EPF मध्ये योगदान देणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत. दरम्यान, EPFO ने २०२२-२३ साठी व्याजदर ८.१५ टक्के निश्चित केला आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने पीएफच्या व्याजदरात ०.०५ टक्क्यांनी वाढ केली. परंतु ईपीएफओच्या विश्वस्तांकडून त्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी वाढीव व्याजदरावर सरकारची मंजुरी मिळणे अद्यापही बाकी आहे. वित्त मंत्रालय २०२२-२३ साठी निश्चित केलेल्या व्याजदराचाही आढावा घेत आहे आणि त्यानंतर व्याजाचे पैसे खात्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रत्येक वेळी EPF खात्यात व्याजाचे पैसे उशिरा का जमा होतात हा तर एक प्रश्नच आहे, पण PPF अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये दरवर्षी ३१ मार्च रोजी व्याज जमा केले जाते. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर मार्चमध्ये निश्चित करण्यात आला होता, परंतु खातेधारकांना व्याजाची रक्कम देण्यास विलंब झाला. परंतु हा विलंब का होतो आणि पीएफ खात्यात व्याजाची रक्कम येण्यास उशीर झाल्यास कर्मचाऱ्याचे नुकसान होते का, असा प्रश्न आता अनेकांना सतावतो आहे.
व्याजाच्या रकमेच्या विलंबाच्या प्रश्नावर ईपीएफओने दिलं असं उत्तर
EPFO ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. असे असूनही पीएफ खातेधारकांना त्यांचे व्याजाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ईपीएफ खात्यात विलंबाने व्याज जमा होत आहे, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. ईपीएफओ बोर्डाने व्याजदर निश्चित केले असूनही खातेदारांना पैसे उशिरा मिळाले आहेत. जर २०२१-२२ च्या व्याजाची रक्कम बहुतेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात आली नाही. २०२१-२२ साठी ८.१० टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरवर एका युजर्सने माझ्या खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार असं विचारलं, त्या प्रश्नाच्या उत्तरात ईपीएफओने म्हटले आहे की, लवकरच कर्मचार्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम दिसणे सुरू होईल. तसेच २०२०-२१ मध्येसुद्धा मार्च महिन्यातच पीएफवर ८.०५ टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते, तर ईपीएफओने ऑक्टोबरमध्ये अधिसूचित केले होते आणि डिसेंबर २०२१ मध्ये व्याजाचे पैसे सदस्यांच्या खात्यात जमा केले. म्हणजेच सुमारे ९ महिन्यांनंतर व्याजाची रक्कम जमा झाली.
हेही वाचाः नीरज निगम आता RBI चे नवे कार्यकारी संचालक; एकट्यालाच सांभाळावे लागणार ‘हे’ चार महत्त्वाचे विभाग
व्याज जमा होण्यास विलंबाचे कारण काय?
EPFO कडून व्याजाची रक्कम देण्यास उशीर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्याजदर निश्चित झाल्यानंतर EPFO आणि कामगार मंत्रालयाला वित्त मंत्रालयाकडून मंजुरी घ्यावी लागते. EPFO कडे आपल्या भागधारकांना व्याज देण्यासाठी निधी नसल्यामुळे त्याला वित्त मंत्रालयाकडून पैसे घ्यावे लागतात.
हेही वाचाः अवघे चार दिवस शिल्लक; ‘या’ बँकेच्या FDवर मिळतंय ७.५० टक्के व्याज