भारतात अगदी प्राचीन ऋगवेद काळापासून लोकायत, लोकायतिक, चार्वाक अशा विचारधारा ‘ईश्वर’ नावाची कोणती शक्ती अस्तित्वात नसल्याचे मानत आली आहेक. कात्यायनाने तर ‘अणुवाद’च मांडला, तर अणूखेरीज सृष्टीत दुसरे काहीच नाही, असा भौतिकवाद अडीच हजार वर्षांपूर्वी कणाद मुनी सांगून गेले. तरी प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाने चालित आजचे जग हे ढोबळ मानाने ईश्वराचे अस्तित्व मानतोच. अगदी अर्थशास्त्र, न्यायशास्त्रासारख्या मानव्य विद्यांमध्ये ‘ॲक्ट ऑफ गॉड’ (दैवी कोप) याला एक गर्भित अर्थ आहे. अशक्यतेच्या परिघातील किंवा अशा अव्यवहार्य गोष्टी ज्याची कारणमीमांसा करणे अवघड जाते तेव्हा बचावरूपाने हे घडून येते. हाच विधिमान्यता असलेला ‘देवा’चा (ॲक्ट ऑफ गॉड) धावा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही मागे केला होता. आठवा तो करोना महासाथीचा काळ आणि तेव्हाचा अर्थमंत्र्यांचा तो बचाव! त्यावर बरीच टीका झाली, खिल्लीही उडवली गेली. पण त्यांचा तो गर्भित बचाव बेगडी की, ईश्वरावरील त्यांची श्रद्धा नकली हा एक अनुत्तरीत प्रश्न उरतोच. असो, पण अशा ईश्वराधनेचा आधुनिक व्यापार जगतातील प्रत्यय म्हणजे ‘एजंल इन्व्हेस्टर – Angel Investor’ अर्थात देवदूत गुंतवणूकदार होय.

देवदूत गुंतवणूकदार या अशा व्यक्ती आहेत ज्या लहान, जेमतेम कोंब फुटलेल्या नवउद्यमी (स्टार्टअप्स) उपक्रमांना किंवा नवउद्योजकांना विशेषत: त्यांच्या कंपनीच्या समभागांच्या मालकीच्या बदल्यात आर्थिक पाठबळ पुरवतात. या प्रकारच्या गुंतवणुका हा त्यांनी केलेला परोपकार असतो, असे नाही. पारंपारिक गुंतवणुकीच्या संधींच्या तुलनेत जास्त परताव्याचा शोध हा धनाढ्यांकडून निरंतर सुरूच असतो. याच शोधांत असलेली धनाढ्य मंडळी हे मग देवदूत गुंतवणूकदारांच्या भूमिकेत जातात. त्यांच्याकडे उपलब्ध अतिरिक्त निधी ते अशा प्रकारे नव्या उपक्रमांत गुंतवितात. जितकी जोखीम अधिक तितका परतावाही जास्त हा गुंतवणूकशास्त्राचा आद्यनियम येथेही लागू पडतो.

TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
Firewall , Wife, Children Property Rights, MWPA,
जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

हेही वाचा – Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच

वित्त पुरवठा करणाऱ्या बँका वा वित्तसंस्थांच्या तुलनेत देवदूत गुंतवणूकदारांच्या अटी-शर्ती या अधिक अनुकूल असतात, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे. कारण व्यवसायाच्या व्यवहार्यतेऐवजी व्यवसाय सुरू करणार्या उद्योजकांच्या कल्पकता आणि ध्यासात होणारी ही गुंतवणूक असते. देवदूत गुंतवणूकदारांचा भर त्या गुंतवणुकीतून मिळणार्या संभाव्य नफ्याऐवजी, भन्नाट कल्पनेसह उपजलेल्या नवउद्यमाला त्याची पहिली पावले टाकण्यास मदत करण्यावर असतो. म्हणून दुसऱ्या अर्थाने ते बीजभांडवल गुंतवणूकदार किंवा व्यवसायातील देवदूत देखील ठरतात. कैकप्रसंगी एकेकटे वैयक्तिक स्वरूपात अथवा काही देवदूत गुंतवणूकदार एकत्र येऊन नवोपक्रमांच्या उभारणीसाठी आवश्यक भांडवल पुरविणारे संयुक्त जाळेही तयार करताना दिसून येतात. दिवंगत रतन टाटा, अझीम प्रेमजी, आनंद महिंद्र किंवा नवउद्यम परिघातील नावाजलेली मंडळी जसे कुणाल बहल, रोहित बन्सल, बिन्नी बन्सल, अनुपम मित्तल, जितेंद्र गुप्ता ही भारतातील अग्रणी देवदूत गुंतवणूकदार म्हणून ओळखली जातात. ‘शार्क टँक’सारखे दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रम, तर एंजल इन्व्हेस्टमेंट नेटवर्क हा इंटरनेटवरील उपक्रम, देवदूत गुंतवणूकदार आणि वित्त-बळ हवे असलेले नवोपक्रम यांच्यातील दुवे ठरले आहेत.

आठवड्याचे प्रतिशब्द

Venture Capital – VC / व्हेंचर कॅपिटल – साहसी भांडवल

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत उत्पादनाची दिशा ही बाजार-परिस्थितीचा अभ्यास करून ठरविली जाते. ही बाजार परिस्थिती म्हणजे विशिष्ट वस्तूंना बाजारात मागणी काय आणि तिचा पुरवठ्याचे घटक या आधारे निश्चित होत असते अथवा अंदाजली जात असते. अर्थात पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असेल, अशाच वस्तूंचे भाव वरचढ होतात. याचाच अर्थ अशाच वस्तुंच्या उत्पादनामध्ये अधिक नफा मिळू शकतो व म्हणून त्या वस्तूंचे उत्पादन वाढविण्यास आणि त्यात अधिकाधिक भांडवल गुंतविण्याची प्रवृत्ती असते. हा सामान्य नियम नवउद्यमी (स्टार्टअप्स) आणि त्यांच्या व्यवसायप्रारूपांना लागू पडत नाही. एक स्टार्टअप्स व्यवसायच नवकल्पनांवर बेतलेला आणि या व्यवसायायोगे तयार होणारे उत्पादन व सेवाही नवीनच असतात. बाजाराच्या कसोटीवर त्या टिकतील, निभावतील हे अनुभवलेले नसते. अशा व्यवसायात पैसा ओतणे हे धाडसाचे आणि मोठ्या जोखमीचे असते. अशा भांडवल गुंतवणुकीला म्हणूनच साहसी भांडवल Venture Capital / व्हेंचर कॅपिटल म्हटले जाते. देवदूत गुंतवणूकदार आणि साहसी भांडवलदार यांत मग फरक काय? तर देवदूत गुंतवणूकदाराप्रमाणे नाही, बहुतेक साहसी भांडवल देखील नवउद्यमाच्या पायाभरणी, प्रारंभिक निर्वाहासाठी गुंतवणूक करतात. मात्र त्यांना अशा नवउद्यमांमध्ये रस असतो ज्यांनी बाळसे धरले आहे आणि त्यांच्या सेवा-उत्पादनाबद्दल बाजारात आकर्षण असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. अशा व्यवसायात अतिरिक्त गुंतवणूक ही निर्धारीत ध्येयाप्रत जाण्यास चालना देणारी ठरत असेल, तरच साहसी भांडवल त्याकडे वळते. शिवाय वैयक्तिक गुंतवणूकदार हे एककेटे असतात, त्याऐवजी साहसी भांडवलदार हे मोठ्या गुंतवणूकदार समुदायाच्या निधीतील काहीसा हिस्सा नवोपक्रमांत गुंतवत असतात. धनाढ्य व्यक्तींचा संघ, विमा कंपन्या, बड्या उद्योगांचे पाठबळ लाभलेली प्रतिष्ठाने, विश्वस्त न्यास आणि अलिकडे केंद्र आणि अनेक राज्यात सरकारच्या पाठबळातून Venture Capital – साहसी भांडवलाची उभारणी केली गेली आहे.

Scalability / स्केलेबिलिटी – गुणनक्षमता

आजच्या गतिमान भांडवली जगात वाढ आणि निरंतर वाढ हा एक जगण्याचा प्राणवायूच बनला आहे. ही वाढ संकलन (बेरीज) नुसती असून चालत नाही, तर गुणन (गुणाकार) पद्धतीने सुरू राहावे याला तर नवउद्यमी (स्टार्टअप्स) व्यवसायप्रारूपात खासच महत्त्व आहे. असा Scalabile / स्केलेबल – गुणनक्षम व्यवसाय हा, प्रतिभावान मानवी भांडवल आणि त्याचे कौशल्य गुण, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि स्वयंचलन (automation) याच्या साहाय्याने साधणाऱ्या कंपनीला या जगतात खूप महत्त्व आहे. अशा नवउद्यमाच्या उत्पादन वा सेवा या एकाच समयी हजारो, लक्षावधी ग्राहकांकडून विनासायास वापरात येतात, पण त्यासाठी सेवा प्रदात्यांची संख्या मात्र थोडकी राखली तरी चालते. हा देखील स्केलेबिलिटी – गुणनक्षमतेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. सारांशात, स्केलेबिलिटी म्हणजे एखाद्या उपक्रम अथवा संस्थेची वाढत्या कामाच्या ताणाशी किंवा बाजारातील वधारत्या मागणीशी जुळवून घेण्याची क्षमता होय. तंत्रज्ञानामुळे अधिक ग्राहक मिळवणे आणि बाजारपेठेचा विस्तार जागतिक स्तरावर करणे सोपे झाले आहे, त्यामुळे ही व्यावसायिक गुणनक्षमता/ स्केलेबिलिटी आधुनिक अर्थव्यवस्थेत कधी नव्हे इतकी कळीची आणि प्रासंगिक बनली आहे.

हेही वाचा – कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?

Pivot / पिव्हट – खुंटा संतुलन

कधीकधी आपल्याला खात्री असते की ठरविलेली योजना योग्य आहे. पण ती तशी नाहीये हेही आपल्याला कधीकधी लगेच कळते, तर कधी त्यावर खूप संसाधने खर्ची घातल्यानंतर लक्षात येते. त्यावेळी व्यवसाय प्रारूपात केला जाणारा बदल हा Pivot / पिव्हट अर्थात खुंटा संतुलन ठरतो. एकाएकी घडणारा नव्हे तर तो विचारपूर्वक योजलेला एक संरचित बदल असतो. जेव्हा व्यवसाय प्रारूपात उपाय/ उत्पादन, रणनीती, महसूल कमावण्याची पद्धत, लक्ष्यित ग्राहकासंबंधी मूलभूत गृहितके आणि त्यासंबंधाने चाचणीच्या पद्धती यासारखे मोठे बदल होतात तेव्हा ते Pivot / पिव्हट ठरते. याला खुंटा संतुलन अशासाठी म्हणायचे की, कंपनीचे नाव, व्यवस्थापन, उत्पादन, नाममुद्रा हे सारे तेच असते, म्हणजे खुंटा तोच मात्र तो नव्याने हलवून मजबूत केला जात असतो. अर्थात उपाय/ उत्पादन लोकांपुढे नेण्याची रीत व रणनीती केवळ बदलत असते. हा पिव्हट नामक खुंटा नवउद्यमांना पुन्हा मुळापाशी जाण्याचे भान देणारा आणि जमिनीवर आणणारा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्याचा खुलेपणाने स्वीकार करणाऱ्या नवउद्यमींचाच व्यवसायात निभाव लागला आणि ते यशस्वी ठरले अशी उदाहरणेही आहेत. अर्थात नवउद्यमींच्या सुरू असलेल्या प्रकल्पातील नवीन शोधांच्या अनुषंगाने नवोपक्रमाची दिशाच बदलणे हा देखील एक पिव्हट बिंदूच असतो. अर्थात नवीन अक्ष बिंदू किंवा नवीन खुंट्याची ती सुरुवातच असते.

Target Market / टार्गेट मार्केट – लक्ष्यित बाजारपेठ

नवउद्यमी (स्टार्टअप्स) त्यांच्या पारंपरिक स्पर्धकांपेक्षा वेगळे कसे असतात हे सिद्ध करणारी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. नावीन्यपूर्णता, बौद्धिक संपदा, विशेष हक्क आणि तंत्रज्ञान अवलंब तसेच तंज्ञज्ञान भागीदाऱ्या असे वेगळ्या मार्गांनी ते आकाराला येतातच, परंतु लहान पण वाढत्या बाजारपेठेला हेरण्याचे स्टार्टअप्सचे कौशल्य आणि इतरांपेक्षा ही बाजारपेठ वेगाने काबीज करण्याचे कसब हे असामान्यच असते आणि असायलाच हवे. नवउद्यमी व्यवसाय हा नवकल्पनेवर बेतलेला असला तरी, ही कल्पना आणि तो व्यवसाय नफा कमावून देणाराही ठरायला हवा. लोकांच्या समस्येवर उपाय सांगणारी भन्नाट कल्पना हा यातील प्रधान पैलू विसरून चालणार नाही. कोणालाही गरज नाही अथवा जे आधीच प्रचलित आहे, तेच नव्या रूपात कितीही चित्ताकर्षक मुलामा देऊन सादर केले तर त्याचे यश शंकास्पद आणि कोणी त्यात भांडवलही गुंतवू इच्छिणार नाही. म्हणूनच आधी समस्या निदान नेमके काय आणि त्या निदानाचे आदर्श खरेदीदार कोण हे ठरविणाऱ्या गृहितकातून हेरली जाणारी लक्ष्यित बाजारपेठ – टार्गेट मार्केट याला नवउद्यमी संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. तेथपर्यंत पोहोचण्याचे मधले बरेच टप्पे आहेत. जसे पहिला टप्पा हा एमव्हीपी अर्थात किमान व्यवहार्य उत्पादन (minimum viable product) हा आहे. उत्पादन तयार करण्यासाठी भरपूर संसाधने खर्च न करता कल्पनांची जलद चाचणी घेण्याच्या या टप्प्यात, फक्त मुख्य वैशिष्ट्ये सामावलेल्या उत्पादनाची पहिली कच्ची आवृत्ती मोजक्या प्रमाणात तयार करून, त्याबाबत मोजक्याच, पारखलेल्या ग्राहकांचे अभिप्राय चाचपले जातात. त्या आधारे दुसरा टप्पा मग प्रॉडक्ट मार्केट-फिट (P/M fit) असा आहे. त्यातून उत्पादनाला बाजारात पुढे रेटले जाण्याऐवजी, उलट उत्पादनच बाजाराकडून ओढले जाईल, अशी खात्री पटण्यापर्यंत चाचण्यांची पातळी जाते. पुढचा टप्पा हा अल्फा आवृत्ती आणि बीटा आवृत्तीचा आहे. म्हणजेच उत्पादन अंतिमतः बाजारात ध़डक देण्यास सज्ज करण्यापूर्वी त्याचे प्रारंभिक थोडक्या काळासाठी प्रायोगिक उत्पादन सुरू करण्याचा हा टप्पा आहे. यातून शेवटी समान गरजा आणि उद्दिष्टे असलेल्या ग्राहकांचा समूह अर्थात लक्ष्यित बाजारपेठ निश्चित होते.

Unicorn / युनिकॉर्न – एकश्रृंग

नवउद्यमी व्यवसायाच्या यशाचे परिमाण हे तोलून-मापूनच ठरत असते. हा एक नफ्याचा व्यवसायच असल्याने महसुली कामगिरी हा यशाचे एक मापक निश्चितच आहे. त्यानुसार, नवउद्यमी कंपनीचे मूल्यांकन ठरते. जसे मूल्यांकन एक अब्ज अर्थात १०० कोटी अमेरिकी डॉलरच्या घरात गेलेली स्टार्टअप्स ही Unicorn / युनिकॉर्न – एकश्रृंग ठरतात. ही त्यांच्या प्रवासातील यशाचा पहिला मैलाचा दगड मानला जातो. त्यानंतरचे टप्पे डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्न या श्रेणीचे आहेत. अर्थात त्यांचे मूल्यांकन हे अनुक्रमे १,००० कोटी डॉलर आणि १०,००० कोटी डॉलर इतके वाढायला हवे. ही सर्व काल्पनिक प्राण्यांची नावे आहेत, जी युरोपीय साहित्य आणि कलेत वापरात आली आहेत. जसे युनिकॉर्न हा एक शिंग असलेला पांढरा घोडा अथवा शेळी आहे. त्याचप्रमाणे डेकाकॉर्न हा १० शिंगे असणारा, तर हेक्टोकॉर्न हे शिंग तसेच पंख असलेले पांढरे अश्व आहे. सध्या डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्न या श्रेणीपर्यंत कोणी पोहोचणे ही जगाच्या पाठीवरही खरे तर दुर्मिळच आहे. परंतु दशकभरातपर्यंत युनिकॉर्न श्रेणी मिळविणेही दुर्मिळच होते. तथापि भारतात, सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, ४,२३,००० नवउद्यमींपैकी युनिकॉर्न श्रेणी गाठणारे ११७ कंपन्या आहेत. एप्रिल २०२४ पर्यंत ही संख्या ६७ होती आणि ती वेगाने वाढत आहे. इतक्या मोठ्या संख्येने युनिकॉर्न नवउद्यमी असण्याच्या बाबतील अमेरिका आणि चीननंतर, भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे.

ई-मेल: arthbodhi2025@gmail.com

Story img Loader