क्षमता कमी असेल तरी समभाग निगडित गुंतवणुकीचे प्रमाण कमी असू शकते.
व्यवस्थित, प्रमाणबद्ध आणि काळाच्या गरजेनुसार व गुंतवणूदारांच्या जोखीम क्षमतेनुसार तयार केलेला पोर्टफोलिओ हा बाजार पडला तरी खूप कमी होत नाही आणि बाजार वाढतो तेव्हा त्याएवढे किंवा त्यापेक्षा जास्त परतावे मिळून देतो. असे होत नसल्यास गुंतवणूक करताना चूक झाली आहे, हे गुंतवणूकदाराच्या लक्षात आले पाहिजे. पोर्टफोलिओची कामगिरी तपासताना ॲसेट ॲलोकेशन पाहावे लागते आणि मग त्यातील गुंतवणूक पर्याय आणि त्यानंतर गुंतवणूक योजनांची कामगिरी पाहावी. जर समभागसंलग्न गुंतवणुकीचा परतावा चांगला असेल, पण त्यातील एखाद्या गुंतवणूक पर्यायाने साजेशी कामगिरी केली नसेल तर त्यातून बाहेर पडून, दुसरा पर्याय निवडावा लागतो. जेव्हा एखादी गुंतवणूक महाग होते तेव्हा त्यातून पूर्णपणे बाहेर पडावे किंवा काही प्रमाणात बाहेर पडून दुसऱ्या स्वस्त असलेल्या आणि वेगळ्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतवावे. यासाठी गुंतवणुकीचे ऋतुचक्र समजणे आवश्यक आहे.
आजचा लेख जरा जड आहे. मात्र हे शास्त्र जर नीट समजले तर आपले पैसे चांगल्या पद्धतीने वाढवता येतील. येणारा काळ हा खूप कठीण असून त्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक ध्येय बाळगणे ही सर्वांचीच गरज आहे. तेव्हा प्रत्येकाने प्रत्येक पैशाची जबाबदारी घेणे हे ओघाने आलेच!
तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com