Ratan Tata Will: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी व्यवसायात यश मिळवत रोजगार निर्मिती आणि देशाच्या संपत्तीमध्ये वाढ केली. हे करत असताना त्यांनी माणूसपणही जपले. भूतदया हा त्यांचा महत्त्वाचा गुण. मृत्यूनंतरही रतन टाटांनी ही भूतदया कायम राखली आहे. रतन टाटा यांचे श्वान प्रेम सर्वश्रुत आहे. मृत्यूनंतरही आपल्या श्वानाची काळजी घेतली जावी, याची सोय टाटांनी मृत्यपत्राद्वारे केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने रतन टाटांच्या इच्छापत्राबाबत बातमी दिली आहे. यामध्ये त्यांच्या जर्मन शेफर्ड जातीच्या टीटो या श्वानाची काळजी घेण्यासाठी त्यांनी तरतूद केल्याचे नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रतन टाटा यांनी आपल्या मागे १० हजार कोटींची संपत्ती सोडली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या संपत्तीमध्ये त्यांनी आपले भाऊ-बहीण, घरात काम करणारे नोकर आणि टीटोसाठी काही भाग सोडला आहे. रतन टाटा यांचा अनेक वर्षांपासून स्वयंपाकी असलेल्या राजन शॉकडे टीटोची देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे. टाटा यांनी आपल्या संपत्तीमधील बराचसा वाटा त्यांच्या संस्थेच्या नावावर केला आहे. तसेच भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डिआना जीजीभॉय संपत्तीचे वाटेकरी केले आहे.

हे वाचा >> द कम्प्लीट मॅन… रतन टाटा

रतन टाटांकडे अलिबागच्या समुद्रकिनारी २,००० स्क्वे. फुटांचा बंगला आहे. मुंबईतील जुहू तारा रोड येथे दुमजली बंगला आहे. त्यांच्याकडे ३५० कोटींच्या मुदत ठेवी आहेत. तर टाटा सन्समध्ये ०.८३ टक्के इतकी भागीदारी आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. टाटा सन्समधील त्यांची भागीदारी आता रतन टाटा एंडॉवमेंट फाउंडेशनकडे (RTEF) जाणार आहे. तर त्यांना मिळालेले पुरस्कार आणि पारितोषिके टाटा सेंट्रल आर्काइव्ह्जकडे सुपूर्द केली जाणार आहेत. या माध्यमातून रतन टाटा यांचा वारसा आगामी पिढ्यांनाही कळू शकणार आहे.

सहकारी शंतनू नायडू आणि कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध

रतन टाटा हे आपल्या कर्मचाऱ्यांनाही जीव लावत असत. विदेश दौऱ्यावर ते त्यांचा स्वयंपाकी राजन आणि सुबय्या यांना घेऊन जात असत. तिथे ते त्यांच्यासाठी कपडे खरेदी करायचे. सुबय्या हे टाटा यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ काम करत आहेत. याचबरोबर रतन टाटा यांच्या इच्छापत्रात त्यांचा तरुण सहकारी शंतनू नायडूचाही उल्लेख केला आहे. नायूडच्या गुड फेलोज या कंपनीतील वाटा रतन टाटा यांनी सोडला आहे. तसेच शंतनू नायडूला परदेशात शिक्षण घेण्यासाठी दिलेले कर्जही त्यांनी माफ केले आहे.

हे वाचा >> ‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव

श्वान टीटोचीही सोय

रतन टाटा यांनी सहा वर्षांपूर्वी जर्मन शेफर्ड टीटोला दत्तक घेतले होते. याच नावाचा त्यांचा आधीचा श्वान दगावला होता. रतन टाटा यांनी श्वानांवर इलाज करण्यासाठी जुलै २०२३ मध्ये महालक्ष्मी येथे एक छोटेखानी रुग्णालय उघडले होते. ज्यामध्ये श्वानांसाठी आयसीयू, सीटी स्कॅन, एक्स रे आणि एमआरआयसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

१६५ कोटीं खर्च करून पाळीव प्राण्यांसाठी पहिले हॉस्पिटल! प्राणी प्रेमी रतन टाटा यांचा शेवटचा प्रकल्प…

पाश्चिमात्य देशांत पाळीव प्राण्यांसाठी इच्छापत्रात तरतूद केली जात असते. त्याप्रमाणेच रतन टाटा यांनी टीटोची काळजी घेण्यासाठी त्याची जबाबदारी राजन शॉ यांच्याकडे दिली आहे.

मृत्यपत्र कोण अमलात आणणार?

रतन टाटा यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी चार लोकांची निवड करण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने यापूर्वी दिले होते. वकील दारियस खंबाटा, रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डिआना जीजीभॉय यांची यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata ensured care for pet dog tito in will assistant naidu and butler subbiah too find mention kvg