यावर्षी शेअर बाजारांनी गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून लाभ देण्यास सुरुवात केली आहे. येत्या वर्षभराच्या काळात बाजार असेच तेजीत राहतील असा आशावाद दलाली पेढ्यांनी सुद्धा नोंदवला आहे. विक्रम संवत २०८० गुंतवणूकदारांसाठी असेच लाभदायक ठरेल हीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज या दलाली पिढीने पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत निफ्टी २१५०० ही पातळी ओलांडेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
बँक, पायाभूत सुविधा, ऊर्जा निर्मिती या कंपन्यांचे शेअर्स वाढतील अशी अपेक्षा या कंपनीने व्यक्त केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, कोरोमंडल इंटरनॅशनल, भारत डायनामिक्स, सेंचुरी प्लायबोर्ड या शेअर्सना आयसीआयसीआय सिक्युरिटीज ने आपली पसंती दर्शवली आहे. या निमित्ताने कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरतील याचा आढावा घेऊया.
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक नोंदवणारी कंपनी म्हणून टीसीएस प्रसिद्ध आहेच. कंपनीचा गेल्या दहा वर्षातील विक्री, नफा लक्षात घेतल्यास बाजारातील सर्वाधिक पसंत ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीचे नाव घ्यावे लागेल. तंत्रज्ञान जसे बदलते त्यानुसार कंपनीने आपला व्यवसाय बदलला आहे. पुढच्या तीन वर्षात कंपनीचा व्यवसाय पंधरा टक्क्यांच्या आसपास सतत वाढता राहणार आहे. यामुळेच गुंतवणूकदारांसाठी हा शेअर लाभदायक ठरेल.
हेही वाचा… Money Mantra: ‘ही’ कर सवलत तुम्हाला माहितेय का?
आयटीसी
ही कंपनी मूळची तंबाखू आणि सिगरेट व्यवसायातील असली तरी आता ही एफ.एम.सी.जी. सदरातील कंपनी म्हणूनच ओळखली जाते. कंपनीचा एकूण व्यवसाय गेल्या दहा वर्षात सतत वाढता राहिला आहे व दहा वर्षातील नफ्यातील वाढ दहा टक्के एवढी कायम टिकली आहे. या वर्षात कंपनीने हॉटेल व्यवसाय आपल्या मुख्य व्यवसायापासून वेगळा करून बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात कंपनीचा यशाचा आलेख असाच पुढे जाईल यात शंका नाही.
मारुती सुझुकी इंडिया
भारतातील सर्वसामान्यांची गाडी असे बिरुद मिरवणाऱ्या मारुतीने आपल्या व्यवसायाचे स्वरूप बदलून आता स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUVs) आणि सेदान या श्रेणीतील गाड्यांकडे आपले लक्ष वळवले आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक वेहिकल्सही बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. गेल्या दहा वर्षात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना सरासरी १२% चा फायदा करून दिला आहे. कंपनीच्या विक्री आणि नफ्यामध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसत आली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा
भारतातील सर्वात मोठी ट्रॅक्टर बनवणारी जुनी आणि विश्वासार्ह कंपनी म्हणून याचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर ट्रक, प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वेहिकल्स या व्यवसायामध्ये कंपनीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून न राहता कंपनीला आशियाई आणि दक्षिण अमेरिकी बाजारांमध्ये सुद्धा आगेकुच करायची आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी कंपनी म्हणून या कंपनीकडे बघितले जाते. येत्या काही वर्षात संरक्षण विषयक उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे व यामध्ये मोठी लाभार्थी म्हणून ही कंपनी उदयाला येणार आहे. युरोप अमेरिकेतील कंपन्यांशी तंत्रज्ञान विषयक सहकार्य करार केल्यामुळे अधिकाधिक ऑर्डर्स कंपनीला मिळणार आहेत.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स
डिझेल इंजिनाच्या निर्मितीमध्ये आघाडीचे नाव म्हणजेच किर्लोस्कर. प्रदूषणाचे नवे मानदंड सरकारने अमलात आणल्यावर नवीन प्रकारच्या इंजिनाची निर्मिती करण्यात ही कंपनी आघाडीवर असणार आहे.
लार्सन अँड टुब्रो
भारतातील जवळपास सर्वच आघाडीचे पायाभूत सुविधानिर्मितीचे श्रेय या कंपनीकडे जाते. सध्याच्या स्थितीला कंपनीकडील एकूण ऑर्डर सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या घरात आहेत. आगामी काळात पायाभूत सोयी सुविधा, हेवी इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्र यामध्ये कंपनीचा व्यवसाय सतत वाढणार आहे.
टायटन कंपनी
भारतातील उच्च दर्जाचे दागिने आणि घड्याळ बनवणाऱ्या कंपनीने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या शहरांबरोबरच निमशहरी / उदयाला येणाऱ्या शहरी भागांत आपली दालने विकसित करायला सुरुवात केली आहे. फास्टट्रॅक, तनिष्क, मिया या ब्रँडमुळे कंपनीचे बाजारपेठेतील स्थान अधिकच बळकट होणार आहे.
येत्या वर्षात जागतिक स्तरावरील अस्थिरता संपुष्टात येऊन पुन्हा एकदा बाजाराला वरची दिशा मिळावी हीच सदिच्छा.
*या लेखात ज्या कंपन्यांविषयी माहिती दिली आहे ते शेअर्स गुंतवणूकदारांनी विकत घ्यावे असा सल्ला देण्याचा लेखाचा उल्लेख नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जोखमीवर व अभ्यास करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.