आपण नुकत्याच गुंतवलेल्या म्युच्युअल फंड किंवा शेअरमध्ये लगेचच घसरण दिसायला लागणे हा निराशाजनक अनुभव असतो. पण अनेक गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात हा अनुभव येतो. प्रथमदर्शनी हा नशिबाचा खेळ किंवा म्युच्युअल फंड वितरकाने चुकीचे फंड दिले असे वाटू शकते. मात्र बऱ्याचदा यामागे अशी काही कारणे असतात जी आपण टाळू शकतो किंवा अशा घसरणीसाठी मानसीकरित्या तयार राहू शकतो. या मानसिकतेची तयारी कशी करायची यावर आजच्या लेखात चर्चा करूया.
१. आर्थिक वर्तणुकीची कारणे
● ‘दलबार क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिस ऑफ इन्व्हेस्टर बिहेव्हियर’ (क्यूएआयबी) सातत्याने दर्शविते की, वैयक्तिक गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर व्यापक बाजारपेठसापेक्ष बऱ्याचदा कमी परतावा मिळतो. याचे मुख्य कारण असे की, ते गुंतवणूक करण्यापूर्वी असे गुंतवणूकदार स्पष्ट संकेतांची किंवा सकारात्मक कल मिळण्याची प्रतीक्षा करतात. बहुतेकदा त्यांना गुंतवणुकीत चूक होण्याची किंवा नफा गमावण्याची भीती असते. जेव्हा त्यांना खात्री वाटते तेव्हाच ते गुंतवणुक करतात, पण तेव्हा कदाचित बाजार आधीच खूप वर गेलेला असल्याने सकारात्मक कल मिळत असतात. ज्यामुळे बाजार आणखी तात्काळ वाढेल या आशेवर ते गुंतवणूक करतात. प्रत्यक्षात चाणाक्ष गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री सुरू केलेली असते. तेजीवाल्यांचा पाठलाग करण्याची ही प्रवृत्ती आणि गुंतवणुकीच्या परिणामांवर त्याचा होणारा प्रतिकूल परिणाम अधोरेखित करणारे आर्थिक वर्तणुकीशी निगडित असे बरेच संशोधन आज उपलब्ध आहे.
२. कळप मानसिकता
● वाढत्या किमती पाहून अनेक गुंतवणूकदार इतरांचे अनुकरण करतात. जेव्हा ते अनेक मोठ्या संख्येने सहकारी किंवा मित्र गुंतवणूकदारांना समभाग/ म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. तेव्हा त्यांना वाटते की, ही गुंतवणूक सुरक्षित आहे. जेव्हा असा आशावाद वाढत जातो, तेव्हा निर्देशांक शिखरावर असताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, असा सर्वच निधी व्यवस्थापकांचा अनुभव आहे. खरे तर निर्देशांक शिखरावर असताना मोठी घसरण होण्याची शक्यता वाढते.
३. पुनरावृत्तीचा पूर्वग्रह (रिसेन्सी बायस)
● जेव्हा एखादा समभाग किंवा म्युच्युअल फंड चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा अनेकांना ती कंपनी किंवा तो फंड सुरक्षित गुंतवणूक असल्याचे वाटते आणि लोक अंतर्निहित जोखमीच्या मानांकनाकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, जोखीम घेण्याची क्षमता कमी असलेले अनेक गुंतवणूकदार परतावा चांगला दिसतो म्हणून स्मॉल कॅपकडे आकर्षित होताना दिसतात. ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या वाचकांना माहिती आहे की, स्मॉलकॅप अस्थिर असतात. अशा अनावश्यक पूर्वग्रहांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
४. जोखमीची भीती
● जेव्हा बाजार अस्थिर असतो आणि स्थिरतेच्या संकेतांची वाट पाहत असतो, तेव्हा गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार संकोच करतात. दुर्दैवाने, बाजार पूर्णपणे आपल्याला हवा तसा होइपर्यंत बाजारात आणखी वाढीची शक्यता बरीचशी कमी झालेली असते.
५. बाजारपेठेची वेळ साधण्यातली चूक
● बाजार स्वाभाविकपणे अस्थिर असतोच आणि अल्पकालीन चढ-उतार कायमच सुरू असतात. जर प्रमुख निर्देशांक किंवा एखाद्या कंपनीचा शेअरचा भाव शिखरावर असताना किंवा मूल्यांकन अधिक असताना गुंतवणूक केली, तर तुमच्या गुंतवणुकीमध्ये स्वाभाविक अशी घसरण होऊ शकेल
६. ‘मीन रिव्हर्शन’
● बाजाराची गती (मोमेंटम) अनेकदा अल्पावधीत समभाग किंवा म्युच्युअल फंडाची किंमत वाढवते. परंतु ‘मीन रिव्हर्शन’ (सरासरी कामगिरीच्या पूर्वपदावर परत येणे) बहुतेकदा लगेचच सुरू होते. गतीचा (मोमेंटम) पाठलाग करणारे गुंतवणूकदार या सामान्य सांख्यिकीय वर्तनाला गुंतवणुकीनंतर लगेचच कमी कामगिरी झाली, असे म्हणू शकतात.
७. इतर गुंतवणूकदारांची नफावसुली
● जेव्हा समभागांच्या किमती खूप वेगाने वाढतात, तेव्हा काही गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी शेअर्सची विक्री केल्यास किमतीत घसरण होऊ शकते. उदा. संस्थात्मक गुंतवणूकदार वारंवार पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन करतात. अतिमूल्यांकित मालमत्ता विकतात आणि कमी मूल्यांकित मालमत्ता खरेदी करतात. त्यांचा पोर्टफोलिओ तुलनेत मोठा असल्याने, हे अनेकदा समभागांच्या घसरणीला कारणीभूत ठरतात.
हा अनुभव कसा हाताळावा
१. मूल्याधारित गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट)
● अलीकडील कामगिरी किंवा कल यापेक्षा समभागांच्या आंतरिक मूल्यावर (इंटरेन्सिक व्हॅल्यू) लक्ष केंद्रित करा. मूल्यांकन, कंपनीच्या प्रति समभाग उत्पन्नातील (ईपीएस) वाढ , उद्याोगक्षेत्रापुढील आव्हाने किंवा संधी यासारख्या घटकांचा आढावा घेऊन म्युच्युअल फंड किंवा समभागांच्या खरेदी / विक्रीविषयी निर्णय घ्या.
२ . नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी)
● एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी, ‘एसआयपी’ करणे अधिक श्रेयस्कर असते. यामुळे सर्व बाजार परिस्थितीमध्ये थोडीथोडी गुंतवणूक करण्याची संधी असते, ज्यामुळे बाजारपेठेतील अस्थिरतेचा परिणाम कमी होण्यास मदत होते.
३. संशोधन आणि गुंतवणुकीतील विविधता
● केवळ गत कामगिरीवर अवलंबून निर्णय घेणे टाळायला हवे. तसेच, एका क्षेत्रातील अस्थिरतेचा परिणाम कमी करण्यासाठी गुंतवणुकीत अथवा पोर्टफोलिओमध्ये विविध मालमत्ता वर्ग, उद्याोग क्षेत्र आणि भौगोलिक क्षेत्रांत विभागणी केलेली असावी.
४ . गुंतवणूक योजनेशी एकनिष्ठ राहा
● तुमच्या उद्दिष्टांशी आणि जोखीम सहनशीलतेशी गुंतवणुकीची योग्य सांगड घाला. अल्पकालीन कल किंवा बदलांवर अवलंबून भावनिक निर्णय टाळा.
५. बाजाराची वेळ साधण्याचा मोह/ अट्टहास टाळा
● गुंतवणुकीसाठी योग्य वेळेचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. त्याऐवजी, गुंतवणुकीत संतुलन आणि सातत्य राखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. विचारपूर्वक, शिस्तबद्ध आणि माहितीपूर्ण गुंतवणूक तुम्हाला या अल्पकालीन घसरणीपासून वाचवण्यास आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल.
मागील लेखात (अर्थवृत्तान्त, १३ जानेवारी) म्हटल्याप्रमाणे, गुंतवणुकीतील यशाचा मूलमंत्र म्हणजे, बाजारातील अस्थिरतेला मित्र बनवणे आहे.
जॅक बोगल यांनी ‘वेळ हा तुमचा मित्र, आवेग हा तुमचा शत्रू’ असा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यात थोडा बदल करून मी असे म्हणेन की, ‘अस्थिरतेशी मैत्री करा आणि आवेगाशी शत्रूत्व पत्करा’.
लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असून, लेखांत व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.