दीपक गोडबोले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या विशाल लोकसंख्येकडे ताकद आणि फायदा म्हणून पाहिले पाहिजे. त्यायोगे विकासाच्या दिशेने झेप घेण्याची विलक्षण संधी आहे. मात्र ती फक्त पुढील दोन दशकांपुरतीच उपलब्ध असेल. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच, निवृत्तिवेतनाची पुरेशी तरतूद आणि आरोग्य विम्यासंबंधाने काळजी घेतल्यास आरामदायी आणि तणावमुक्त निवृत्ती जीवन शक्य बनेल.

अलीकडे संयुक्त राष्ट्रांद्वारे ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२२’ अर्थात लोकसंख्या अंदाज अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्या व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे, १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर पोहोचली. चीन आणि भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक आहे. सध्या भारताची लोकसंख्या १.३९ अब्ज आहे तर चीनची १.४१ अब्ज आहे. लवकरच भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. आपल्या दृष्टीने तूर्त जमेची बाब म्हणजे, भारतीयांचे सरासरी वय २९ वर्षे आहे आणि हा एक विशाल, महत्त्वाकांक्षी आणि उत्साही तरुण लोकसंख्येचा देश आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे १९७५ पासून जागतिक लोकसंख्या दर ११-१२ वर्षांनी एक अब्जाने वाढत आली आहे. अहवालात नमूद केलेली अन्य वैशिष्ट्ये –

१. जगाची लोकसंख्या वाढत आहे, परंतु वाढीचा वेग मंदावत आहे.

२. लोकसंख्या वाढ हे जगभरातील आर्थिक विकासाच्या संथ प्रगतीचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे.

३. गेल्या दोन दशकांत मानवी आयुर्मान दहा वर्षांनी वाढले आहे.

४. जागतिक स्तरावर आयुर्मान वाढत असताना, मोठ्या प्रमाणात असमानतादेखील कायम आहे.

५. वृद्ध व्यक्तींची संख्या आणि एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण वाढत आहे.

६. कमी प्रजननक्षमतेमुळे, इतर देशांमध्ये स्थलांतरणामुळे, काही देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे.

७. जननक्षमता, मृत्युदर आणि स्थलांतर यामुळे लोकसंख्येमध्ये व्यापक बदल सुरू आहेत.

गेल्या शतकात, जगाच्या बहुतेक भागांमध्ये आयुर्मान प्रचंड वाढले आहे. व्हिएतनाम आणि थायलंडसारख्या देशांतील लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ३० वर्षांखालील आहे आणि सुमारे एक चतुर्थांश लोक ४५ किंवा त्याहून अधिक वयाची आहेत. सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी ६८ वर्षे आणि महिलांसाठी ७० वर्षे आहे.ॉ

वैज्ञानिक प्रगती, नवकल्पना, वाढलेला व्यापार आणि देवाणघेवाण आणि सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे मानवी जीवनात सुधारणा होत आहे. आरोग्यसेवेतील मोठ्या गुंतवणुकीसह सतत नवनवीन प्रयत्न, हे आरोग्य क्षेत्रातील बहुतांश प्रगतीमागील प्रेरक शक्ती आहे. चांगले आरोग्य लोकांना उत्पादक आणि आनंददायी जीवन जगण्यास सक्षम करते. चांगले आरोग्य सामाजिक विकासास सक्षम करते आणि आर्थिक वाढीस चालना देते.

सध्या, आरोग्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात उपचारात्मक काळजीकडे झुकलेला आहे. रोगप्रतिबंधक कृती आणि कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा आणि संसर्गजन्य रोगांशी संबंधित आव्हानांसह हवामान बदलाच्या आरोग्यावरील संभाव्य नकारात्मक परिणामांबद्दल चिंता वाढत आहे. जगाची लोकसंख्या वाढत असताना, सर्वांसाठी जीवनमानात सुधारणा कशी सुनिश्चित करायची हा एक प्रश्न आहे.

वाढत्या आयुर्मानाचे आव्हान

वृद्धत्वाचे पैलू आणि अधिक काळ जगणे अधिक परिपूर्ण कसे बनवायचे याचा विचार करणे आवश्यक आहे. आयुर्मान वाढत आहे पण पेन्शनची तरतूद अपुरी आहे. जुन्या पिढीचे नवीन पिढीवरील अवलंबित्वाचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्य सेवेचा खर्च वाढत आहे आणि जुन्या पिढीसाठी आरोग्यसेवेची तरतूद अपुरी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तरुणांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे आणि सामाजिक सुरक्षा धोरणांवर प्रचंड दबाव दिसून येतो आहे.

जगात आता आठ अब्ज लोक आहेत. आपण कोण आहोत, कुठे आहोत आणि भविष्याची काळजी कशी घेणार आहोत याचा आढावा घेण्याची हीच वेळ आहे.

विमा क्षेत्राची भूमिका

जास्त काळ जगल्यामुळे पेन्शन आणि आजीवन बचत अपुरी पडत आहे आणि आरोग्यविषयक खर्चासाठी क्षमताही मर्यादित आहे. या समस्येची काळजी घेण्यासाठी विमा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. तरुण वयात, कमाईच्या टप्प्यात विमा कंपन्यांच्या पेन्शन उत्पादनांद्वारे वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद करणे महत्त्वाचे आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) ही वृद्धावस्था सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन आणि गुंतवणूक योजना आहे. १८ ते ६५ वयोगटातील भारतीय नागरिक ‘एनपीएस’मध्ये सामील होऊ शकतो. वृद्धापकाळाची मिळकत, दीर्घकालीन बाजारावर आधारित वाजवी परतावा आणि वृद्धावस्थेतील सुरक्षा ही ‘एनपीएस’ची व्यापक उद्दिष्टे आहेत.

औषधे आणि उपचारांसाठीचा खर्च पूर्वीच्या तुलनेत खूप वाढला आहे. आरोग्यसेवा ही प्राथमिक गरजांपैकी एक मानली जात असल्याने कमी उत्पन्न श्रेणीतील व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत. ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही त्यापैकी एक आहे. आरोग्य विमा हा एक प्रकारचा विमा आहे जो विमाधारकाच्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे प्रीमियम रकमेच्या बदल्यात वैद्यकीय खर्चाच्या भरपाईचे संरक्षण प्रदान करतो. विमा कंपनीकडून रुग्णालयात दाखल झाल्याचा खर्च, डे केअर प्रक्रिया, गंभीर आजार इत्यादींसाठी वैद्यकीय खर्चाचे कवच प्रदान करते. आरोग्य विमा योजना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन आणि मोफत वैद्यकीय तपासणीसह अनेक फायदेदेखील देते.
आरोग्यसेवेचा खर्च सतत वाढत आहे आणि वृद्धापकाळात दीर्घकालीन आरोग्यसेवेची गरजदेखील वाढू शकते. यासाठी निवृत्तिवेतनाची (पेन्शन) तरतूद आणि आरोग्य विमा पॉलिसी म्हणजे आरामदायी सेवानिवृत्ती आणि तणावात जगणे यातील फरक दाखवतो. आजच्या तरुणांनी या तरतुदी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण ते वाढत्या आयुर्मानासह अधिक काळ जगणार आहेत आणि त्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेणे देखील आवश्यक असेल. ‘आझादी का अमृत महोत्सवा’दरम्यान भारतीय विमा नियामकांनी ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ असा संकल्प सोडला आहे आणि विमा कंपन्या, विमा मध्यस्थ आणि जीवन आणि सामान्य विमा परिषदांनी या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी सज्जता केली आहे.

भारत हे विविध कलागुणांचे राष्ट्र आहे. आपण मोठ्या लोकसंख्येकडे ताकद आणि फायदा म्हणून पाहिले पाहिजे. मोठ्या लोकसंख्येमुळे देशांतर्गत ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे मोठे भांडार उपलब्ध आहे ज्याचा उपयोग चांगल्या परिणामासाठी केला जाऊ शकतो. भारताकडे विकासाच्या दिशेने झेप घेण्याची विलक्षण संधी आहे. पण ती फक्त पुढील दोन दशकांपुरतीच उपलब्ध असेल. भारतामध्ये जगातील सर्वात तरुण (१५ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांचे) कार्यबल आहे. येत्या काही वर्षांत तरुणांनी प्रगतीच्या संधींचा वापर न केल्यास ही ताकद आपत्तीत मात्र बदलू शकते.

(लेखक, वित्त आणि विमा विषयातील अभ्यासक आणि शैक्षणिक सल्लागार)

deengee@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth should decide on time how to face economic crisis at old age asj