सरलेल्या वर्षातील सप्टेंबर, ऑक्टोबरच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आठवून पाहा. डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित झाली, त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील कलमं होती – ‘मतदारांनो, तुम्ही मला निवडून द्या, मी अमेरिकेला गतवैभव प्राप्त करून देईन… जागतिक पटलावर ‘अमेरिका फर्स्ट’ हे मी सर्वतोमुखी करीन. अमेरिकेच्या उद्योगधंद्यांचा बचाव करण्यासाठी मी आयात कर लावीन…’ असे म्हणत ट्रम्प नायकाच्या वेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.
अमेरिका फर्स्ट करायला फक्त ‘आयात कर’ हीच एक जादूची कांडी आहे, असे समजून धूमधडाक्यात सर्वत्र वाढीव आयात कराची घोषणा नुकतीच झालीदेखील. हे त्यांचे पाऊल जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावरच घाव. यातून जागतिक महामंदीची शक्यता बळावली. तीन महिन्यांपूर्वी नायकाच्या रूपात सत्तारूढ झालेल्या डोनाल्ड ट्रम्पना जागतिक पटलावर ‘अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठलेली व्यक्ती’ ठरविले गेले. आयात कराविरोधात अमेरिकेत आणि जगभरात जनक्षोभाचा वणवा पेटल्याने, या करवाढ धोरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय तीन महिन्यांनी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. अवघ्या तीन महिन्यांत जागतिक महासत्तेचा महानायक खलनायक ठरला. ट्रम्प यांच्या एका चुकीच्या पावलाने त्यांची प्रतिमा ‘आपुलीच प्रतिमा ठरते आपुलीच वैरी!’ याप्रमाणे झाली.
बाजारातही या आक्रमकता, नकारात्मकता आणि माघारीचे पडसाद उमटणे मग स्वाभाविकच. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने दमदार कामगिरी केल्याने, येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २३,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असणार आहे. भविष्यात निर्देशांकांने हा स्तर पार करत, सातत्याने २३,००० चा स्तर शाबूत राखल्यास निफ्टी निर्देशांकाच्या वरची लक्ष्ये – २३,५००, २४,०००, २४,३०० ते २४,८०० अशी असतील.
निफ्टी निर्देशांक २३,००० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २२,७००, २२,५००, २२,३०० ते २१,८०० असे असेल.
बातमीतील समभाग
भारतीय औषधी कंपन्यांची जी उत्पादने अमेरिकेला निर्यात होतात त्यांना अमेरिकेने आयात करातून तूर्त वगळले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या लेखात ऑरोबिंदो फार्मा, डॉ. रेड्डी लिमिटेड. या समभागांचा आढावा घेतला. आज आपण सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन व ग्लँड फार्मा यांचा आढावा घेऊया.
१) सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड:
११ एप्रिलचा बंद भाव- १,६८७.५५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,७५० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे समभागाकडून १,७५० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९०० रुपये गाठले जाईल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग १,७५० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,६२० रुपयांपर्यंत घसरेल.
२) सिप्ला लिमिटेड:
११ एप्रिलचा बंद भाव- १,४६३.०५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,४६० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे समभागाकडून १,४६० रुपयांचा स्तर सातत्याने १५ दिवस राखला गेल्यास, प्रथम वरचे लक्ष्य १,५२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग १,४६० रुपयांच्या महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३८० रुपयांपर्यंत घसरेल.
३) ल्युपिन लिमिटेड:
११ एप्रिलचा बंद भाव- १,९६९.२५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,९४० रु.वरील बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे समभागाकडून १,९४० रुपयांचा स्तर सातत्याने १५ दिवस राखला गेल्यास, प्रथम वरचे लक्ष्य २,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१५० रुपये. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग १,९४० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८०० रुपयांपर्यंत घसरेल.
४) ग्लँड फार्मा लिमिटेड:
११ एप्रिलचा बंद भाव- १,३९३ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,३५० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे समभागाकडून १,३५० रुपयांचा स्तर सातत्याने १५ दिवस राखला गेल्यास त्याचे प्रथम वरचे लक्ष्य १,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७५० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग १,३५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२८० रुपयांपर्यंत घसरेल.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
© The Indian Express (P) Ltd