डॉ . गिरीश वालावलकर
कोणत्याही व्यवसायाची आर्थिक गरज भागवण्यासाठी घेतलेल्या कर्जाला ‘बिझनेस लोन’ किंवा ‘व्यावसायिक कर्ज’ असं संबोधलं जातं. एखाद्या व्यक्तीने एकट्याने सुरु केलेल्या लहान व्यवसायापासून ते प्रचंड उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वच व्यवसायिक आणि औद्योगिक संस्थांना अनेक वेळा बाह्य आर्थिक सहाय्य घेण्याची गरज पडत असते. व्यावसायिक कर्ज घेणं हा ती गरज भागवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे.
व्यावसायिक कर्जाची प्रमुख दोन कारण
१. व्यवसायामध्ये दीर्घ काळाकरता गुंतवणूक करण्यासाठी भांडवल उभं करणं: कारखाना उभा करण्यासाठी किंवा नवी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेता येतं. या कर्जाला ‘टर्म लोन’ म्हणजे ‘दीर्घ मुदतीचं कर्ज असं संबोधलं जातं. ‘दीर्घ मुदतीचं कर्ज ‘ ‘टर्म लोन ‘ हे कर्ज फेडण्यासाठी दहा वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. या कर्जाची परतफेड दीर्घ काळाने करायची असते. म्हणजेच, या कर्जाच्या स्वरूपात घेतलेली रक्कम बराच काळ कर्जदाराकडे असते. त्यामुळे बँका हे कर्ज देताना अतिशय चिकीत्सक असतात.
आणखी वाचा-Money Mantra: बँक लॉकर- किल्ली हरवली तर? डिपॉझिट भरावे लागते का?
सखोल तपासणी आणि मूल्यमापन
कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँका खालील गोष्टींची सखोल तपासणी आणि मूल्यमापन करतात.
अ . कर्जासाठी अर्ज करणाऱ्या कंपनीची आणि कंपनीच्या मालक, संचालक आणि प्रवर्तकांची सर्व बँक स्टेटमेंट्स.
ब. कंपनीचा आणि कंपनीच्या मालक, संचालक आणि प्रवर्तकांचा संपूर्ण आर्थिक इतिहास – यामध्ये कंपनीने आणि तिच्या मालक, संचालक आणि प्रवर्तकांनी कंपनी सुरु करण्यासाठी भांडवलाचा मुख्य भाग कसा उभा केला आहे? त्यांनी यापूर्वी कधी कर्ज घेतलं होतं का? घेतलं तर त्याची परतफेड योग्य प्रकारे आणि योग्य मुदतीत केली का? या सर्व मुद्यांचा सविस्तर अभ्यास केला जातो.
क. अर्ज करणाऱ्या कंपनीबद्दल ग्राहक, तिच्या सहकारी कंपन्या व संस्था, कर्मचारी, कच्चा माल पुरवठादार यांचा एकूण अभिप्राय.
ड. कंपनीच्या उत्पादनांना बाजारपेठेत असलेली मागणी.
इ. कर्जफेड करायची कंपनीची आणि कंपनीच्या मालक, संचालक आणि प्रवर्तकांची वैयक्तिक क्षमता.
फ. कंपनीची आर्थिक पत – व्यवसाय कर्ज मंजूर करण्यासाठी आर्थिक पत हा महत्वाचा निकष असतो. कंपनीची आर्थिक पत ठरवण्यासाठी कंपनीचे व्यवहार अनेक पातळ्यांवर तपासले जातात. कर्ज मागणाऱ्या कंपनीची आर्थिक पत ठरवण्यासाठी बऱ्याच बँकांकडे स्वतंत्र विभाग किंवा त्या विषयातील तज्ज्ञ काम करतात. गरज पडल्यास ‘डन अँड ब्राडस्ट्रीट’, ‘एक्विफॅक्स’ किंवा ‘मूडीज’ सारख्या व्यावसायिक कंपन्यांची सुद्धा मदत घेतली जाते.
ग. तारण – स्वतःचे पैसे सुरक्षित करण्यासाठी बँका दिलेल्या कर्जाच्या बदल्यात कंपनीची मालमत्ता त्याच बरोबर कंपनीच्या संचालकांचं रहात घर किंवा तत्सम वैयक्तिक मालमत्ता तारण म्हणून स्वतःकडे ठेवून घेतात. तारण ठेवलेल्या मालमत्तेचं मूल्य कर्जाऊ दिलेल्या रकमेइतकं किंवा त्या पेक्षा थोडं जास्त असावं अशी बँकांची मागणी असते.
आणखी वाचा-वित्तरंजन : सत्यमचा घोटाळा (भाग १)
खेळतं भांडवल
२.व्यावसायिक कर्ज घेण्याचं दुसरं कारण म्हणजे कंपनीच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणारं खेळतं भांडवल मिळवणं: कोणत्याही व्यवसायाला कर्मचाऱ्यांचे पगार देणं, कच्चा माल खरेदी करणं , कार्यालयाच्या जागेचं भाडं भरणं या सारखे दैनंदिन खर्च करण्यासाठी ‘वर्किंग कॅपिटल’ म्हणजे ‘खेळत्या भांडवलाची’ गरज असते. कधी कधी कंपनीच्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांचे पैसे अपेक्षित वेळेत मिळत नाहीत. कधी कंपनीच्या उत्पादनांची बाजारातील मागणी अचानक वाढते . ती पूर्ण करण्यासाठी अधिक कच्चा माल खरेदी करावा लागतो. अशा वेळी कंपनीला बाह्य आर्थिक साहाय्य घेण्याची गरज भासते. ती गरज भागवण्यासाठी ‘वर्किंग कॅपिटल लोन’ म्हणजे ‘ खेळत भांडवल कर्ज’ घेतलं जातं. हे कर्ज सहा महिने ते एक वर्ष या सारख्या लहान कालावधी साठी घेतलं. हे कर्ज देण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था फारशा कागदपत्रांची मागणी करत नाहीत, ते तुलनेनं सहजतेनं मिळतं. हे कर्ज ठरलेल्या मुदतीत फेडलं तर पुनः जेव्हा कंपनीला अशा प्रकारच्या कर्जाची गरज पडते तेव्हा बँक ते तत्परतेने मिळतं .
व्यवसाय कर्जाचे इतर प्रकार
काही वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन नंतर त्याच कर्जाच्या बदल्यात कंपनी वित्तीय संस्थेला ‘इक्विटी ‘ म्हणजे ‘भागीदारी हिस्सा देते’. या प्रकारच्या कर्जाला ‘मॅझेनिन’कर्ज असं संबोधलं जातं. वित्तीय संस्थेचं कर्ज ‘इक्विटी’ पर्यायाच्या स्वरूपात बऱ्याच प्रमाणात सुरक्षित होत असल्यामुळे, वित्तियसंस्था कर्जा साठी मालमत्ता तारण ठेवण्या बाबत कंपनीला बऱ्याच प्रमाणात शिथिलता देतात.
या खेरीज ‘ओव्हर ड्राफ्ट ‘ म्हणजे पूर्ण कर्ज न घेता आवश्यक तितकी रक्कम बँकेतून घेण्याची आणि तेवढ्याच रकमेवर व्याज भरण्याची सुविधा, कंपनीची यंत्रसामग्री किंवा इतर वस्तू तारण ठेऊन त्यावर कर्ज घेणं यासारख्या कर्ज मिळवण्याच्या इतरही काही पद्धती आहेत. आपल्या कंपनीचा विचार करून, कंपनीच्या गरजेनुसार आणि आपल्याला परतफेड करायला सुयोग्य होईल प्रकारचं कर्ज घ्यावं. (क्रमश:)