मार्च महिन्याच्या पूर्वार्धात निफ्टीच्या नाकावर सूत असल्यागत परिस्थिती होती. २२,००० चा स्तर आता तोडेल की नंतर असं वाटत असताना, निफ्टीने स्वतः अंतर्बाह्य बदल घडवत ११ मार्चपासून तेजीचा फेर धरला. २१,९६४ ते २३,४०२ अशी १,४३८ अंशांची तेजी आल्याने इतके दिवसांच्या मंदीचे मळभ दूर सरले. या १,४०० अंशांच्या तेजीच्या पखरणीमुळे गुंतवणूकदारांच्या कोमेजलेल्या मनावर हळुवार फुंकर घालत, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे, हलके फुलके, प्रसन्नतेचे – नवसंजीवनीचे क्षण आणले.
आता चालू असलेल्या तेजीचे सूतोवाच ‘भीती-प्रीतीच्या हिंदोळ्यावर’ या मागील लेखात केलेले. त्या लेखातील वाक्य – ‘आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने २२,३०० चा स्तर राखत, २२,७००चा स्तर पार करणे नितांत गरजेच आहे. असे घडल्यास २३,००० ते २३,३०० ही निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये असतील.’ यानुरूप सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी वरचे लक्ष्य साध्यही झाले.
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाला २३,४०० ते २३,५०० स्तरावर अडथळा असून, या स्तरावरून हलकीफुलकी घसरण अपेक्षित आहे. ज्यातून निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २३,००० व द्वितीय खालचे लक्ष्य २२,८०० ते २२,५०० असेल. या हलक्याफुलक्या घसरणीनंतर निफ्टी निर्देशांक २३,८०० ते २४,५०० च्या वरच्या लक्ष्यासाठी सज्ज होईल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ‘निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो’ हे गृहीतक काळाच्या कसोटीवर तपासून पाहू या.
१९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीनंतर राजीव गांधी यांचे पूर्ण बहुमत असलेले सरकार सत्तेवर आले. तेव्हा मुंबई शेअर बाजार निर्देशांक अर्थात सेन्सेक्स २७० वरून ६५० झाला. १९८९ साली लोकसभेच्या निवडणुकीनंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार आले तेव्हा सेन्सेक्स ६८० वरून १६०० वर झेपावला. १९९१ साली पी.व्ही.नरसिंहराव यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स १,९०० वरून ४,५४६ झाला. १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स २,७४० वरून ६,१५० वर झेपावला. २००४ साली मनमोहनसिंग यांचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा सेन्सेक्स अवघा ३,००० वर होता. तो २००८ साली २१,००० झाला. म्हणजेच निर्देशांक चार वर्षात सात पटीने वाढला.
बातमीतील समभाग
सरलेल्या सप्ताहात जो काही तेजीचा वारू उधळला त्यामागे परदेशी गुंतवणूक संस्थांचे भारतीय भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय होणे आणि परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय कंपन्यांचे भागभांडवल खरेदीत स्वारस्य दाखविणे, हे आवर्जून नमूद करण्यासारखे वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणता येतील. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी अशीच बातमी ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ संबंधाने आली. अमेरिकास्थित ‘बेन कॅपिटल’ने मणप्पुरम फायनान्स लिमिटेडचे १८ टक्के भांडवल २३६ रुपये प्रति समभाग या दराने खरेदी केल्याचे जाहीर केले. या बातमीने आर्थिक जगतात कंपनीची भविष्यकालीन वाटचाल ही ‘आनंदानी फुललेल्या, खुललेल्या’ अशा पायवाटेवरून सुरू झाली. या बातमीच्या पार्श्वभूमीवर ‘मणप्पुरम फायनान्स’ हा आपला आजचा ‘बातमीतला समभाग’ आहे.
मणप्पुरम फायनान्स लिमिटेड:
२१ मार्चचा बंद भाव- २३४.१६ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २५० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामाने समभागाकडून २५० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य २७५ ते ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ ते ३५० रुपये असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग २५० रुपयांच्या महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १९० रुपयांपर्यंत घसरेल.
आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.