प्रमोद पुराणिक
वॉरेन बफे यांच्याबद्दल आतापर्यंत एवढे लिखाण प्रसिद्ध झाले आहे की, पुन्हा वेगळे काय लिहायचे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु तरीसुद्धा बफे यांच्याकडून काय घ्यायचे, बाजारात त्यांचे काय योगदान आहे, बफे यांची गुंतवणूक विचारसरणी आपल्या बाजारासाठी योग्य की अयोग्य, या काही महत्त्वाच्या विषयांवर लिहिणे आवश्यक आहे.
बर्कशायर हॅथवेज या कंपनीची ५ मे २०२४ या दिवशी वार्षिक सभा सुरू होती. १९७० पासून आजपर्यंत या कंपनीचे अध्यक्षपद बफे यांच्याकडे आहे. वय वर्षे ९४. वार्षिक सभेत त्यांनी त्यांच्या भागधारकांना सांगितले, पुढील वर्षी तुम्ही सर्व भागधारक वार्षिक सभेला उपस्थित राहणार आहात. आणि मीसुद्धा राहणार आहे. जन्म आणि मृत्यू परमेश्वराने स्वतःच्या हातात ठेवलेले निर्णय आहेत. परंतु तरीसुद्धा ५८व्या किंवा ६०व्या वर्षी निवृत्तीनंतर आता सर्व संपले. आवराआवर करायची, अशी आपल्याकडे बहुसंख्य लोकांची विचारसरणी असते. अशावेळेस वयाच्या ९४व्या वर्षी पुढच्या वर्षी मी येणार आहे असे सांगणे हा वेडेपणा नसतो, तर तो दुर्दम्य आशावाद असतो.
हेही वाचा >>>Money Mantra : युनिफाईड पेन्शन स्कीमची रक्कम कशी ठरवली जाते?
आपल्याकडे श्रीमंत झालेली व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीने योग्य मार्गाने संपत्ती कमावली आहे. या वाक्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. बफे यांनी वयाच्या १०व्या वर्षी शेअर बाजार बघितला होता. कारण त्यांचे वडील शेअर दलाल होते. लहानपणी बफे यांनी एक पुस्तक वाचले होते. ते पुस्तक वाचनालयातून आणले होते. १ हजार डॉलर्स कमावण्याचे १०० मार्ग असे त्या पुस्तकाचे शीर्षक होते. पैसे कमावण्यासाठी बफे यांनी अनेक व्यवसाय केले. पण आश्चर्य असे की ज्या वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राचे लहानपणी त्यांनी वाटप केले, त्या कंपनीच्या संचालक मंडळात जाण्याची त्यांना संधी मिळाली.
वर्षानुवर्षे बफे यांची सोबत करणारे चार्ली मुंगेर आता हयात नाही. परंतु त्या दोघांची असलेली मैत्री वार्षिक सभेत एकमेकांची थट्टा करणे, हास्यविनोद करणे यापेक्षाही काय महत्त्वाचे होते तर ते म्हणजे दोघांची गुंतवणूक निर्णय घेण्याची अफाट क्षमता. आपल्या या स्तंभातून या अगोदर चार्ली मुंगेरवर लिखाण (अर्थ वृत्तान्त, २ ऑक्टोबर २०२३) केलेले आहे.
हेही वाचा >>>निर्ढावलेले आणि हेतुपुरस्सर कर्जबुडवे
बफे यांची गुंतवणूक विचारसरणी शेअर्स खरेदी करा आणि सांभाळा या विचारसरणीवर आधारलेली आहे. परंतु याचा अर्थ बफे शेअर्सची कधी विक्री करत नाही असे मात्र नाही. अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वी ॲपल कंपनीच्या शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणात करून बफे यांनी हातात रोकड राखून ठेवली होती. या मोठ्या निर्णयामुळे अनेकांनी असा गैरसमज करून घेतला तो म्हणजे ‘बाजारात मंदीची लाट येणार आहे.’ परंतु तसे काही घडलेले नाही.
बफे यांच्या रोकड बाळगून राखण्याच्या या निर्णयाचे भारतीय गुंतवणूकदारांनी अनुकरण करावे अशी आवश्यकताच नाही. या स्तंभातून या अगोदर अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या गुंतवणूकदारांवर लेख प्रसिद्ध करताना वेगवेगळ्या पद्धतीचा ऊहापोह केलेला आहे. बफे यांच्या मूल्यविरुद्ध वृद्धी गुंतवणूक शैलीमध्ये मूल्यांवर आधारित गुंतवणूक या पद्धतीचा कट्टर पुरस्कार केला गेला आहे. ही गोष्ट विचारात घेतली तर त्यांच्या ताज्या निर्णयाची कारणे समजून घेता येऊ शकतील. बफे यांचा जन्म आणि त्यानंतर अमेरिकेतली मंदी आणि त्यानंतर बफे यांचे गुरू ग्रॅहम, त्यांची विचारसरणी या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे मूल्यांवर आधारित गुंतवणूक पद्धतीकडे वळण्याचा हा पायंडा म्हणता येईल. तो काळ असा होता की, कर्जरोखे सुरक्षित आणि शेअर गुंतवणूक धोकादायक या विचाराला सर्वमान्यता होती.
शेअर बाजाराच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्यामुळे त्या काळात शेअर्सची खरेदी केल्यानंतर शेअर्स सांभाळणे ही पद्धत वापरली जायची. आज गुंतवणूकदाराला शेअर्स सांभाळणे हे सोपे राहिलेले नाही. कारण प्रलोभने खूप आहेत. आणि गुंतवणूकदार चंचल वृत्तीचा झालेला आहे.
बफे यांनी बऱ्याच वेळा असे लिहिलेले आहे की, मी अमेरिकत जन्माला आलो. योग्य वेळेस शेअर बाजारात आलो. मला मिळालेले यश अमेरिकन अर्थव्यस्थेमुळे मिळालेले यश आहे. याचाच अर्थ असा की बफे यांचा जन्म अशा एखाद्या देशात झालेला असता की ज्या ठिकाणी शेअर बाजारच नाही किंवा जपानसारख्या देशात जेथे वर्षानुवर्षे शेअर बाजार मंदीत राहिलेला आहे, तर कदाचित आपल्याला बफे आणि त्यांची प्रगती परिचितही नसती.
शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्या अमेरिकेतल्या आणि भारतातल्या या संबंधीसुद्धा विचार केला तर अमेरिकेतल्या कंपन्या मोठ्या आहेत. बाजारात शेअर्सची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. बऱ्याच वेळा बफे भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध होतात. परंतु बफे यांनी चीनमध्ये गुंतवणूक केली, जपानमध्ये गुंतवणूक केली भारतात मात्र अजूनपर्यंत केली नाही. हे कटू सत्य आहे.
अमेरिकेतल्या एका मोठ्या संस्थेबाबत आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. अशावेळेस अमेरिकी बाजार नियंत्रकांनी वॉरेन बफे यांना मदतीसाठी बोलावले. बफे यांनी त्या संस्थेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले. त्यामुळे बफे यांना जेवढा फायदा झाला त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी शेअर बाजार स्थिर राहण्यास मदत झाली. आपल्याकडे असे काही होईल का? या प्रश्नाला उत्तर शोधणे कठीण आहे.
बफे यांनी केलेली प्रत्येक कृती चांगलीच असते असे समर्थन आंधळेपणाने केले जाऊ नये. हे सांगण्याचा उद्देश आहे, त्यामुळे काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. डाउ जोन्स ३० या निर्देशांकात बर्कशायर हॅथवेज या शेअरचा कधीच समावेश होणार नाही. कारण त्या शेअरची बाजारातली उपलब्धता कमी आहे. त्याचबरोबर शेअर्स विभागणी, हक्काच्या शेअर्सची विक्री, बोनस शेअर्सचे वाटप, या भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आवडणाऱ्या गोष्टी बफे करीत नाहीत आणि त्यामुळे शेअर्सचा बाजारभाव छोट्या गुंतवणूकदारांच्या ताकदीपेक्षा जास्त असतो. तथापि बर्कशायर हॅथवेजच्या शेअर्समध्ये छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येते. परंतु त्या शेअर्सला काही हक्कांपासून वंचित ठेवले जाते. म्हणून दोन बाजारभाव ए आणि बी असे जाहीर होतात याची अनेकांना कल्पना नाही.
सर्वात शेवटी बफे ज्या कंपन्या भरघोस लाभांशाचे वाटप करतात, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून लाभांशाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमावत असतात. परंतु बर्कशायरच्या गुंतवणूकदारांनी लाभांशाची मागणी करू नये अशी बफे यांची इच्छा असते. भारतीय गुंतवणूकदारांना हे चालणार आहे काय?
शेअर्सची किंमत जास्त ठेवून एखाद्या कंपनीची खरेदी करायची आणि त्या कंपनीला बर्कशायर हॅथवेजचे शेअर द्यायचे असा प्रकार आपल्याकडे होत नाही. वॉरेन बफे आणि चार्ली मुंगेर यांची ४० पेक्षा जास्त पुस्तके वाचून त्यावर आधारित हा लेख असून सारांशरूपाने काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भवितव्यात असे घडू शकेल. भारतातल्या कंपन्यांमध्ये बफे यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. इन्शुरन्सच्या व्यवसायामुळे आणि विशेषतः त्या व्यवसायात खेळते भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. त्याचा वापर करून गुंतवणूक वाढवली जाते. त्यामुळे बफे यांची कंपनी जर भारतात आली तर पहिली गुंतवणूक विमा क्षेत्रात होऊ शकेल. पण सरकारची इच्छा असली तरच. कारण बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची उपलब्धता असावी. खरेदी-विक्री सहजपणे व्हावी ही काही मिनिटांत प्रचंड मोठी गुंतवणूक करणाऱ्या बफे यांची इच्छा असते. बघू या भविष्यात काय होते ते.
© The Indian Express (P) Ltd