सगळ्यात जोखमीची गुंतवणूक कोणती? या प्रश्नाचे उत्तर भल्याभल्यांना सापडणार नाही. वित्तीय गुंतवणुकीच्या जगात या गुंतवणुकीच्या जोखमीला तोंड दिल्याशिवाय, नुकसानीच्या शक्यतेशी खेळल्याशिवाय पर्याय नाही. या जोखमीच्या व्यवस्थापनावर कित्येक व्यवसाय, जोखीम व्यवस्थापन अर्थात रिस्क मॅनेजमेंट कंपन्या उभ्या आहेत. उत्तम परतावा मिळवण्यासाठीच या गुंतवणुकीच्या जगातील तज्ज्ञ आणि सामान्य गुंतवणूकदार आटापिटा करत असतात. पण खरे तर जोखीम म्हणजे नक्की काय? रिस्क म्हणजे नक्की काय? गुंतवणूकदाराला त्या गुंतवणुकीवरील व्याज किंवा परतावा कमी मिळणे ही जोखीम वाटते. ही झाली वित्तीय गुंतवणुकीची जोखीम. यासाठी सोने नाणे, जमीन जुमला यात गुंतवणूक केली तरी चोरी, कुटुंब कलहातून नुकसान अशा अनेक प्रकारची जोखीम असते. या व्यतिरिक्त व्यक्तीला सहसा लक्षात न येणाऱ्या इतरही बाबी आहेत. तीन प्रकारच्या असुरक्षिता आणि जोखमीला तोंड द्यावे लागते. यातील एक म्हणजे, क्षमता जोखीम किंवा ‘कपॅसिटी रिस्क’. एखाद्या व्यक्तीची उत्पन्नक्षमता तिच्या बुद्धिमत्ता, शिक्षण, शारीरिक मानसिकी क्षमता, आरोग्य यावर अवलंबून असते. परंतु आजारपण, मृत्यू किंवा इतर कारणाने त्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. दुसरी जोखीम म्हणजे मुद्दलाची जोखीम किंवा ‘कॅपिटल रिस्क’. म्हणजे चुकीचे निर्णय, अतिव्याजाचे लोभापायी, फसवणूक, दिवाळखोरी यामुळे कमावलेले धन नष्ट होणे. तिसऱ्या जोखमीचा प्रकार म्हणजे महागाई, युद्ध अस्थिरतेमुळे येणारी अतिमहागाई, अतिदीर्घायुष्य यासारख्या कारणांनी विशिष्ट अडाखे चुकल्याने जमापुंजी अपुरी पडणे.
गुंतवणूक करताना सामान्यपणे आपण व्याज किती मिळेल हाच विचार करत असतो. मुद्दलाची सुरक्षितता, आपत्कालीन गरजेची पूर्तता आणि करसुलभता या बाबींचा विचारही आवश्यक आहे. गेली काही वर्षे आयर्विम्यामधील गुंतवणुकीसंदर्भात एक प्रकारचे प्रतिकूल वातावरण निर्माण झालेले आहे. शेअर बाजारातील आणि म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा याला कारणीभूत आहे. परंतु मुळात आयुर्विमा आणि या प्रकारची गुंतवणूक या सर्वतोपरी भिन्न गुंतवणूक असून त्यांची एकमेकांशी तुलना करणे योग्य नाही.
आयुर्विम्याचे संरक्षण आणि दीर्घकाळ बचतीचे अनन्यसाधारण महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही, परंतु दुर्दैवाने हे सर्व सामान्यांना पटत नाही आणि वित्तीय सल्लागार त्यांना ते यशस्वीपणे पटवून न देता ‘सही है’असाच सल्ला देतात. परंतु खरे पाहता गुंतवणुकीमध्ये सोनं, जमीन, पोस्टातील बचत ठेवी, बँक ठेवी, कंपनी ठेवी, शेअर, म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंड या सर्वांचे आणि त्याबरोबर आयुर्विम्याचेही स्थान असले पाहिजे. जेवणाच्या थाळीत ज्याप्रमाणे समतोल आहाराला महत्त्व आहे, त्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये समतोल संतुलनाला महत्त्व आहे. हे संतुलन आपल्या गरजांनुसार ठरते आणि माणसाच्या गरजा आणि त्यांचे महत्त्व त्याच्या जीवनातल्या कोणत्या टप्प्यावर तो आहे त्यानुसार बदलत जातात.
मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्याच्या गरजेचे पाच टप्पे पिरॅमिडच्या आकारात चढत्या क्रमाने दर्शवले. उदा सर्वात मूलभूत गरज, अन्न, निवारा या पुऱ्या झाल्यावर, पुढील स्तरावर आरोग्याची निगा आणि भविष्यातील उत्पन्नाची सुरक्षितता महत्त्वाच्या वाटू लागतात, त्यानंतरच्या स्तरावर कुटुंब आणि मित्रपरिवार नातेसंबंध समाज, समुदाय यांच्याशी बांधिलकी यातून सुरक्षा आणि याच्याशी असलेल्या नातेसंबंधांना प्राधान्य मिळते, चौथ्या पातळीवर समाजातील आपले स्थान, नावलौकिक, समाजातील प्रतिष्ठा, मानसन्मान आदी महत्त्वाचे वाटू लागतात. मग पाचव्या टप्प्यावर शेवटी आत्मसमाधान, समाजऋण फेडण्याची गरज आणि ओढ वाटू लागते.
पहिल्या दोन टप्प्यांवरील गरजांची पूर्तता झाल्यावर, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर स्वत:ची समाजिक प्रतिष्ठा वाढावी अशी इच्छा आणि ती वाढेल अशा वस्तूंची गरज निर्माण होते. त्यामुळे डोक्यावर छप्पर असावे या पहिल्या टप्प्यातील गरजेचे रूपांतर विकासाच्या तिसऱ्या टप्प्यावर कुटुंबासाठी प्रत्येकाच्या सोयीची खोली असणारे, आवडीचे मोठे घर असावे, गाडी असावी, त्याही पुढे चौथ्या टप्प्यात सामाजिक वजन वाढण्यासाठी मोठी गाडी, फार्म हाऊस, ‘सेकंड होम’ घ्यावे अशा समाज प्रतिष्ठा वाढविण्यासाठीच्या गरज पुऱ्या करण्याकडे कल होऊ लागतो. वित्तीय गुंतवणुकीसाठीदेखील अशा पिरॅमिडची कल्पना करता येऊ शकेल.
वित्तीय पिरॅमिडचा पाया म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी तरतूद, तिची पूर्ती आणि सुरक्षितता. यासाठी सर्वप्रथम आयुर्विमा टर्म पॉलिसी आणि आरोग्यविमा याची तरतूद आवश्यक आहे. या मूलभूत गरजांसाठीच्या पैशाची सोय झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर भविष्यातील उत्पन्नाची शाश्वतता महत्त्वाची ठरते आणि यासाठी बँक ठेवी, पोस्ट ऑफिस बचत ठेवी आणि ‘एन्डॉवमेंट’ विम्यातील गुंतवणूक उपयोगी ठरते. या वर्तमानातील मूलभूत गरज आणि भविष्यातील सुरक्षितता यांची तजवीज झाल्यावर तिसऱ्या पातळीवर मालमत्तेची वाढ करण्यासाठी सोने-नाणे, स्थावर मालमत्ता यात गुंतवणूक करता येते. यापुढचा टप्पा मात्र काहीशी जास्त जोखमीची आणि जास्त परतावा देणारी गुंतवणूक दर्शवतो. या टप्प्यावर मुच्युअल फंड, शेअर, रोखे यामध्ये गुंतवणूक होऊ शकते. पाचव्या आणि शेवटच्या पातळीवर जेव्हा मूलभूत गरज, सुरक्षित भविष्य, काहीशी मालमत्ता यात पैसे गुंतवून उर्वरित असेल तर अतिजोखमीच्या गुंतवणुकीमध्ये तो गुंतवता येतो. उदा. वायदे बाजार म्हणजेच फ्युचर्स-ऑप्शन्स, आभासी चलन (क्रिप्टो करन्सी), नवउद्याम, दुर्मीळ वस्तू, चित्रे. वरील वित्तीय पिरॅमिड हे मॅस्लोच्या गरजांच्या पिरॅमिडशी सुसंगत आहे. पण दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गुंतवणूक करताना गुंतवणूक हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे असे समजले जाते. ‘ईझी मनी’, ‘फास्ट मनी’च्या नादात वित्तीय पिरॅमिड उलटा होतो आणि नवीन नोकरी आणि संसाराला लागलेल्या व्यक्ती विम्याकडे दुर्लक्ष करून थेट पाचव्या टप्प्यावर उडी मारून आभासी चलन आणि शेअर बाजाराच्या मोहात पडतात. मुद्दा हा आहे की, पैसे शेअर बाजारात बनत नाहीत, तर ते आपल्या नोकरी- व्यवसायातून कष्टाने आपण कमावतो. ते शेअर बाजारात गुंतवतो. गंमत अशी आहे की, लहानपणापासून आपणास घराचे चित्र काढायला सांगितले तर सगळेच प्रथम छप्पर काढतात. पण प्रत्यक्ष घर बांधताना मात्र पायाभरणी सर्वात आधी करावी लागते. जितकी इमारत उंच तितका पाया अधिक खोल आणि भक्कम. आर्थिक पिरॅमिडच्या भक्कम पाया हा विमा सुरक्षिततेवर अवलंबून आहे.
● आत्मसमाधान, समाजऋण फेडण्याची गरज आणि ओढ
● समाजातील प्रतिष्ठा, मानसन्मान
● नातेसंबंध समाज, समुदाय यांच्याशी बांधिलकी यातून सुरक्षा
● नजीकच्या भविष्यातील सुरक्षेची हमी
● मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा)
ranjitlic@gmail.com