संपत्ती म्हटली की, सर्वात पहिलं आपल्या डोळ्यांसमोर भरपूर पैसे, जंगम मालमत्ता, उंची राहणीमान या गोष्टी येतात. त्यात ती संपत्ती वडिलोपार्जित असून जर पिढ्यानपिढ्या पुढे मिळत असेल तर अजून ‘सोने पे सुहागा’. अशा वारसदारांना इतर लोकं खूप नशीबवान म्हणतात, कारण सगळं फुकट मिळालं असतं ना! आपल्याच देशातील उदाहरणं घ्यायची तर तिसऱ्या-चौथ्या पिढीचे उद्योगपती म्हणजे त्यात – टाटा, बिर्ला, अंबानी, गोदरेज, जिंदाल, बजाज यांचा समावेश होतो. मात्र, या जगात फुकट काहीच नसतं बरं का. संपत्ती निर्मिती, संपत्ती जपवणूक आणि तिचे हस्तांतरण या सर्व प्रक्रिया खूप मेहनतीच्या असतात. प्रत्येक टप्पा तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यात पुढे जेव्हा संपत्तीचं हस्तांतरण होऊन पुढच्या पिढ्यांसाठी तिचा वापर होतो, तेव्हा कुठे याला ‘बहुपिढी श्रीमंती’ म्हणता येतं.

स्वित्झरलँड हा देश अशा श्रीमंतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एका अहवालानुसार, मागील २० वर्षांत तेथील संपत्ती २०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेली आहे. वार्षिक वाढीचा दर होता साधारण ६ टक्के. एखाद्या प्रगत देशासाठी जिथे त्या देशाचा विकासदर २ ते २.५ टक्क्याने विस्तारत असेल, तिथे संपत्ती वाढीचा दर त्यापेक्षा ३ ते ३.५ टक्क्यांहून अधिक असतो ही गोष्ट नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. या प्रकारच्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील एक मोठं कारण आहे पिढ्यानपिढ्या चालू राहिलेली श्रीमंती. एका पिढीने जमवलं, तर त्यात पुढची पिढी अजून भर घालते. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. श्रीमंती म्हणजे फक्त भरपूर पैसा असणं एवढंच नसून त्या पैशांची योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूक, गुंतवणुकीची होणारी वाढ, त्यातून होणारा उपसा आणि पुढे होणारं हस्तांतरण! नुकताच दसरा होऊन गेलेला आहे आणि दोन आठवड्यांत दिवाळी येईल. तर या सुंदर सणावाराच्या काळामध्ये आपण लक्ष्मी मातेचा उदो उदो करत तिला पिढी-दर-पिढी कसं प्रसन्न ठेवता येईल हे सर्व समजून घेऊया.

how nirav modi committed fraud of rupees 11000 crores
हिरा है सदा के लिये! (पूर्वार्ध)
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
For two years Niftys boom bust movement explained in detail to investors
बाजाराचे तंत्र-विश्लेषण : ‘निफ्टी’साठी २५,३०० ते २५,६००चा अवघड टप्पा
cash transactions restrictions
रोखीच्या व्यवहारांवरील निर्बंध काय आहेत?
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
Apple exports iPhone
Make in India : ६ अब्ज डॉलर्सच्या ‘आयफोन्स’ची चीन नाही, भारतातून निर्यात

संपत्ती निर्मितीचा अर्थ अतिशय सोपा आहे. गरजांच्या पलीकडे जेव्हा मालमत्ता जमा होते, तेव्हा तिला संपत्ती निर्मिती म्हणतात. कालच एका व्यक्तीचं व्याख्यान मी ऐकत होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, भारतामध्ये जर तुमची मासिक कमाई ५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि त्यातील ३० ते ४० टक्के इतकेच खर्च (कर्जाचा हफ्तासुद्धा यातच येतो बरं का!) होत असतील, तर त्यातून चांगल्या प्रकारे संपत्ती निर्मिती होऊ शकते. मात्र त्यासाठी खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या आकड्याचं मी फार काही विश्लेषण केलं नाही, परंतु खर्चांबद्धल त्यांचं म्हणणं मला नक्कीच पटलं. अनेक वेळा असं लक्षात येतं की, मिळकत वाढली त्यानुसार खर्चसुद्धा वाढतात. मग इथे भरपूर पैसे असूनसुद्धा संपत्ती निर्मिती हवी तशी होत नाही. कधी कधी अचानक होणाऱ्या नुकसानामुळे सुद्धा असं होऊ शकतं. काही वेळा याचा दोष नशिबाला जरी दिला, तरीसुद्धा अनेक वेळा गुंतवणूकदाराच्या आळशीपणामुळे किंवा हावरटपणामुळे पण अशी परिस्थिती उद्भवू शकते.

आर्थिक नियोजन करून काटेकोरपणे केलेली गुंतवणूक आणि त्याचबरोबर साधलेलं जोखीम व्यवस्थापन यातून दीर्घकाळात चांगल्या प्रकारे संपत्ती निर्मिती होऊ शकते. शिवाय जेवढा गुंतवणूक कालावधी दीर्घ, तेवढी जास्त संपत्ती निर्मिती होऊ शकते. संपत्तीमध्ये जमीन-जुमला, सोनं, आर्थिक गुंतवणूक हे सर्वच आलं. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पुढल्या पिढीसाठी ठेवलेली घरे, बंगले, जमीन ही पुढे किती वाढतील हेसुद्धा पहावं. पडीक अवस्थेतील जमीन-जुमल्यामधून मिळकत ना होऊन खर्च वाढला तर त्यांचा उपयोग नाही.
पुढे वळूया संपत्ती संरक्षणाकडे. या टप्प्यामध्ये जमा केलेल्या संपत्तीची वाढ आणि तिला असणारी जोखीम या दोन्ही गोष्टी सांभाळत दीर्घ काळाचा प्रवास करायचा असतो. निरनिराळे गुंतवणूक पर्याय कसे एकत्र आणून एक चांगला वाढीचा दर कमावता येईल आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मालमत्तेला कमीत कमी नुकसान होईल, हे लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात.

मागील ४ ते ४.५ वर्षांमध्ये शेअर बाजारातून भरपूर फायदे कमावलेले अनेक जण आपल्या आसपास आहेत. परंतु प्रत्येक वेळी बाजार वरच राहील असं नसतं. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत म्हणायचं तर प्रत्येक घर वेगळं, किंमत वेगळी, मागणी-पुरवठा समीकरण वेगळं. मागे भाव वाढले म्हणून पुढे पण वाढतील असं होत नाही. तेव्हा वेळोवेळी गुंतवणुकीतून फायदा काढून, नवीन पर्याय शोधावा लागतो. आपल्या देशात महागाई जास्त आहे. म्हणून त्यानुसार आपल्या संपत्तीची वाढ होणं गरजेचं आहे. शिवाय संरक्षणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो संपत्तीतून केला जाणारा उपसा. ढोबळ गणित मांडलं तर वाढीपेक्षा उपसा कमी असेल तरच संपत्ती पुरून उरेल. एक उदाहरण आपण इथे घेऊया. खालील तक्त्यातून आपल्या लक्षात येईल की, खर्च नियंत्रित असतील, गुंतवणूक पर्यायांची सांगड व्यवस्थित असेल आणि जोखीम व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत असेल तर संपत्ती संरक्षण शक्य आहे.

कुटुंब ‘अ’कुटुंब ‘ब’कुटुंब ‘क’
जमा संपत्ती१,००,००,०००१,००,००,०००१,००,००,०००
वार्षिक खर्च १०,००,०००८,००,०००१५,००,०००
पोर्टफोलिओचा परतावा१०%१०%१०%
महागाई७%७%७%
किती काळ पैसे पुरतील११ वर्ष १५ वर्ष ७ वर्ष

जर वार्षिक खर्च, परताव्यांपेक्षा जास्त दराने वाढत असतील तर पैसे लवकर संपतील. शिवाय जोखीम क्षमता कमी असेल, तर जास्त परतावेसुद्धा मिळवणं कठीण होईल. त्यात आरोग्याचे खर्च किंवा आयुर्मान वाढलं तर मग सगळंच थोडं कठीण होईल. म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. खिशात पैसे, हातात वेळ आणि जोखीम घ्यायची क्षमता असेल तर २०-३० वर्षांचा मोठा काळसुद्धा नीट घालवता येऊ शकतो.

शेवटच्या टप्प्याकडे येताना आधी प्रत्येकाने स्वतःला पाठीवर एक शाब्बासीची थाप नक्कीच द्यावी की, एका आयुष्यात निर्माण केलं, संरक्षण केलं आणि पुढच्यासाठी सुद्धा उरवलं. आपल्या पोटाला चिमटे काढून अतृप्त न राहता पुढे संपत्तीचं हस्तांतरण झालं तर कोणाला नकोय. पुढच्या पिढीला काय, किती, कसं द्यायचं, कर व्यवस्थापन कसं करायचं, उद्योग कसे विभाजित करायचे हे सर्व महत्त्वाचे मुद्दे यात येतात. इच्छापत्र, नामनिर्देशन, ट्रस्ट इत्यादी मार्गांचा वापर करून निरनिराळ्या लाभार्थ्यांची सोय करता येते. प्रत्येक मार्गाचे फायदे, तोटे आणि खर्च वेगवेगळे आहेत. या सर्वासाठी आपल्याकडे किती संपत्ती आहे त्यानुसार निर्णय घ्यावे.

मुळात या गोष्टी करायची गरज का आहे हा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. तर त्यामागे आहे वाढलेली महागाई, वाढलेले खर्च, वाढलेल्या आकांक्षा आणि पटपट मिळणारा पैसा (स्व-कमाई किंवा कर्ज). आज मुलं शिकून भरपूर चांगले पगार कमावत आहेत. पण त्याचबरोबर खर्च वाढलेले दिसत आहेत. गुंतवणुकीमध्ये सातत्य बाळगणारे गुंतवणूकदार तसे कमीच आहेत. पण नवनवीन पर्यायामध्ये जोखीम न समजून भरपूर नुकसान झालेले लोकसुद्धा आपल्या आस पास दिसतात. तेव्हा संपत्ती निर्मितीसाठी वेळीच लक्ष देणं हे गरजेचं झालं आहे. राहणीमान नुसतं उंचावून उपयोग नाही तर ते पुढे राखता आलं पाहिजे. भरपूर कमाई आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि तिचं संवर्धन झालं तर दसरा-दिवाळी कायमचीच घरात नांदेल. दसऱ्याच्या निमित्ताने आळसाच्या रावणाचा संहार करून, महागाईवर मात करून आपल्या समृद्धीचा पाया घट्ट रोवुया आणि दिवाळीची तयारी प्रत्येक दिवशी करूया.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

Story img Loader