-वसंत माधव कुळकर्णी

लार्जकॅप फंड गटाची १ एप्रिल २०२३ ते २८ मार्च २०२४ या सरलेल्या आर्थिक वर्षातील कामगिरी तपासल्यास ४५ टक्के फंड मालमत्तेने आणि केवळ ३२ पैकी १४ फंडांनी त्यांच्या मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविल्याचे आढळले. मागील आर्थिक वर्षात सक्रियपणे व्यवस्थापित फंडांपैकी ३१ फंडांपैकी फक्त १२ फंडांनी ‘एस ॲण्ड पी बीएसई १००’ सापेक्ष अधिक परतावा कमावल्याचे दिसून आले. त्या खालोखाल केवळ ३० टक्के ईएलएसएस फंडांनी ‘एस ॲण्ड पी बीएसई २००’ या मानदंडाच्या तुलनेत कमी परतावा मिळविला. एस ॲण्ड पी बीएसई मिड-स्मॉलकॅप निर्देशांकाने ४४ टक्के परतावा दिला. परंतु या फंड गटात ७४ टक्के फंडांची मानदंड सापेक्ष कामगिरी समाधानकारक नव्हती. सरलेल्या वर्षात एस ॲण्ड पी बीएसई १००निर्देशांकाने २३.१ टक्के तर एस ॲण्ड पी बीएसई २०० निर्देशांकाने २४.५ टक्के परतावा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सक्रिय व्यवस्थापित फंडांच्या २३ लाख कोटींच्या मालमत्तेतील केवळ ३० टक्के फंडांनी मानदंड सापेक्ष अधिक परतावा कमावला आहे. सक्रिय फंड गटाची सरासरी परतावा हा मानदंड सापेक्ष परताव्यापेक्षा कमी आहे. आठ फंड गटाची (लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप फ्लेक्सीकॅप, मल्टीकॅप, व्हॅल्यू, ईएलएसएस, आणि इक्विटी इन्कम) कामगिरी तपासली असता, केवळ २० टक्के फंडांनी त्यांच्या मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात बाजाराने विस्तृत तेजी अनुभवली. निर्देशांकातील चांगली कामगिरी करणाऱ्या समभागांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक होती. हे पाहता वर नमूद चित्र निराशादायीच.

हेही वाचा…‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

जागतिक स्तरावर केवळ १० टक्के सक्रियपणे व्यवस्थापित फंड आणि ईटीएफ त्यांच्या संबंधित मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळवू शकले. आर्थिक वर्ष २०२४ हे भू-राजकीय तणावाचे वर्ष होते. ‘मेगाकॅप’ (अल्फाबेट, ॲमेझॉन, ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडिया आणि टेस्ला) यांची कामगिरी संमिश्र होती. जेव्हा निर्देशांकातील प्रभावी कंपन्याची (इंडेक्स हेवीवेट्स) कामगिरी संमिश्र असते तेव्हा तेव्हा निधी व्यवस्थापकांना अधिक दक्ष असावे लागते. जगाच्या तुलनेत भारतीय बाजारात जास्त समभागांनी अधिक चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत एक वर्ष कालावधीत केवळ २० टक्के, ५ वर्षे कालावधीत ३५ टक्के आणि १० वर्षे कालावधीत ३८ टक्के फंडांनी मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला. पाच वर्षे कालावधीत ३२ लार्जकॅप फंडांपैकी केवळ १२ फंडांनी निर्देशांकापेक्षा २ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. केवळ दोन फंडांनी सर्व कालावधीत (१ वर्षे, ५ वर्षे, १० वर्षे) निर्देशांकाला मागे टाकत कामगिरीत सातत्य राखले आहे. तर, केवळ चार फंडांनी १० वर्षे कालावधीत दर ५ किंवा त्यापेक्ष अधिक कॅलेंडर वर्षात मानदंड सापेक्ष सरस कामगिरी केली आहे.

समाधानकारक कामगिरी करणाऱ्या फंडांची संख्या इतकी कमी असण्यास अनेक कारणे आहेत. करोनापश्चात बाजाराची वाढलेली कार्यक्षमता आणि पारदर्शकता यामुळे फंड व्यवस्थापकांना अद्याप न सापडलेले मूल्य (इंट्रेन्सिक व्हॅल्यू) शोधणे आणि ‘अल्फा’ निर्मिती करणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. माहितीच्या प्रसारामुळे, (इन्फर्मेशन डेसिमिनेशन) प्रत्येक लहान आणि मोठ्या गुंतवणूकदाराला रिअल-टाइम डेटा उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे उपलब्ध माहितीची दरी कमी झाली आहे. लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये कोणतेही गूढ रहस्य नसतात. एका मर्यादेपर्यंत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीपीएफ) पैशांची मोठ्या प्रमाणात आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक करीत आहे.

हेही वाचा…उद्योजकाने कर्ज आणि गुंतागुंत समजून घ्यावी

लार्जकॅप कंपन्यांचा व्यवसायाचे प्रारूप स्थिर असते आणि रोकड सुलभता (फ्री फ्लोटिंग स्टॉक) पाहता आणि या कंपन्यांचे समभाग विकत घेण्यास अथवा विकण्याचे स्वारस्य असणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या खूप मोठी असते. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर विश्लेषण केले जाते. याचा अर्थ असा होतो की, कोणतीही बातमी किंवा महत्त्वाची वस्तुस्थिती लपवून ठेवण्याची शक्यता कमी आहे. मोठ्या फ्लोटिंग स्टॉकचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही कंपनीच्या पडत्या काळातही असे समभाग विकण्याचा प्रयत्न केला तरी विकत घेणाऱ्यांची वानवा नसते. तरी सक्रियपणे व्यवस्थापित फंडांना मानदंड निर्देशांकांवर मात करणे अधिक कठीण होताना दिसत आहे. निर्देशांक अतिकेंद्रित (हायली कॉन्सन्ट्रेटेड) असल्याने निर्देशाकांपेक्षा कमी परतावा मिळविणाऱ्या फंडांची संख्या जास्त आहे. निफ्टी ५० आणि सेन्सेक्स फंडांची सरासरी शीर्ष ५ कंपन्यांची एकाग्रता ४४ टक्के असून देखील लार्ज कॅप फंडांनी केवळ ३८ टक्के एकाग्रता राखल्याने अनेक लार्ज कॅप फंडांच्या परताव्यात विस्तृत अंतर पडले.

वार्षिक दैनंदिन चलत परताव्याच्या (डेली रोलिंग रिटर्न) आधारे २० वर्षांच्या दीर्घकालीन कालावधीत केवळ २२ टक्के लार्ज कॅप फंडांनी निफ्टी ५० निर्देशांक आणि भारतातील सर्वात जुन्या बीएसई सेन्सेक्सपेक्षा सरस कामगिरी केली आहे. लार्जकॅप निधी फंडांच्या व्यवस्थापकाला ८० टक्के मालमत्तेसाठी केवळ १०० कंपन्यांचा परीघ उपलब्ध आहे. निर्देशांकापेक्षा अधिक कामगिरी करण्यासाठी, व्यवस्थापकाला पोर्टफोलिओमध्ये या १०० कंपन्यांपैकी २० ते २५ कंपन्या निवडून त्यांचे प्रमाण निश्चित करायचे आहे. निधी व्यवस्थापकांनी अति-विविधीकरण केल्याने कामगिरी खालावल्याचे दिसून आले. निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाच्या एकाग्रतेच्या तुलनेत अनेक निधी व्यवस्थापकांनी ‘अल्फा’ तयार करण्याच्या उद्देशाने ५० हून जास्त कंपन्यांचा समावेश केल्याने फंडांची कामगिरी खालावल्याचे दिसते. निर्देशांक सापेक्ष कमी परतावा मिळविणाऱ्या फंडात अति वैविध्य (ओव्हर-डाइव्हर्सिफिकेशन) असल्याचे दिसून आले.

हेही वाचा…अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

अतिवैविध्य हा गुंतवणुकीत दोष समाजाला जातो. अनेक लार्ज कॅप फंडांनी त्यांच्या संबंधित निर्देशांकांच्या तुलनेत गुंतवणुकीत अवलंबविलेले अतिवैविध्य कमी परताव्याचे कारण ठरले. एकूण म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेपैकी सुमारे ५० टक्के मालमत्ता वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या मालकीची आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ हे खरे असले तरी त्या सोबत पुरेशा परताव्याअभावी वंचित असलेले फंड टाळायचे असतील तर ‘ॲडव्हायझर जरुरी है’ हे गुंतवणूकदारांनी विसरू नये हे या निमित्ताने पुन्हा सांगावेसे वाटते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are performing satisfactorily mutual funds rates so low a performance analysis print eco news psg