Ratan Tata’s Successors Meet Tata’s next Generation : टाटा समुहाचे माजी चेअरमन, उद्योगपती व समाजसेवक रतन टाटा यांचं बुधवारी (९ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा हे त्यांच्या व्यवसायांइतकेच परोपकारी कामांमुळे चर्चेत असायचे. टाटा समुहाचे प्रमुख म्हणून त्यांची जगभर ओळख असली तरी एक समाजसेवक म्हणूनही त्यांना लोक ओळखतात. टाटा समुहाचं साम्राज्य विस्तारण्यात रतन टाटांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा सन्सने नवी उंची गाठली आणि जगभर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. तर टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यासाठी, देशातील गरिबांचं जीवनमान सुधारण्यासाठी देखील ते आयुष्यभर झटत राहीले. हे सगळं करत असतानाच ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहीले. साधी राहणी, उच्च विचारसरणीसह सर्वोच्च दर्जाचं काम करण्यासाठी ते ओळखले जातात.
रतन टाटा ३,८०० कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. तसेच, टाटा समुहाने ३० लाख कोटींचं (नेट वर्थ) साम्राज्य उभं केलं आहे. कुटुंबातील अनेक पिढ्यांनी आणि या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टाटा समुहाचा वटवृक्ष वाढवला आहे. रतन टाटांच्या निधनानंतर आता टाटा समुहाची धुरा कोण सांभाळणार? टाटांच्या अनेक पिढ्यांनी उभा केलेला हा वटवृक्ष कोण वाढवणार? रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
रतन टाटांनी विवाह केला नाही, त्यांना मुलंबाळं देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांची चर्चा होत असते. रतन टाटांनी टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर २०१७ पासून एन. चंद्रशेखर हे या कंपनीचे चेअरमन म्हणून कारभार पाहत आहेत. यासह टाटा समुहातील वेगवेगळ्या कंपन्या टाटांच्या कुटुंबातील वेगवेगळे लोक चालवतात. तसेच टाटांचे अनेक निकटवर्तीय वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
हे ही वाचा >> उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे
रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे आहे. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पुत्र नोएल टाटा हे भविष्यात टाटा समुहाची कमान सांभाळताना आपल्याला दिसू शकतात. नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत.
शर्यतीत माया टाटांचं नावही पुढे
नोएल टाटा यांची कन्या व ३४ वर्षीय माया टाटा सध्या टाटा समुहात महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसतात. Bayes Business School व University of Warwick मधून शिकून भारतात परतलेल्या माया टाटा या टाटा अपॉर्च्युनिटिज फंड व टाटा डिजीटलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. Tata Neu अॅप लाँच करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दूरदृष्टी आणि उत्कृष्ट रणनितीमुळे टाटा समुहात माया टाटा यांचं नाव मोठं झालं आहे. त्यामुळे त्या देखील रतन टाटांच्या उत्तराधिकारी बनू शकतात.
हे ही वाचा >> भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?
नेविल टाटा
नोएल टाटांचे पूत्र, ३२ वर्षीय नेविल टाटा देखील भविष्यात टाटा समुहाची धुरा सांभाळू शकतात. नेविल यांनी टोयोटा किर्लोस्कर समुहाच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला आहे. नेविल हे स्टार बाझारचे प्रमुख आहेत. ही कंपनी हायपरमार्केट चेन ट्रेंट लिमिटेड अंतर्गत येते.
लीह टाटा
नोएल टाटांची सर्वात मोठी मुलगी ३९ वर्षीय लीह टाटा या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करत आहेत. ताज हॉटेल्स आणि रिसॉर्ट, पॅलेसेसचा कारभार लीह टाटा पाहत आहेत. लीह टाटा यांनी हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये टाटा समुहाची उंची वाढवण्याचं काम केलं आहे.