प्रश्न१: एनपीएस वात्सल्य ही काय योजना आहे?

केंद्र सरकारने मागील आठवड्यात सुरु केलेली ही एक गुंतवणूक योजना असून आई/वडील किंवा पालक आपल्या मुला/मुलीच्या नावाने (ज्यांचे वय १८ च्या आत आहे अशा ) हे खाते उघडू शकतात. हे खाते सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँका तसेच प्रमुख खाजगी बँका व पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. खाते पीएफआरडीएच्या पोर्टलवर ऑनलाइनसुद्धा उघडता येते.

प्रश्न२: या खात्यात किमान व कमाल किती रक्कम भरता येते व किती कालावधी साठी ?

या खात्यात प्रतिवर्षी किमान रु.१००० इतकी रक्कम भरावी लागते मात्र कमाल रकमेचे बंधन नाही. आपण कितीही रक्कम भरू शकता, खात्याचा कालावधी खाते उघडल्यापासून ते पाल्य १८ वर्षांचा होईपर्यंत असणार आहे.

हेही वाचा >>>Money Mantra:एनपीएस वात्सल्य योजना काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो?

प्रश्न३: पाल्य १८ वर्षांचा झाल्यावर खात्यावरील व्यवहार कसे असतील?

पाल्य १८ वर्षांचा झाल्यावर हवे असेल तर हे खाते त्या सज्ञान मुलाच्या/मुलीच्या नावाने आधीच्या एनपीएस खात्याच्या टीअर -१ मध्ये वर्ग करता येते. तसेच संचित रक्कम जर रु.२.५ लाखापेक्षा कमी असेल तर सगळी रक्कम काढून खाते बंद करता येते मात्र जर संचित रक्कम रु.२.५ लाखापेक्षा जास्त असेल तर २०% रक्कम काढता येते व उर्वरित ८०% रक्कमेच्या अॅन्युटी घ्याव्या लागतील.

प्रश्न४: गुंतवणुकीचे काय पर्याय आहेत? व यातून किती रिटर्न (परतावा) मिळेल?

गुंतवणुकीसाठी एपीएसप्रमाणे ऑटो व अॅक्टीव्ह पर्याय असून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य तो पर्याय आपण निवडू शकता. (अॅक्टीव्ह पर्यायात अॅग्रेसीव्ह,मॉडरेट व कॉन्झ्रव्हेटीव हे तीन पर्याय आहेत) आपण निवडलेल्या पर्यायानुसार एनपीएससारखाच रिटर्न आपण घेतलेल्या रिस्कनुसार मिळेल. ऑटो पर्यायामध्ये १०%च्या जवळपास रिटर्न मिळू शकतो.

हेही वाचा >>>माझा पोर्टफोलियो – उज्ज्वल भवितव्य, अंगभूत मूल्य : पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड

प्रश्न५:  एनपीएसप्रमाणे एनपीएस वात्सल्यमधील गुंतवणूक करसवलतीस पात्र असेल का?

एनपीएस वात्सल्यमधील गुंतवणूक एनपीएसप्रमाणे सध्यातरी कर सवलतीस पात्र असणार नाही.

प्रश्न६: पाल्याच्या वयाच्या १८ वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास अथवा पालकाचा मृत्यू झाल्यास खात्याचे काय होईल?

पाल्याचा वयाच्या १८ च्या आत दुर्देवी मृत्यू झाल्यास सर्व रक्कम पालकांना मिळेल याउलट जर पाल्य १८ वर्षाचा होण्याआधी पालकांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित नैसर्गिक पालकाला रक्कम मिळेल.