देवदत्त धनोकर
सुरक्षितता, तरलता आणि वृद्धी या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आपण आपल्या विविध आर्थिक उद्दिष्टांकरिता बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय निवडत असतो. आजच्या लेखात आपण आर्थिक नियोजनात पोस्टाच्या योजनांचा समावेश कशाप्रकारे करू शकतो याची माहिती जाणून घेऊया. पोस्ट खात्यामार्फत देखील आपल्याला बचतीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बचत खाते : बँकेप्रमाणेच पोस्टात देखील बचत खाते उघडून आपण अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठीची रक्कम ठेवू शकतो. पुढील १ ते २ वर्षात साध्य करावयाच्या आर्थिक उद्दिष्टांकरिता बचत खाते उपयुक्त ठरते.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव (नॅशनल सेव्हिंग) : अल्पकालीन आणि मध्यमकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी पोस्टाची मुदत ठेव उपयुक्त आहेत. पुढील ५ वर्षात साध्य करावयाच्या उद्दिष्टांसाठी राष्ट्रीय बचत मुदत ठेवींमध्ये तुम्ही बचत करू शकता.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (नॅशनल सेव्हिंग रिकरिंग): अल्पकालीन उद्दिष्टांकरिता दरमहा ठरावीक रकमेची बचत करून आवर्ती ठेवींच्या मदतीने आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात. उदा. शाळेची फी भरण्यासाठी देखील याचा फायदा घेता येईल. जर शाळेची फी १,२०,००० रुपये असेल तर दरमहा १०,००० रुपयांची बचत करून आवर्ती ठेवींच्या मदतीने उद्दिष्ट साध्य करता येईल.
मासिक उत्पन्न योजना (नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम) : एकरकमी बचत करून दरमहा उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. ज्येष्ठ नागरिक ज्यांना घरखर्चासाठी दरमहा उत्पन्नाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. सध्या या योजनेत ७.४ टक्के दराने व्याज देण्यात येते. एक व्यक्ती यात जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची बचत करू शकते आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाखांची बचत करता येते.
उदा. सुरेशराव ९ लाख रुपयांची बचत या योजनेत करू शकतात आणि जर सुरेशरावांनी त्यांच्या पत्नीसह या योजनेत बचत केली तर कमाल १५ लाखांची बचत सुरेशराव व त्यांची पत्नी नेहा एकत्रितपणे करू शकतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम) : ज्येष्ठ नागरिकांना दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. ६० वर्षावरील भारतीय नागरिक या योजनेत बचत करू शकतात. (* अटी लागू – काही विशिष्ट अटी पूर्ण करणारी ६० वर्षाखालील व्यक्तीदेखील सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये बचत करू शकते.) सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना दरमहा उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे .
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) : सेवानिवृत्ती या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये अनेक जण बचत करतात. नोकरीला लागल्यापासून दरमहा थोडी थोडी बचत करून सेवानिवृत्तीपर्यंत एक मोठी रक्कम साठवता येते. ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांना आणि अगदी नातवांना देखील पीपीएफमध्ये बचत करण्याची शिफारस करतात. आजच्या काळातही पीपीएफमध्ये बचत करणे फायदेशीर असले तरीही केवळ पीपीएफच्या मदतीने सेवानिवृत्तीचे नियोजन आजच्या तरुणाईला शक्य होणार नाही याकरिता त्यांनी पीपीएफसोबत गुंतवणुकीच्या इतर पर्यायात देखील गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. वाढती महागाई, आधुनिक जीवनशैलीवरील वाढलेला खर्च आणि पीपीएफमधील कमी झालेले व्याजदर या प्रमुख कारणांसह अन्य कारणांमुळे आजच्या तरुणांनी स्वतःच्या सेवानिवृत्तीसाठी केवळ पीपीएफवर अवलंबून न राहता गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजना – बचतीच्या मदतीने मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाची तरतूद करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारने उपलब्ध करून दिली आहे . ज्यांची मुलगी १० वर्षापेक्षा लहान आहे असे पालक आपल्या मुलीच्या नावे या योजनेत बचत करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर एप्रिल ते जून तिमाहीत ८ टक्के व्याज मिळणार आहे.
पोस्टाच्या बचत योजनांबाबत महत्त्वाचे मुद्दे
पोस्टाच्या विविध बचत योजना आहेत, त्यांचा आपण आपल्या आर्थिक नियोजनात प्रभावीपणे वापर करू शकतो.
पोस्टाच्या बचत योजना १०० टक्के सुरक्षित असतात याकरिता तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक यात बचत करतात. अल्पकालीन आणि मध्यमकालीन उद्दिष्टांसाठी या योजना निश्चितच उपयुक्त आहेत. परंतु दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी बचतीसोबतच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी विशेषतः तरुण गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या योजनेत पूर्वीपेक्षा व्याजदर कमी झाले आहेत हे लक्षात घेऊन दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायात गुंतवणूक करण्याची दक्षता घ्यावी.
आणखी वाचा-पोस्ट ऑफिसच्या ATM Card वर किती पैसे आकारले जातात जाणून घ्या
पोस्टाच्या योजनेत बचत करण्यापूर्वी घ्यायची दक्षता
पोस्टाच्या योजनेत बचत करण्यापूर्वी पुनर्गुंतवणुकीतील जोखीम (रीइन्व्हेस्टमेंट रिस्क) लक्षात घ्यावी. अनेक ज्येष्ठ नागरिक सध्याचेच व्याजदर भविष्यात मिळतील असे गृहीत धरून बचत करतात. प्रत्यक्षात मात्र मुदतपूर्तीनंतर त्यावेळच्या व्याजदराने ( भविष्यातील व्याजदराने ) बचत करावी लागते. भविष्यातील व्याजदर कमी असू शकतात आणि यालाच आपण पुनर्गुंतवणुकीतील जोखीम असे म्हणतो. वाढलेली महागाई आणि बचतीच्या पर्यायात व्याजदर कमी होणे यामुळे आर्थिक नियोजनात समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता ज्येष्ठ नागरिक जे दरमाहाच्या खर्चासाठी बचतीवरील व्याजावरच अवलंबून आहेत अशा व्यक्तींनी आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने आपल्या बचतीचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करावे. पोस्टाच्या योजनांचा आर्थिक नियोजनात समावेश करताना तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.
लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार
dgdinvestment@gmail.com