Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू आहे. ऐतिहासिक असलेल्या या सोहळ्याला देशभरातील लोक आले आहेत. तसंच, अनेक अतिप्रतिष्ठित मान्यवरांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. त्यावेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केवळ एका शब्दात उत्तर दिलं आहे.
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यवसायिक आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह अयोध्येत दाखल झाले आहेत. तसंच मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानीही अयोध्येत आले आहेत. राम मंदिर परिसरात अंबानी जोडप्याशी बोलण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. तेव्हा या उभयांतांनी त्यांच्या प्रतिक्रिया अवघ्या काही शब्दात मांडल्या.
भगवान राम आज येत आहेत. संपूर्ण देशासाठी २२ जानेवारी हा राम दिवाळीचा दिवस असेल, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी माध्यमांना दिली. तर, नीता अंबानी यांनीही आजच्या दिनी खास प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असं नीता अंबानी म्हणाल्या.
अनेक उद्योगपतींना निमंत्रण
टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यासह अनेक दिग्गज उद्योगपतींना राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
हिंदुजा समुहाचे अशोक हिंदुजा, विप्रोचे अझीम प्रेमजी, बॉम्बे डाईंगचे नुस्ली वाडिया, टॉरंट समुहाचे सुधीर महेता, जीएमआर समुहाचे जी. एम. आर. राव आणि मोठे बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे.
अनेक सेलिब्रिटीही दाखल
राम मंदिराच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंना सुद्धा आमंत्रण पाठवण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल झाले आहेत.