सुधीर खोत
मनासारखे जगायचे आहे, पण मन मारून जगावे लागत आहे. हे कसे बदलणार? हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. मनासारखे जीवन जगायचे असेल तर पैसा आवश्यकच आहे. आणि जर हा पैसा दररोज किंवा दर महिन्याला कमवावा लागत असेल, तर मनाप्रमाणे जगणे कठीण होईल. पैशाचा ताण न घेता जीवन जगायचे असेल तर पैशाची कमतरता जाणवू नये. हे अनेकांचे स्वप्न असते. पण या स्वप्नाला नेमके काय म्हणायचे? यालाच म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य!
आज आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते साध्य कसे करावे हे सविस्तर पाहूया.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?
ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही नोकरीवर किंवा व्यवसायावर अवलंबून न राहता तुमचे सर्व खर्च सहज भागवू शकता, त्या दिवशी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालात असे समजावे.
हे नीट समजण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक लक्षात घ्यायला हवेत—
१) सक्रिय उत्पन्न
२) निष्क्रिय उत्पन्न
जेव्हा तुमचे निष्क्रिय उत्पन्न तुमच्या दैनंदिन खर्चांपेक्षा जास्त होते, तेव्हा तुम्हाला आर्थिक विवंचना राहत नाही. त्या क्षणी तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवले असे समजू शकता. म्हणूनच, तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा, तो किती सुयोग्यरीत्या व्यवस्थापित करता हे अधिक महत्त्वाचे ठरते.
अनेक लोक मोठी कमाई करतात, पण तरीही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतीलच असे नाही. कारण पैसा मिळवणे महत्त्वाचे असले तरी तो योग्य पद्धतीने वापरणे आणि टिकवणे याला जास्त महत्त्व आहे.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे—
१) तुम्हाला हवी ती जीवनशैली जगता येणे
२) कोणत्याही कर्जाविना शांत जीवन जगता येणे,
३) अनपेक्षित परिस्थितीतही आर्थिक चिंता नसणे.
आर्थिक स्वातंत्र्यासाठी सर्वात महत्त्वाचा मूलभूत नियम
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसा कमवणे किंवा गुंतवणूक करणे नव्हे, तर कमावलेला पैसा टिकवणे हाच खरा पाया आहे.
आज अनेक लोक “अधिक पैसे कसे कमवता येतील?” किंवा “गुंतवणुकीतून जास्त परतावा कसा मिळेल?” याकडे लक्ष देतात. पण एक गोष्ट विसरतात— जर कमावलेला पैसा योग्यरीत्या व्यवस्थापित केला नाही, तर तो कधीच संपत्तीमध्ये बदलणार नाही.
पैसे कमावणे महत्त्वाचे आहे
पैसे वाढवणे आवश्यक आहे
पण कमावलेला पैसा जपणे अत्यावश्यक आहे!
जर आपण पैसा जपण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष केले, तर जरी मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला तरी तो हातातून निसटेल. “जिथे पैसा थांबतो, तिथेच संपत्तीची सुरुवात होते!”
आर्थिक स्वातंत्र्याचे ५ महत्त्वाचे घटक
१. नियमित आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत असावा
तुमचे सक्रीय उत्पन्न चढ-उतार असू शकते. पण जर तुम्ही निष्क्रिय उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली, तर नोकरी न करता देखील तुमच्याकडे नियमित आर्थिक स्रोत असेल. यासाठी तुम्ही घरभाडे उत्पन्न, शेअर्समधून लाभांश, मुदत ठेवीवरील व्याज किंवा इतरांच्या व्यवसायात गुंतवणूक यांसारखे मार्ग अवलंबू शकता.
२. कर्जमुक्त जीवनशैली असावी
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे क्रेडिट कार्डचे कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज नसणे. जितके कमी कर्ज, तितके जास्त स्वातंत्र्य!
३. आपत्कालीन निधी असावा
अचानक उद्भवणाऱ्या आजारपणात किंवा उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यास, किमान ६ महिन्यांचा खर्च भागेल इतका निधी बाजूला ठेवावा.
४. जीवन विमा आणि आरोग्य विमा असावा
योग्य विमा घेतल्यास अनपेक्षित संकटांमध्ये आर्थिक झळ बसत नाही. त्यामुळे आरोग्य विमा आणि जीवन विमा असणे अत्यावश्यक आहे.
५. दीर्घकालीन गुंतवणूक असावी
जर तुम्ही म्युच्युअल फंड, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (NPS) गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतरही तुमचे आर्थिक स्थैर्य कायम राहील.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ५ पायऱ्या
१. स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे ठरवा
“मला फक्त श्रीमंत व्हायचे आहे” असे म्हणणे पुरेसे नाही. त्याऐवजी “५० व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे” किंवा “मुलाच्या शिक्षणासाठी २० लाख रुपये साठवायचे आहेत” असे ठोस उद्दिष्ट असले पाहिजे.
२. बजेट आणि खर्चावर नियंत्रण ठेवा
“उत्पन्न – खर्च = बचत” हा पारंपरिक फॉर्म्युला आहे. पण आर्थिक यशासाठी “उत्पन्न – बचत = खर्च” असा दृष्टिकोन स्वीकारा.
३. पैशाच्या वेळेच्या मूल्यातील वाढ लक्षात ठेवा
आजची छोटी गुंतवणूक उद्याच्या मोठ्या संपत्तीचा पाया ठरू शकते. लवकर सुरूवात केली, तर चक्रवाढीचा जादूई प्रभाव (Compounding Effect) तुमच्या बाजूने काम करेल.
४. बचत करण्याची सवय लावा
प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नातील २०% भाग गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा.
५. फसव्या योजनांपासून सावध राहा
अवास्तव मोठा परतावा देणाऱ्या योजना टिकत नाहीत. त्यामुळे “हळू आणि स्थिर गतीनेच यश मिळते” हे लक्षात ठेवा.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे जीवनाचा मोठा दृष्टीकोन-
१) पैसा हे साधन आहे, उद्दिष्ट नाही – प्रतिष्ठेने जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण तोच एकमेव हेतू नसावा.
२) वेळेवर नियंत्रण – सक्तीने नव्हे, तर आवडीनुसार काम करता यायला हवे.
३) काम-जीवन समतोल राखता आला पाहिजे – केवळ कमाई नाही, तर समृद्ध जीवन हेही महत्त्वाचे आहे.
४) स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हवी – कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
५) प्रेरणादायी वारसा मागे ठेवणे गरजेचे – पैशासोबत मूल्यांचा आणि विचारांचा ठसा मागे ठेवावा.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मनासारखे, आत्मनिर्भर आयुष्य – तुमच्या स्वतःच्या नियमांनुसार!
शेवटी, एक महत्त्वाची गोष्ट:
पैशाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता, त्याकडे स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन म्हणून पाहा. आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न तुम्ही नक्की साकार करू शकता!
लेखक फायनान्शियल थेरपिस्ट असून फायनान्शियल फिटनेसचे संस्थापक आहेत.