मुंबई : दोन वर्षांच्या रखडपट्टीनंतर, सोनी पिक्चर्सने झी एंटरटेनमेंटसोबतचा १,००० कोटी डॉलरच्या विलीनीकरणाचा करार सोमवारी रद्द केला. परिणामी, तब्बल २५ टक्क्यांच्या घसरगुंडीचा घाव सोसलेल्या झी आणि तिच्या प्रवर्तकांवरील संकट पुरते सरलेले नसून, बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून सुरू असलेल्या तपासातून पुढे आणखी अडचणींचा त्यांना सामना करावा लागू शकतो, असे संकेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत गोएंका आणि सुभाषचंद्र गोएंका या ‘झी’च्या प्रवर्तक पुत्र-पित्यांना आणि त्यांनी कंपनीत बजावलेल्या भूमिकांबाबत ‘सेबी’ची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. झी एंटरटेनमेंटच्या प्रवर्तक कुटुंबाला कथितपणे फायदा करून देणाऱ्या व्यवहारांचे आणि त्या संबंधाने झालेल्या सारवासारवीच्या आरोपांची बाजार नियामकांकडून चौकशी सुरू आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत चौकशी पूर्ण होऊन, त्या संबंधाने अंतिम आदेश जारी केले जाऊ शकतात. एकंदरीत एस्सेल समूहातील विविध कंपन्यांमधून निधीचा अपहार आणि गैरवापराचे प्रमाण ८०० ते १,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे.

हेही वाचा >>>Money Mantra: कमी जोखीम अन् चांगल्या परताव्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना निवडा, इंडेक्स फंडांबद्दल A टू Z जाणून घ्या

उल्लेखनीय बाब म्हणजे, सेबीने ऑक्टोबर २०२३ मध्ये, पुनीत गोएंका आणि सुभाषचंद्र गोएंका यांच्याविरोधात तपास पूर्ण करण्यासाठी आणखी आठ महिन्यांचा कालावधी लागू शकेल, असे रोखे अपील लवादापुढे (सॅट) स्पष्ट केले होते. लवादाने झी एंटरटेनमेंटच्या प्रवर्तकांना चौकशीत बाजार नियामकांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

सेबीने यापूर्वी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, पुनीत गोएंका आणि सुभाषचंद्र गोएंका यांना कोणत्याही सूचिबद्ध कंपनीमध्ये संचालक किंवा महत्त्वाचे व्यवस्थापकी पद स्वीकारण्यास प्रतिबंध केला आहे. तर तपासासंबंधाने अंतिम आदेशात, या पिता-पुत्रांवर मोठा आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय होऊ शकतो. झी एंटरटेनमेंटने ताज्या घडामोडीवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा >>>‘एअरटेल’कडून केंद्रातील मोदी सरकारला ८,३२५ कोटी

समभाग मूल्यात नकारात्मक पडसाद

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे समभाग मंगळवारी ३३ टक्क्यांपर्यंत घसरले. सत्रारंभापासून मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव असलेल्या कंपनीचे बाजार भांडवल मुंबई शेअर बाजारावर ७,२८५.५३ कोटी रुपयांनी घसरून १४,९७४.५० कोटी रुपयांवर घसरले. बीएसईवर हा समभाग १५५.९० रुपयांवर, तर एनएसईवर १६०.९० रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला. दोन्ही शेअर बाजारांवर त्याने ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee promoters face more trouble due to sebi investigation print eco news amy
Show comments