तरुणपणी तयार केलेल्या ‘बकेट लिस्ट’मधील काही शिल्लक गोष्टी रिटायर झाल्यावर करण्यासाठी ठेवलेल्या असतात. शेअर बाजाराचे थ्रिल अनुभवणे ही त्यापैकी एक. नोकरीसाठी लोकलने प्रवास करत असताना ऐकलेल्या मार्केटवरील रंगलेल्या चर्चा, ऑफिसमधील यंग जनरेशने मारलेल्या बढाया, ऑफिसमधील एखाद्या सीनियर माणसाचे बाजारात किती एक्सपोजर आहे याबद्दल चालत असलेली कुजबुज, हर्षद मेहतावर प्रसारित झालेल्या चित्रपटातील थरार अनुभवताना आपणही थोडे नशीब अजमावायला हरकत नाही अशी इच्छा झालेली असते. काही धाडसी यात उडी घेतात व नशीब काढतात, तर बरेच जण निवृत्त झालो, थोडा पैसा हाताशी आला व निवांत वेळ मिळाला की यात पडू असा बाळबोध विचार करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही धाडसी लोक स्वत:ला वेळ नाही म्हणून आपला पैसा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी दुसऱ्याकडे सोपवून बऱ्याच वेळा पस्तावलेलेही असतात; पण नंतर स्वतंत्रपणे पुन्हा सुरुवात करायला उत्सुक असतात. अशा सेकंड इनिंग खेळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे थोडेसे मार्गदर्शन.

ज्येष्ठांनी या क्षेत्रात का उतरावे?

१. निवृत्तीनंतर शरीर धडधाकट ठेवण्यासाठी जसा हलका व्यायाम, चालणे महत्त्वाचे तसा मेंदू तल्लख ठेवण्यासाठी व आपल्या बुद्धीचा सद्उपयोग करण्यासाठी शेअर बाजार हादेखील एक उत्तम मार्ग आहे. निरनिराळ्या कंपन्यांबद्दल वर्तमानपत्र, टीव्ही व सोशल मीडियामधून मिळणारी माहिती संकलित करणे, देशातील व जगातील आर्थिक घडामोडींवर नजर ठेवणे, कंपन्यांचे तिमाही व वार्षिक निकाल या सर्व अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. त्या तुमच्या मेंदूला उत्तम खुराक देतील.

२. महागाईशी सुसंगत राहणारे उत्पन्न मिळवायचे असेल तर आपली काही गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या पर्यायांमध्ये असायलाच हवी. मग ती थेट शेअर्स घेऊन किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाद्वारे करता येईल.

हेही वाचा… Money Mantra: UPI, ई- वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्ड आणि बरेच काही… कसे कराल डिजिटल व्यवहार? (भाग दुसरा)

३. आरोग्य सुविधांमधील वाढ आणि वाढलेले जीवनमान यामुळे निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांचे आर्थिक नियोजन प्रत्येकाकडे असायला हवे. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा केवळ बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेला असेल तर तो उर्वरित आयुष्य समाधानाने जगायला पुरेलच असे नाही.

४. शेअर बाजारातील गुंतवणुकीत रोकडसुलभता असते. दोन ते तीन दिवसांत आपण पैसे मोकळे करू शकतो; पण इतर मुदत ठेवींत अशी सुविधा मिळत नाही.

५. तुमच्या कार्यकाळातील अनुभवाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. एखाद्याला असलेल्या बँकिंग, विमा, औषधनिर्मिती, वाहन, माहिती तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील अनुभवाचा त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फायदा करून घेता येतो.

हेही वाचा… Money Mantra: ‘डिजिटल रुपी’मधील व्यवहार कसे कराल? (भाग तिसरा)

६. लाभांश (डिव्हिडंड) उत्पन्न: नियमितपणे चांगले लाभांश (डिव्हिडंड) देणाऱ्या टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिरो मोटर्स, बालकृष्ण इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्या तुम्हाला वार्षिक रोकड मिळण्याचा मार्ग ठरू शकतात; पण त्यांची खरेदी योग्य वेळी करणे महत्त्वाचे.

७. प्राप्तिकराचा फायदा: शेअर बाजारातील खरेदी-विक्रीच्या नफ्यावर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के, तर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर भरावा लागतो. तुमचे उत्पन्न जर वरच्या पातळीवर असेल तर बाकी सर्व उत्पन्नांवर २० ते ३० टक्के कर भरावा लागतो.

काय खबरदारी घ्यावी?

दैनंदिन खर्चाची तरतूद: तुम्हाला दरमहा मिळणारे निवृत्तिवेतन (पेन्शन) नसेल तर ते मिळण्याचा बंदोबस्त तुम्ही सर्वात आधी करायला हवा. त्यासाठी वयवंदना योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, रिझर्व्ह बँकेचे रोखे, बँकेतील किंवा काही नामांकित कंपन्यांमधील मुदत ठेवी असे प्रकार उपलब्ध आहेत.

आरोग्य विमा

आरोग्य विम्याची पॉलिसी निवृत्त व्हायच्या काही वर्षे आधी काढलेली असली तर ते उपयुक्त ठरेल. तरुणपणीच मोठ्या मुदतीची पॉलिसी काढलेली असेल तर जास्त चांगले. कारण त्यामुळे वैद्यकीय तपासणी किंवा मधुमेहासारख्या आजारांमुळे पॉलिसीवर येणारे निर्बंध कमी असतात. जर अशी पॉलिसी नसेल तर आपल्या मुलांना त्यांच्या कंपनीतर्फे काढल्या जाणाऱ्या पॉलिसीमध्ये आपले नाव जरूर घालायला सांगा.

भविष्यातील मोठे खर्च

मुलामुलींची लग्ने वा घरासाठी लागणारे पैसे जर नजीकच्या काळात लागणार असतील तर ते शेअर बाजारात अजिबात गुंतवू नका, कारण तुमच्या गरजेच्या काळात बाजार खाली गेला तर तुम्हाला गुंतवणूक तोट्यात विकावी लागेल. अशा पैशांसाठी खर्चाच्या कालमानाप्रमाणे बँकेतील ठेवी, लिक्विड फंड असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do before entering the stock market mmdc dvr