EPFO to Raise Auto Settlement Limit : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ( ईपीएफओ ) आपल्या ७.५ कोटी सदस्यांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’चा विस्तार करण्यासाठी अॅडव्हान्स क्लेम (एएसएसी) ची ऑटो सेटलमेंट मर्यादा सध्याच्या १ लाख रुपयांवरून पाच पट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी एएनआयला सांगितले.

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) च्या कार्यकारी समितीच्या (ईसी) ११३ व्या बैठकीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी ही मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे त्याच्या कोट्यवधी पीएफ धारकांना फायदा होणार आहे.

२८ मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे ही बैठक झाली. ज्यामध्ये ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती उपस्थित होते . आता, ही शिफारस सीबीटीच्या मंजुरीसाठी जाईल. CBT च्या मंजुरीनंतर, EPFO ​​सदस्य ASAC द्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचा PF काढू शकतात.

आता शिक्षण, विवाह आणि घरासाठी काढता येणार रक्कम

लॉकडाऊन काळात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी एप्रिल २०२० मध्ये क्लेम सेटलमेंटचा ऑटो मोड सुरू करण्यात आला होता. त्यानंतर, मे २०२४ मध्ये ईपीएफओने ही रक्कम ५० हजारांवरून १ लाख रुपये केली होती. EPFO ​​ने शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माण या आणखी ३ श्रेणींसाठी अॅडव्हान्स क्लेमचे ऑटो मोड सेटलमेंट देखील सुरू केले आहे.

यापूर्वी, सदस्यांना फक्त आजारपण/रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचे PF काढता येत होते. ऑटो-मोड क्लेम तीन दिवसांत प्रक्रिया केले जाते. आता ९५ टक्के क्लेम स्वयंचलित केले जातात. EPFO ​​ने चालू आर्थिक वर्षात ६ मार्च २०२५ पर्यंत २.१६ कोटी ऑटो-क्लेम सेटलमेंटचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे, जो २०२४-२४ मध्ये ८९.५२ लाख होता.

क्लेम रिजेक्शन रेशो कमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लेम रिजेक्शन रेशो देखील ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षी ५० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.