National Pension System Calculation : जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी करते किंवा त्यांचे उत्पन्न चांगले असल्यास ते आपल्या आवडीची जीवनशैली जगू शकतात. खरं तर अशा व्यक्तींना त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी फारसा त्रास होत नाही. परंतु जेव्हा तो सेवानिवृत्त होतो किंवा वयोवृद्ध होतो, तेव्हा घरात कमावता सदस्य नसल्यानं त्याला त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यात समस्या येऊ शकतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही कमावत असाल तेव्हाच तुमच्या वृद्धापकाळाच्या आयुष्याच्या टप्प्यासाठी आर्थिक नियोजन आतापासूनच करणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की, निवृत्तीचे नियोजन तुम्ही अगोदरच करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सेवानिवृत्तीसाठी उत्तम योजना
जर तुम्हीही असे काही नियोजन करण्याचा विचार करीत असाल तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही सरकारची सेवानिवृत्ती बचत योजना आहे. केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ रोजी ती सुरू केली. या तारखेनंतर नोकरीत रुजू होणारे सर्व सरकारी कर्मचारी कर्मचारी या योजनाचा लाभ घेऊ शकतात. २००९ पासून ती योजना खासगी कर्मचाऱ्यांसाठीही खुली करण्यात आली आहे. एनपीएसमध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर वयाच्या ६० वर्षांपर्यंत किंवा मॅच्युरिटी होईपर्यंत योगदान द्यावे लागते.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) आणि केंद्र सरकार यांच्या देखरेखीखाली निवृत्तीसाठी स्वेच्छिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. NPS हा केंद्र सरकारचा सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे. ही पेन्शन योजना सार्वजनिक, खासगी आणि अगदी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक (सरकारी कर्मचारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी) राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू करू शकतो. अनिवासी भारतीयदेखील यासाठी पात्र आहेत.
परतावा चांगला मिळणार
NPS चा काही भाग इक्विटीमध्ये जातो, त्यामुळे या योजनेत हमी परतावा मिळू शकत नाही. परंतु ते PPF यांसारख्या इतर पारंपरिक दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. जर आपण NPS चा परताव्याचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत त्याने ९ टक्के ते १२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे आणि गैर-सरकारी रोख्यांमध्ये तसेच निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवतात.
NPS: १ लाख पेन्शनसाठी गणना
गुंतवणूक सुरू करण्याचे वय: ३० वर्षे
NPS मध्ये दरमहा गुंतवणूक: १० हजार
३० वर्षांत एकूण गुंतवणूक: ३६ लाख रुपये
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा: १० टक्के प्रतिवर्ष
पेन्शन संपत्ती: २,२७,९३,२५३ (२.२८ कोटी)
अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक: ५५ टक्के
वार्षिकी परतावा: १० टक्के
एकरकमी मूल्य: १,०२,५६,९६४ (१.०२ कोटी)
मासिक पेन्शन: १,०४,४६९ ( १ लाख)
NPS: निवृत्तीनंतर पैसे काढण्याचे नियम
सध्या कोणीही एकरकमी म्हणून एकूण कॉर्पसपैकी ६० टक्के रक्कम काढू शकतो, उर्वरित ४० टक्के वार्षिकी योजनेत जातात. नवीन NPS मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकूण निधी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ग्राहक वार्षिक योजना खरेदी न करता संपूर्ण रक्कम काढू शकतात. हे पैसे काढणेदेखील करमुक्त आहेत.