गुंतवणूकदारांना अनेकदा विविध नाममुद्रा, गुंतवणूक मंच, आर्थिक प्रभावक (फिनफ्लुएन्सर) आणि अनेकदा सल्लागारदेखील गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करताना दिसतात. मात्र, केलेल्या गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचे याबाबत फारशी चर्चा होत नाही. बरेच तज्ज्ञ असेही सुचवतात की, विक्री अनावश्यक आहे. जर खरेदी करतानाचा विचार योग्यरीत्या केला असेल, तर विकण्याची वेळ-जवळजवळ कधीच नाही, असे फिलीप फिशर यांचे सुवचन आहे. दुसरीकडे, झिग झिग्लरसारखे व्यावहारिक विचारवंत म्हणतात की, तुम्हाला सुरुवात केव्हा करायची हे कदाचित उमगत नसेलही, पण केव्हा थांबायचे हे माहीत असणे आवश्यक आहे! सामान्य माणसाला कोण बरोबर आणि कोण चूक आहे याची निवड करायला लागेल किंवा नेहमीप्रमाणे, दोघेही आपापल्या पद्धतीने बरोबर आहेत, असे म्हणावे लागेल. तर आज गुंतवणुकीतून नेमके केव्हा बाहेर पडायचे हे जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. उद्दिष्टे साध्य होणे

निवृत्ती, गृह खरेदी करणे किंवा शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणे या स्पष्ट उद्दिष्टांसाठी तुम्ही गुंतवणूक केली होती का? तसे असल्यास, ध्येय साध्य झाल्यावर गुंतवणूकीतून बाहेर पडा. बाजारातल्या अस्थिरतेची जोखीम कमी करण्यासाठी उद्दिष्ट साध्य होण्याची वेळ असल्याने मालमत्ता तुलनेने कमी अस्थिर (रोख्यात) हस्तांतरित करणे योग्य असते.

२. नफावसुली

कुठल्याही उद्दिष्टांविना केवळ नफा मिळवणे या उद्देशाने गुंतवणूक केली असेल तर आणि येणारा काळ प्रतिकूल असेल तर खालील गोष्टी पडताळून मूल्यमापन करावे,

अ) किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशो), हे त्या उद्योग क्षेत्राच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्यास, अतिमूल्यांकनाचा धोका असू शकतो.

ब) किंमत-पुस्तकी किंमत गुणोत्तर ((पी/बी रेशो) – उच्च गुणोत्तर हे आंतरिक मूल्याच्या तुलनेत अतिमूल्यांकनाचे संकेत देते.

क) डीसीएफ (डिस्काऊंटेड कॅशफ्लो) विश्लेषण म्हणजेच जर भविष्यातील होणाऱ्या नफ्याच्या आधारे समभागांची किंमत त्याच्या वाजवी मूल्यापर्यंत पोहोचली असेल, तर बाहेर पडणे विवेकपूर्ण असू शकते.

मिळालेल्या रकमेची हुशारीने पुन्हा गुंतवणूक करा आणि हे करण्यापूर्वी कर दायित्वाच्या परिणामांचा विचार करा.

बाजारातील तेजीदरम्यान, समभाग मालमत्ता वर्गात कायम राहण्यासाठी आणि नफा मिळविताना टप्प्याटप्प्याने विक्री करा.

३ . नुकसान प्रतिबंध धोरण (स्टॉप-लॉस)

नुकसान प्रतिबंध अर्थात स्टॉप लॉस धोरण नुकसान एका मर्यादेत राखण्यासाठी पूर्वनिर्धारित नुकसानाची पातळी गाठल्यास विक्री करावी.

उदाहरण: जर एखाद्या कंपनीचा शेअर १० टक्के स्टॉप लॉससह १०० रुपयांना खरेदी केला गेला असेल, तर तो ९० रुपये झाल्यास विकावा, ज्यामुळे भविष्यात मोठे नुकसान टाळता येईल.

गुंतवणुकीच्या प्रकारावर आधारित स्टॉप-लॉस पातळी निश्चित करा. उदाहरणार्थ अस्थिर समभागांसाठी ५-१५ टक्के, स्थिर ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांसाठी १५-२० टक्के जोखीम सहनशीलतेनुसार निश्चित करू शकता.

४. ढिसाळ कामगिरी :

वाजवी कालावधीनंतरही जर गुंतवणुकीची कामगिरी सातत्याने कमी होत असेल तर अशा गुंतवणुकीतून बाहेर पडणे योग्य ठरते.

अ) म्युच्युअल फंड-जर ते श्रेणीतील समतुल्य फंड आणि/ किंवा मानदंड सापेक्ष सातत्याने मागे पडत असतील तर.

ब) समभाग – काही दखल घ्यावी (रेड-फ्लॅग्ज) अशा गोष्टी असतील तर उत्पन्न आणि नफ्यात घट.

कर्जाची वाढती पातळी, बाजारातील नेतृत्व गमावणे, सुशासनाशी निगडीत समस्या (व्यवस्थापन, प्रवर्तकांकडून फसवणूक, नियामक समस्या)

५. पोर्टफोलिओ पुनर्संतुलन :

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसाठी नियतकालिक पुनर्संतुलन आवश्यक असते. जर एखादा मालमत्ता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असेल, तर त्यातील गुंतवणूक कमी करा आणि कमी प्रमाण असलेल्या मालमत्ता वर्गांकडे गुंतवणूक वळवा. उदाहरणार्थ जर समभागांच्या किमती वाढल्या तर काही समभागांची विक्री करणे आणि रोख्यांकडे गुंतवणूक वळवण्यामुळे संतुलन अधिक मजबूत होऊ शकते.

६. बाजार आणि आर्थिक परिस्थितीत बदल

आर्थिक बदल गुंतवणुकीच्या व्यवहार्यतेवर परिणाम करू शकतात. खालील परिस्थितीत जोखीम कमी करण्याचा विचार करा.

अ) वाढते व्याजदर-स्थावर मालमत्ता आणि भांडवल-केंद्रित उद्योग यांसारख्या क्षेत्रांची कामगिरी या परिस्थितीत कमी असू शकते.

ब) मंदीचे सावट- इन्वर्टेड यिल्ड कर्व किंवा ग्राहकांच्या खर्चात मोठी घट ही वित्तीय आवर्तनाशी निगडित समभागांमधून बाहेर पडण्याची वेळ असू शकते.

क) नियामकांकडून बदल-नवीन कायदे, कर धोरणे किंवा क्षेत्रीय नियम कंपन्यांच्या फायदेशीरतेवर परिणाम करू शकतात.

बाहेर पडण्याच्या निर्णयांना विलंब करणारे वर्तणुकीशी निगडित पूर्वग्रह आम्ही अनेकदा गुंतवणूकदारांना मानसिक पूर्वग्रहांमुळे नुकसानीतील गुंतवणूक न विकता राखून ठेवणे टाळा असा सल्ला देतो.

अ) तोटा टाळणे- तोट्यात विक्री करून भांडवलाचे पुनर्वितरण करण्याऐवजी पुनर्प्राप्तीची आशा बाळगून वाट पाहात राहणे.

ब) पुष्टीकरण पूर्वग्रह (रिसन्सी बायस)-नकारात्मक संकेतांकडे दुर्लक्ष करणे आणि केवळ सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रित करणे.

क) अँकरिंग बायस- मागील उच्च किंमत पातळीच्या खाली विक्री करण्यास विरोध करणे.

तुम्हाला एव्हाना कळाले असेलच की, गुंतवणुकीतून बाहेर पडणे हे गुंतवणूक करण्याएवढेच महत्त्वाचे आहे. तुमच्या पोर्टफोलिओचा वेळोवेळी आढावा घेणे आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेणे यामुळे दीर्घकालीन परतावा सुधारू शकतो. जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

यशस्वी गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!