मागील २०२३ या कॅलेंडर वर्षात भारतीय गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजाराने स्वप्नवत परतावा दिला. संपूर्ण जगभरातून आपल्या भांडवल बाजारात प्रवेश करण्याचे मनसुबे व्यक्त केले जाऊ लागले. देशातदेखील या बाजारात गुंतवणूकदारांची संख्या भूमितीय श्रेणीने वाढू लागल्याचे आपण पाहिले. डिमॅट खातेदारांच्या संख्येवरून ही माहिती सर्वांना उपलब्ध होतच असते. मागील वर्षातून चालू २०२४ कॅलेंडर वर्षात प्रवेश करताना शेअर बाजारातील बोलबाला तसाच राहिला असला किंवा किंबहुना थोडा वाढल्याचे दिसत असले तरी, बाजारात तीन महिन्यांत दोन वेळा आलेल्या ‘फ्लॅश करेक्शन्स’ आणि मिड व स्मॉल कॅप प्रवर्गातील जोरदार विक्री यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याहीपेक्षा अनेकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे हे नक्की.

त्याच वेळी कमोडिटी प्रवर्गातील सोने आणि चांदी या दोन मालमत्ता अनपेक्षितपणे विक्रमी तेजीत आल्या. बिघडलेली भू-राजकीय परिस्थिती आणि व्याजदर कपातीबाबत जागतिक चलन बाजारात वाढलेली सट्टेबाजी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्यामुळे भांडवल सुरक्षिततेसाठी जगातील सर्व मध्यवर्ती बॅंका आणि मोठे गुंतवणूकदार यांनी सोने आणि चांदी यावर अक्षरश: उड्या मारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोन्याने डॉलरच्या चलनात विक्रम केला आणि चांदीदेखील ३० टक्क्याहून अधिक वाढली. भारतीय रुपयांमध्ये दोन्ही धातूंनी नवीन विक्रम नोंदवले. एवढे की चालू वर्षात आतापर्यंत शेअर बाजारातील निफ्टी, सेन्सेक्स किंवा बँक निफ्टी या निर्देशांकाहून त्यांनी दिलेला अधिक परतावा पाहता गुंतवणूकदारांची शब्दश: चांदी झाली आहे.
वरील परिस्थितीचा परिणाम गुंतवणूक जगतावर असा झाला की, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपली संपत्ती एकाच प्रकारच्या मालमत्तेत ठेवण्याऐवजी त्यातील काही भाग कमोडिटी बाजारात गुंतवण्याबाबत विचार अधिक दृढ होत चालला आहे. निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट आणि इतर काही फंडांनी तर सोने- चांदीव्यतिरिक्त क्रूड ऑइलसारख्या कमोडिटीमध्येदेखील गुंतवणूक केली असल्याचे समजते. त्यामुळे प्रथम म्युच्युअल फंड आणि सजग गुंतवणूकदार यांच्यात होणारे बदल पाहता निदान अकृषी कमोडिटी बाजाराला परत एकदा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
On Monday December 9 price of gold rise three times in four hours from morning
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
Gold crown stolen from Pune, Zaveri Bazar, Pune,
पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री

हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची – थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय? तो बंधनकारक असतो का?

सोने-चांदी या कमोडिटीजनी दिलेल्या जबरदस्त परताव्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये त्याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले नाही तरच नवल. त्यातही शेअर बाजार आता निफ्टी २३,००० च्या शिखरावर असल्याने त्याची नजीकच्या काळातील वाढ खुंटेल किंवा निवडणूक निकालानंतर ‘करेक्शन’ येईल अशी भीतीही जोर धरत आहे. त्यामुळे कमोडिटीचे आकर्षण अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सोने-चांदी यातील गुंतवणूक कशी राहील हे पाहणे योग्य ठरेल.

मुळात ज्या पद्धतीने सोने आणि चांदी यांचे भाव वाढले आहेत ते पाहता गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य नाहीच. जरी अनेक देश सोने खरेदी करत असले तरीही व्याजदर कपात हा एकच प्रमुख मुद्दा अमेरिकी डॉलर आणि डॉलर निर्देशांक यांच्यावर प्रभाव टाकत असून त्या अनुषंगाने सोने आणि चांदी यांच्यात मोठे चढ-उतार होत आहेत. या व्याजदर कपातीबाबतच्या अपेक्षा मागील १२-१५ महिन्यांहून अधिक काळ वित्तीय आणि कमोडिटी बाजारात हल्लकल्लोळ माजवत आहेत. तसे पाहायला गेले तर काही महिन्यांपूर्वी डॉलर निर्देशांक १०५ असताना सोने प्रति औंस २,००० डॉलरवर आले होते. त्यानंतर डॉलर निर्देशांक घसरला आणि १०० पर्यंत जाऊन आता परत १०४ वर आला तेवढ्यात सोने ४०० डॉलरने वाढले. यावरून डॉलर आणि सोने यात एकास एक संबंध नाही. चांदी तर दर वेळा नवे समीकरण दर्शवते. त्यामुळे केवळ डॉलरचा कल पाहून चालणार नाही. इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेनमधील युद्धबंदी, चीन-तैवान संबंध आणि आखातातील घटना या सोन्यासाठी महत्त्वाच्या राहतील. तेथील परिस्थिती अजूनही अस्थिर असली तरीही सोन्यामध्ये ज्या वेगाने वाढ झाली ती शोषून घेण्यासाठी ‘कन्सॉलिडेशन’ महत्त्वाचे आहे.

सोन्यापासून सध्या दूर राहण्यासाठी अजून काही घटनांकडे पाहावे लागेल. ‘वर्ल्ड गोल्ड काऊंसिल’ या जागतिक सोने उत्पादक संघटनेच्या माहितीनुसार, उझ्बेकिस्तान आणि थायलंडने विक्रमी किमतीचा लाभ घेऊन सोने विक्री केली आहे. त्यामुळे जर भू-राजकीय परिस्थितीत स्थैर्य येण्याची चिन्हे दिसल्यास इतर देशदेखील सोने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर सोने वेगाने घसरू शकेल.

भारतासारख्या सोने-प्रेमी देशात मागील आर्थिक वर्षात सलग एकूण ५,५०० कोटी रुपयांच्या ‘गोल्ड ईटीएफ’च्या खरेदीनंतर एप्रिलमध्ये ४४० कोटी रुपयांची ईटीएफ विक्री झाल्याचेदेखील काऊंसिलने म्हटले आहे. या सर्व गोष्टी असे सुचवीत आहेत की सोन्यात एवढ्यात गुंतवणूक करणे योग्य होणार नाही. तीच गोष्ट चांदीची असली तरी सोन्यातील तेजीला पोषक असलेल्या वरील घटकांपेक्षा अनेक अन्य घटक चांदीच्या किमती वाढण्यास मदत करतात. एक तर गुंतवणूक करताना प्रचंड संख्येने असणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांना सोन्याच्या तुलनेत कमी पैशात जास्त मिळत असल्यामुळे चांदी घेणे आवडते. म्हणूनच चांदीला गरिबांचे सोने असेही म्हणतात.

नवीन पिढी किंवा मिलेनियल्स यांची आभूषणे वापराची पद्धत आणि आवड आणि व्यावहारिक वृत्ती यांचा विचार करता चांदीच्या वस्तू व चांदीच्या दागिन्यांची मागणी आपल्या देशातच नव्हे तर विकसित देशांमध्येदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. मागणीतील या वाढीला सोन्याच्या वाढत्या किमतीदेखील तितक्याच जबाबदार आहेत. केवळ मागील तीन महिन्यांत सोने महाग झाल्यामुळे ग्राहकांनी कमी शुद्धतेच्या सोन्याची किंवा शक्य तिथे चांदीची निवड केल्याचे अनेक ब्रॅंडेड सुवर्णपेढ्या म्हणत आहेत.

हेही वाचा – Money Mantra: पुनर्विकासादरम्यान मिळणाऱ्या ट्रान्झिट भाड्यावर कर भरावा लागतो का?

या सर्व घटकांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जगभर सौरऊर्जा वापर अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या पॅनल्स तसेच मायक्रोचिप्स, सेमीकंडक्टर यांचा वापर असलेल्या अति-उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीचा वापर वाढतच राहणार आहे. एकंदर चांदी ही औद्योगिक वापराचा धातू असल्यामुळे मागणीत सातत्य राहते. त्यामुळे चांदीकडे अधिक लक्ष देणे थोडे जोखमीचे वाटले तरी योग्य ठरेल. प्रश्न आहे तो बाजारातील प्रवेश कधी योग्य ठरेल. असे म्हणतात गुंतवणूकदारांनी तळ किंवा शिखर अचूक गाठण्याचा प्रयत्न करू नये. या स्तंभातूनदेखील मागील तीन वर्षांत अनेकदा सोने-चांदी बाजारकलाचे अंदाज बरोबर आले असले तरी २०२४ मधील तेजीचे आकलन अगोदर करणे शक्य झाले नव्हते. अर्थात सोन्यापेक्षा चांदी खरेदी, तीही ईटीएफद्वारे केल्यास अधिक फायदेशीर राहील हे अनेकदा सुचवले गेले. त्याप्रमाणे चांदीतील तेजी अधिक मोठी ठरली आहे. त्यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे निश्चित झाले की, या किंमत पातळीवर प्रवेश सुरू करण्यास हरकत नाही. फक्त किमती सध्याच्या ९१,००० रुपये प्रति किलोवरून ८२ ते ८५ हजाराच्या पातळीवर येईपर्यंत त्यात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करावी. ८२,००० च्या जवळ आल्यास ‘एसआयपी’ हप्ता वाढवावा आणि जर चांदी ७५ ते ७७ हजार रुपयांच्या कक्षेत आल्यास एक मोठी रक्कम (शॉर्ट-ब्लास्ट एसआयपी) त्यात गुंतवावी आणि निदान पाच-सहा वर्षांसाठी वाट पाहावी. किमतीचे लक्ष्य देणे निदान चांदीत तरी कठीण असले तरी ऐतिहासिक डेटा तपासल्यास चांदीचा डॉलरमधील विक्रम ४७ डॉलर प्रति औंस म्हणजे सध्याच्या किमतीपेक्षा ५० टक्के तरी अधिक आहे.

सध्या एक लाख रुपयांची पातळी गाठण्यास उत्सुक असणाऱ्या चांदीच्या किमती पुढील काही वर्षांत दीड-दोन लाख रुपयांवर जाण्याची कुजबुज आता जागतिक सराफा बाजारांमध्ये ऐकू येऊ लागली आहे. असे झाले तर सोन्याहून पिवळे होईल. डॉलर आणि आशियाई चलन बाजारात येणाऱ्या वादळाच्या शंका खऱ्या ठरल्यास शेअर बाजार कोसळतील तेव्हा चांदीचेच उखळ सर्वात पांढरे होईल ही खूणगांठ बांधूनच ‘सिल्व्हर ईटीएफ’मध्ये गुंतवणूक सुरू करावी.

(ksrikant10@gmail.com)

Story img Loader