गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!
प्रश्न (सुहास पांचाळ) म्युचुअल फंड एनएफओ म्हणजे काय?
नवीन फंड ऑफर (एनएफओ) ही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी (AMCs) सुरू केलेल्या नवीन योजनेसाठी प्रथमच सदस्यता ऑफर आहे. शेअर्स, सरकारी कर्जरोखे ( सिक्युरिटीज) खरेदी करण्यासाठी लोकांकडून भांडवल उभारण्यासाठी बाजारात नवीन फंड ऑफर सुरू केली जाते. एनएफओ बाजारात आणण्याची प्रक्रिया एएमसीद्वारा केली जाते व बाजारात आणलेला एनएफओ सुमारे १५ ते २० दिवस गुंतवणुकीसाठी खुला ठेवला जातो. याकाळात गुंतवणूक करणारास रु.१० प्रती युनिट या दराने युनिट नक्की दिले जातात.
प्रश्न (अनिकेत साटम) एनएफओमध्ये गुंतवणूक करावी का?
गुंतवणूकदारांनी सरसकट एनएफओ मध्ये गुंतवणूक करु नये. आपल्या पोर्टफोलिओमध्ये एनएफओमध्ये असलेल्या सिक्युरिटीजची गरज वाटत असेल तरच गुंतवणूक करावी. थोडक्यात आपल्याकडे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या अॅसेटमध्ये गुंतवणूक नसेल आणि किरकोळ रकमेत असा असेट घेता येत नाही मात्र एनएफओमुळे हे शक्य होत असेल तर जरूर विचार करावा.
प्रश्न (राकेश टिपणीस) एनएफओ मध्ये मिळणारे युनिट रु.१० लाच मिळत असल्याने स्वस्तात मिळतात हे खरे आहे का?
एनएफओ मध्ये मिळणारे युनिट रु.१० लाच मिळत असल्याने स्वस्तात मिळतात हा एक गैरसमज आहे. कारण एखाद्या एनएफओमध्ये संकलित होणारी रक्कम फंड हाऊस सबंधित फंडाच्या गुंतवणूक थीमनुसार करत असतो व ही गुंतवणूक निवडलेल्या सिक्युरिटीजच्या बाजार भावानुसार होत असते त्यामुळे सबंधित सिक्युरिटीजमध्ये ज्याप्रमाणे बदल होतात त्यानुसार युनिटच्या किंमतीत चढउतार होत असल्याने एनएफओ गुंतवणुकीतून होणारा फायदा तोटा बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो. केवळ युनिट रु.१० ला मिळाले म्हणून फायदा जास्त होईल असे नाही. उलटपक्षी एनएफओसाठी जाहिरात, मार्केटिंग, वितरण यावर होणारा खर्च नावे टाकून झाल्यावर येणाऱ्या नक्त मालमत्ता मूल्यानुसार (नेटअसेटव्हाल्यू) ठरविली जाते. म्युचुअल फंडाच्या प्रस्थापित योजनांवर हा खर्च कमी असतो.