गेल्या तीन महिन्यापासून बाजारामध्ये सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. फक्त देशांतर्गत घडामोडी हाच एकमेव मुद्दा नसून देश-विदेशात होणाऱ्या घडामोडींचा आपल्या शेअर बाजारांवर परिणाम होणार आहे.
अशावेळी पोर्टफोलिओला सावरण्यासाठी आणि घसरण होत असताना कमी जोखीम असलेला पर्याय म्हणून हायब्रीड इक्विटी फंड महत्त्वाचे ठरतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा बऱ्याचदा असा गैरसमज होतो की सर्व फंड योजना फक्त इक्विटी शेअर्स मध्येच गुंतवणूक करतात.
इक्विटी शेअर्स आणि डेट म्हणजेच यामध्ये व्याजदर ठरलेला असतो आणि तुलनात्मकदृष्ट्या जोखीम कमी असते. या दोघांचे उत्तम कॉम्बिनेशन आपल्या पोर्टफोलिओसाठी महत्वाचे ठरते.
इक्विटी मार्केटमध्ये तेजी-मंदीचे खेळ सुरू असतात त्यावेळी आपल्या पोर्टफोलिओला भक्कम आधार देण्यासाठी आणि रिटर्न्स थोडे कमी मिळतील पण इक्विटी शेअर्स सातत्याने घसरत असताना झालेले नुकसान थोडे तरी भरून काढता येईल या हेतूने डेट फंड महत्त्वाचे ठरतात. डेट फंडामधील गुंतवणूक मुख्यत्वे सरकारी बॉंड, खाजगी कंपन्यांचे बाँड, डिबेंचर यांच्यामध्ये केली जाते. बाजारातील परिस्थितीनुसार व्याजदर कमी जास्त होत असतात. पण इक्विटी एवढी जोखीम नक्की नसते.
पोर्टफोलिओला आधार देण्यासाठी डेट फंड महत्त्वाचे असले तरीही पूर्णपणे डेट फंडात गुंतवणूक असणे शहाणपणाचे नाही. कारण त्यातून मिळणारे रिटर्न्स महागाईला तोंड देऊ शकतील असे नसतात. अशावेळी इक्विटी मधील मीडिया आणि लॉन्ग टर्म मध्ये मिळणारा फायदा व डेट प्रॉडक्ट मधील जोखीम सुरक्षा यांचे एकत्रित फायदे मिळवून देणाऱ्या हायब्रिड योजना महत्त्वाच्या असतात.
हायब्रिड योजनेत डेट किती आणि इक्विटी किती ?
सेबीने ठरवून दिलेल्या नियमानुसार म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या पोर्टफोलिओचे धोरण ठरवत असतात. पोर्टफोलिओत इक्विटी ६५ % ते ८० % आणि डेट २० ते ३५ % एवढ्या प्रमाणात असावेत असा नियम आहे.
जर शेअर बाजार चढ्या स्थितीत असतील तर फंड मॅनेजर ‘डेट’ मध्ये कमीत कमी पैसे ठेवून सर्वाधिक पैसे इक्विटी मध्ये गुंतवेल आणि या उलट परिस्थिती असेल तर ‘इक्विटी’ मध्ये गुंतवणूक कमी करून डेट मधील गुंतवणूक वाढवली जाईल.
इक्विटी हायब्रिड फंड योजना
नावात म्हटल्याप्रमाणे या योजनांमध्ये ‘इक्विटी’चे प्रमाण जास्त आणि ‘डेट’चे प्रमाण कमी असे गुंतवणुकीचे नियोजन केले जाते.
हायब्रीड डेट फंड योजना
नावात म्हटल्याप्रमाणे या योजनांमध्ये ‘डेट’चे प्रमाण जास्त आणि ‘इक्विटी’चे प्रमाण अगदीच कमी असे गुंतवणुकीचे नियोजन केले जाते. हायब्रीड डेट फंड योजना आणि इक्विटी हायब्रीड योजना यांची तुलना केल्यास इक्विटी हायब्रीड अधिक जोखीम असलेली योजना आहे.
पुढील तक्त्यात भारतातील निवडक फंड घराण्यांच्या हायब्रिड योजनांचा गेल्या दहा वर्षातील रिटर्न्सचा (३१ जानेवारी २०२५ ) आढावा घेतला आहे. पडत्या बाजारात या योजना कशाप्रकारे महत्त्वाच्या ठरतात ते यावरून स्पष्ट होईल.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत त्यामुळे फंडविषयक दस्तावेज काळजीपूर्वक वाचून जोखीम आणि परतावा याचे गणित समजून घेऊन आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून गुंतवणूक करावी.