राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला आहे. साहजिकच आपल्या बहिणीला कोणती भेटवस्तू देता येईल किंवा भावाकडून काय युनिक गिफ्ट मागता येईल याचा विचार सर्वांच्याच मनात सुरू झाला असेल. कपडे, रोख रक्कम, भेट वस्तू, मोबाईल अशा गिफ्टपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर आता तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. डिजिटल गोल्ड हा असा एक पर्याय आहे कि तुम्ही तुमच्या बजेटनुसार आपल्या बहिणीला सोने गिफ्ट करू शकता. हे कसं शक्य आहे असा विचार मनात आला असेलच.. तर मग हा लेख वाचा आणि आपल्या स्वकीयांनाही वाचायला फाॅर्वर्ड करा.
पारंपरिक पद्धतीने तुम्ही सोन्याचे नाणे किंवा सोन्याचे दागिने तुमच्या बहिणीला देऊ शकत होता. पण दागिने करतानाचे शुल्क (मेकिंग चार्जेस), सोन्यावर आकारला जाणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी), सोन्याची शुद्धता आणि डिझाईनची पसंत किंव नापसंत अशा अतिरिक्त खर्चाचा आणि अनेक प्रश्नांचा भडिमार तुमच्यावर होऊ शकतो. एवढे पैसे कर किंवा अतिरिक्त शुल्क म्हणून खर्च करण्यापेक्षा तुमच्या बजेटचा पुरेपुर उपयोग जर गिफ्ट करण्यासाठी करता आला तर उत्तमच, नाही का?
आणखी वाचा: Money Mantrta: कॅरेटलेन डीलने टायटनला नवी झळाळी
प्रत्यक्षातील सोने खरेदीपेक्षा डिजिटल स्वरुपात सोने खरेदी केल्यास हा अतिरिक्त खर्च टळू शकतो. तुमच्या बहिणीच्या नावावर डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ किंवा साॅवरिन गोल्ड बाँड विकत घेऊन गुंतवणुकीला प्राधान्य देता येईल. दागिने मिरविण्याची हौस असेल तेव्हा या डिजिटल गोल्डचे रुपांतर प्रत्यक्षातील सोन्यामध्ये सहजपणे करता येते. त्यामुळे त्या दरम्यानच्या काळात सोनं सांभाळून ठेवणे, किंवा चोरीच्या किंवा गहाळ होण्याच्या भीतीपोट मानसिक स्वास्थ्य बिघडणे अशा समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत.
पण खरंच डिजिटल गोल्ड गिफ्टिंग करण्यासारखे आहे का? सोन्याचे अलंकारिक मूल्याविषयी कोणीच शंका घेऊ शकत नाही. ते एव्हरग्रीन आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे आर्थिक मूल्य देखील मजबूत झाले आहे. जागतिक पातळीवर अनेक कारणांमुळे असलेली अनिश्चितता आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे पाहण्याचा भारतीय मानसिकता यामुळे हौस आणि गुंतवणूक म्हणून एक चांगला अॅसेट क्लास म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. संपत्ती निर्माणासाठी सोन्याकडे गुंतवणूकदार सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात.
आणखी वाचा: Money Mantrta: कॅरेटलेन डीलने टायटनला नवी झळाळी
केवळ रक्षाबंधनासाठीच नव्हे तर येणाऱ्या सणासुदीच्या काळातही आपल्या स्वकीय, आप्तेष्टांना किंवा जन्मदिनानिमित्त डिजिटल गोल्डचे गिफ्ट देण्याचा ट्रेंड आपण पाहत आहोत. सोन्याच्या वाढत्या किमती पाहता हा ट्रेंड यापुढेही कायम राहील याची खात्री वाटते. सोन्यातील गुंतवणूक म्हणजे वयोवृद्ध लोकांची मानसिकता असे समीकरण यापुढे असे राहणार नाही. चांगली कनेक्टिव्हिटी, डिजिटल पेमेंटच्या सुविधांचे जाळे जसे ग्रामीण भागात विस्तारत आहे तसा डिजिटल गोल्डचा प्रसारही ग्रामीण भागात होत आहे.
आपण आतापर्यंतच्या लेखमालिकेतून फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्डचे तुलनात्मक विश्लेषण, दोन्ही पर्यायांमध्ये करआकारणी कशी होते, साॅवरीन गोल्ड बाँड आणि डिजिटल गोल्ड यापैकी कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे, डिजिटल गोल्डमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक कशी करता येईल याबाबत आढावा घेतला. तसेच सध्या तरुणाईचा डिजिटल गोल्डकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे यावरही चर्चा केली. आता ही तरुणाई आपल्या भविष्याचा विचार करताना गिफ्टिंगमध्येही नवनवे पर्याय शोधत आहेत. त्यामुळे सोन्याला, विशेषतः डिजिटल गोल्डला यापुढील काळातही अच्छे दिन राहतील यात काही शंका नाही.