सुधाकर कुलकर्णी
गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!
प्रश्न १: होम लोन इन्शुरन्स म्हणजे काय?
एखाद्याने होम लोन घेऊन घर घेतले असेल व अशा व्यक्तीचे अकाली निधन झाले तर या कर्जाची परतफेड करणे अवघड होऊन जाते प्रसंगी कर्जफेड करणे शक्यच होत नाही. अशावेळी कर्ज देणारी बँक अथवा एनबीएफसी कर्जवसुली साठी घर विक्रीस काढते व यामुळे मृताच्या कुटुंबियांना बेघर होण्याची वेळ येऊ शकते , यावर होमलोन इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. होम लोन इन्शुरन्समुळे कर्जदाराचा कर्ज परतफेडीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या नावावर असलेली कर्ज रक्कम कर्ज देणाऱ्या बँका अथवा एनबीएफसीस इन्शुरन्स कंपनीद्वारे दिली जाते व कुटुंबियांना एक मोठा दिलासा दुख:द प्रसंगी मिळतो.
हेही वाचा : Money Mantra : शैक्षणिक कर्ज म्हणजे भावनिक गुंतवणूक असं का म्हटलं जातं?
प्रश्न२: होम लोन इन्शुरन्स कसा घेता येतो?
होम लोन इन्शुरन्स खालील दोन प्रकारे घेता येतो. १.टर्म इन्शुरन्स आणि २. होम लोन इन्शुरन्स
यातील टर्म इन्शुरन्स किमान कर्ज रकमेइतका असावा लागतो तर होम लोन इन्शुरन्स कर्ज रकमेइतकाच असतो. टर्म इन्शुरन्सचे कव्हर कर्ज परतफेडीनुसार कमी होत नाही तर होम लोन इन्शुरन्सचे कव्हर जसं जशी परतफेड होत जाते तसतसे कव्हर कमी होत जाते.
प्रश्न ३: या दोन्हीतील कोणते कव्हर घेणे फायदेशीर असते?
टर्म इन्शुरन्स कव्हर घेणे निश्चितच फायदेशीर असते. उदा: एखाद्याने रु.७५ लाखाचे ९.५% व्याज असणारे २५ वर्षे होम लोन २००७ साली घेतले आहे व रु.७५ लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलीसी घेतली आणि अशा व्यक्तीचे २०२३ला वर्षांनी अपघाती निधन झाले तर त्याच्या खात्यावर सुमारे रु.४७ लाख एवढी कर्ज रक्कम शिल्लक असेल यातील ४७ लाख बँकेस दिले जातील व उर्वरित २८ लाख वारसास मिळतील. याउलट जर त्याने होम लोन इन्शुरन्स पॉलिसी घेतली असती तर केवळ रु.४७ लाख बँकेस दिले जातील व वारसास काही मिळणार नाही.
हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंट लाईन इक्विटी फंड
प्रश्न४: होम लोन घेताना होम लोन इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का ?
बंधनकारक नाही मात्र घेणे निश्चितच आवश्यक आहे.
प्रश्न५: होम लोन इन्शुरन्सचा प्रीमियम कसा आकारला जातो?
होम लोन इन्शुरन्स पॉलिसी ही सिंगल प्रीमियम पॉलिसी असते. या पॉलिसीचा प्रीमियम सुरवातीलाच व एकदाच घेतला जातो उदा: वरील रु ७५ लाखाच्या होम लोन पॉलिसीचा प्रीमियम रु.३ लाख असेल तर तो कार रकमेत समाविष्ट करून कर्ज रक्कम रु.७८ लाख केली जाते व त्यानुसार ईएमआय आकाराला जातो.