गिरीश वालावलकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाच्याच आयुष्यात मोठा खर्च करण्याचे घर खरेदी, लग्न, आजारपण यासारखे प्रसंग येत असतात. कोणताही मोठा खर्च करण्यासाठी आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे- आपण तोपर्यंत केलेल्या बचतीतील पैसे वापरणे आणि दुसरा म्हणजे – कर्ज घेऊन त्या कर्जाद्वारे आवश्यक तितकी रक्कम उभी करणे. आपल्या जवळच्या बचतीतूनच खर्च करून आपली गरज भागवली तर डोक्यावर कर्जाचा बोजा घेणं, आणि ते फेडण्यासाठी मासिक हप्ता भरत राहणं, टाळता येतं. त्यामुळे कर्जफेडी साठी कळत नकळत येणाऱ्या मानसिक तणावापासून आपण मुक्त राहू शकतो. हा स्वतःजवळच्या बचतीतून आपली गरज भागवण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. कर्ज घेतल्यावर त्यावरचं व्याज भरणं अपरिहार्य असतं. या व्याजापोटी आपल्याला मोठी अतिरिक्त रक्कम भरावी लागते. स्वतःच्या बचतीतून पैसे खर्च केल्यास व्याजाची अतिरिक्त रक्कम भरायची गरज उरत नाही. त्यामुळे स्वतः जवळचे पैसे वापरणं नेहमीच किफायतशीर ठरतं.

कर्जाऊ घेतलेली रक्कम आपल्याला भविष्यात आणि हळूहळू म्हणजे हप्त्याहप्त्याने फेडायची असते. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यातलं गांभीर्य आपल्याला पुरेसं जाणवत नाही. आपण हप्ते देण्याबरोबर इतरही वायफळ खर्च करत राहतो. त्याचे परिणाम पुढे कुठेतरी दिसतात. बऱ्याचदा वेळेवर कर्जाचे हप्ते भरणं अवघड होऊन जातं. याउलट जेव्हा आपण आपल्या जवळचे बचतीतले म्हणजे आपल्या जवळचे पैसे खर्च करतो तेव्हा आपल्या जवळचे पैसे आता कमी झाले आहेत याची जाणीव होते. पुन्हा पुरेसे पैसे साठेपर्यंत आपण कळत नकळत आपल्या जवळचे पैसे विचारपूर्वक खर्च करतो.

आणखी वाचा-Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

बँकेकडून अथवा एखाद्या आर्थिक संस्थेकडून कर्ज घेतल्यानंतर बऱ्याचवेळा ती बँक अथवा संस्था आपल्या ‘क्रेडिट स्कोर ‘ चा नियमित आढावा घेत असते. आपला असा एखादा आढावा घेतला जातो आहे याची आपल्याला बऱ्याचवेळा कल्पना सुद्धा नसते. आपलं उत्पन्न , आपण करत असलेले खर्च आणि आपल्या जवळ उरत असलेली शिल्लक यांचं गणिती विश्लेषण करून बँक आपल्याला एक ‘स्कोअर’ म्हणजे अंक देते. त्या अंकाला आपला ‘क्रेडिट स्कोअर’ असं संबोधलं जातं. हा क्रेडिट स्कोअर म्हणजे आपली ‘आर्थिक पत’ असते. हा क्रेडिट स्कोअर बँक स्वतः किंवा ‘सिबिल (CIBIL ) ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ सारख्या एखाद्या अधिकृत संस्थेच्या सहाय्याने ठरवते. अधिक कर्ज घेण्याची आपली मर्यादा आणि आपण आधी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडण्याची क्षमता हे आपल्या क्रेडिट स्कोअर वरून ठरतं. जर आपला क्रेडिट स्कोअर खाली येऊ लागला तर आपला खर्च कमी करण्याची आणि बँक आपल्याला आपले आर्थिक व्यवहार सुधारण्याची समज देते. सुरवातीला ही समज सौम्य शब्दात असते पण नंतर गरज पडल्या आधी सौम्य शब्दात आणि गरज पडल्यास कडक शब्दात दिली जाते. आवश्यकता भासल्यास आपल्या खर्चावर निर्बंध आणण्याचा निर्णय सुद्धा बँक घेऊ शकते. स्वतःच्या बचतीतून खर्च केल्यास इतर कुणी आपला ‘क्रेडिट स्कोअर’ ठरवत नाही. आपली आर्थिक पत आपण स्वतःच जोखू आणि सांभाळू शकतो. आपल्या खर्चावर आणि आर्थिक व्यवहारांवर कुठलीही बँक अथवा आर्थिक संस्था निर्बंध घालू शकत नाही. आपले आर्थिक व्यवहार करण्याचं आपलं स्वातंत्र्य अबाधित राहतं.

परंतु, एखादा मोठा खर्च करण्यासाठी स्वतःच्या बचतीतून पैसे वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे आणि मर्यादा सुद्धा आहेत. एखादा मोठा खर्च आपल्या बचतीतून करण्याइतकी रक्कम साठवण्यासाठी सामान्य माणसाला दीर्घकाळ आणि नियमित बचत करावी लागते . त्यासाठी तो अनेक वेळा आपल्य इच्छा अपुऱ्या ठेवलेल्या असतात. बऱ्याच वेळा अनावश्यक आणि कधीतरी आवश्यक खर्चसुद्धा टाळलेला असतो. इतकंच नव्हे तर, आपल्या गरजा सुद्धा कमी केलेल्या असतात. ‘माणूस जेवढं साधं आणि काटकसरीने जगतो तितकी त्याची बचत अधिक होत जाते’ हे बचती मागचं सामान्य सूत्र आहे . परंतु असा काटकसरीने आणि नियोजनबद्ध खर्च करून सुद्धा माणूस किती बचत करू शकतो याला मर्यादा असतात.

आणखी वाचा-Money Mantra : इव्ही घ्यायची आहे. पण, तरीही…

प्रदीर्घ काळ काटकसरीने जगून बचत केली तरीही घरा सारखी आवश्यक पण महाग वस्तू खरेदी करण्या इतक्या रकमेची बचत करणं अवघड किंवा, कधीकधी, अश्यक्य असतं. त्याच्या बचतीची सर्व रक्कम घराच्या किमती पेक्षा कमी भरते. अशा वेळी, ही कमी पडणारी उर्वरित रक्कम उभी करण्यासाठी त्याला कर्ज घेण्याचा मार्ग निवडावा लागतो.

तसेच सर्वसाधारण पणे आपण आपली बचत रोख पैसे किंवा फक्त फिक्स डिपॉझिट असा स्वरूपात करत नाही. आपण आपल्या बचतीचे पैसे जागा, शेअर्स , सोने अशा मालमत्तेच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गुंतवलेले असतात. जेव्हा मोठ्या खर्चासाठी किंवा खरेदीसाठी रोख पैसे उभे करायची वेळ येते तेव्हा त्या मालमत्तांची विक्री करावी लागते. त्यावेळी या मालमत्तांची योग्य किंमत याची खात्री नसते. आपल्याला पैशाची गरज असल्यामुळे बऱ्याचवेळा त्या मालमत्ता पडत्या भावात सुद्धा विकाव्या लागतात. त्यांची कमी पडत्या भावात विक्री करण्यापेक्षा योग्य व्याजदराने कर्ज घेणं, बऱ्याचवेळा, अधिक किफायतशीर ठरू शकतं.

आपली संपूर्ण बचत एकाच कामासाठी किंवा एकाच खरेदी साठी वापरणं कधीकधी हानिकारक सुद्धा ठरू शकतं. माझ्या एका पन्नाशीच्या आसपासच्या एका मित्राने मुंबईतल्या उपनगरात एक फ्लॅट खरेदी केला. त्याचा पगार बऱ्यापैकी होता. त्याने पैसे काळजीपूर्वक वाचवले होते. त्यामुळे घराची किंमत आपापल्या बचतीच्या पैशातून त्याने एक रकमी चुकवली. त्याला कर्ज घेण्याची गरज पडली नाही . मात्र त्याची संपूर्ण बचत या घराच्या खरेदीमध्ये संपली. त्या नंतर एक दोन महिन्यातच त्याच्या मुलाला परदेशात एका नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळाला. मात्र मुलाची फी भरण्यासाठी, त्याला परदेशात पाठवण्यासाठी आणि त्याचा तिथला खर्च करण्यासाठी माझ्या मित्राकडे पैसे शिल्लक उरले नव्हते. त्याने बँकेकडून कर्ज घेतलं. पण बँकेच्या नियमा प्रमाणे शिक्षणाच्या एकूण खर्चापैकी ऐशी टक्के रकमेचं कर्ज मिळालं. उरलेले वीस टक्के त्याला स्वतःला द्यावे लागणार होते . पण ते वीस टक्के भरल्या नंतरच बँक उरलेले पैसे देणार होती . माझ्या मित्राकडे आता अजिबात पैसे शिल्लक नव्हते. शेवटी, ते वीस टक्के त्याला दुसऱ्या बँकेकडून पर्सनल लोनच्या स्वरूपात घ्यावे लागले. त्यासाठी खूप दराने व्याज भरावे लागले. त्याऐवजी घर घरेदी करताना जर त्याने काही रक्कम गृहकर्जाच्या स्वरूपात घेतली असती तर त्याला पर्सनल लोनच्या मानाने खूपच कमी दरात व्याज भरावं लागलं असतं.

आणखी वाचा-Money Mantra: झिरो इंटरेस्ट लोन काय असतं?

आता, कर्ज घेणं हे केवळ उद्योजक किंवा व्यापारी यांच्या पुरतंच मर्यादित न राहता आज तो आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन गेला आहे . आपण आपल्या करिअरच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घरासाठी , गाडीसाठी , मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी लहान मोठी कर्जे घेत असतो. कर्ज योग्य प्रकारे फेडलं तर आपली तात्कालिक गरज पूर्ण होतेच पण आपलं आयुष्यसुद्धा अधिक समृद्ध होतं पण जर कर्ज नीट फेडता आलं नाही तर ते फार मोठं ओझं होऊन जातं. त्याचा भर आपल्या स्वतःवरच नव्हे तर पूर्ण कुटुंबावर आणि मुलाबाळांच्यावर म्हणजे पुढच्या पिढीवर सुद्धा येतो. योग्य तितकंच कर्ज घेऊन ते योग्य रीतीने फेडून अधिक समृद्ध जीवन जगता येतं.

पूर्वी असं समजलं जायचं कि कर्ज घेतलेला माणूस आधी मनःशांती मग मित्र परिवार आणि त्यांनतर स्वतः कष्टाने कमवलेली संपत्ती सुद्धा गमवून बसतो पण आज परिस्थिती बदलते आहे. कर्जाचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. त्या सर्वांचा योग्य अभ्यास करून, आपली नेमकी गरज ओळखून , कर्ज फेडण्याचं सुयोग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास आपली मनःशांती स्थिर राहील, मित्रपरिवार अजून वाढेल आणि आपण अधिक संपती कमवून समृद्ध जीवन जगू शकतो !! ‘आनंदी गुंतवणूक’ या आपल्या सदराच्या पुढील भागात आपण त्या पर्यायांविषयी आणि त्यातून आपल्याला मिळू शकणाऱ्या समृद्धीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who determines your financial credit mmdc mrj
Show comments