Ratan Tata’s Successors in Family Half Brother Noel Tata : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. टाटा समुहाचं साम्राज्य विस्तारण्यात रतन टाटांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, रतन टाटा ३,८०० कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. तसेच, टाटा समुहाने ३० लाख कोटींचं (नेट वर्थ) साम्राज्य उभं केलं आहे. टाटा घराण्यातील अनेक पिढ्यांनी आणि या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टाटा समुहाचा वटवृक्ष वाढवला आहे. रतन टाटांच्या निधनानंतर आता टाटा समुहाची धुरा कोणाकडे जाणार? टाटांच्या अनेक पिढ्यांनी उभा केलेला हा वटवृक्ष कोण वाढवणार? रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असणार? यावर वेगवेगळी चर्चा चालू आहे. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे आता टाटा समूह सांभाळतील अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे आहे. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झालं होतं. सूनी व नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन व जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी देखील लग्नं केली नाहीत. तर, नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.

हे ही वाचा >> Ratan Tata : २६/११ च्या गोळीबारादरम्यान रतन टाटा ताज हॉटेलजवळ पोहोचले अन्…, मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम; मृतांच्या कुटुंबांना केलेली मोठी मदत

बिझनेस टूडेच्या अहवालानुसार नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते टायटन लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष देखील आहेत. याआधी सलग ११ वर्षे ते ट्रेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. ते ट्रेंटचे उपाध्यक्ष असताना ट्रेंटचं केवळ एक स्टोर होतं. त्यानंतर त्यांनी ट्रेंटची ७०० स्टोर उभी केली. ते नेरोलॅक पेंट्स व स्मिथ्सच्या संचालक मंडळावर देखील आहेत. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण धेतलं आहे.

हे ही वाचा >> Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना

शर्यतीत माया टाटांचं नावही पुढे

नोएल टाटा यांची कन्या व ३४ वर्षीय माया टाटा या देखील भविष्यात टाटा समुहाची धुरा सांभाळू शकतात. माया टाटा या टाटा अपॉर्च्युनिटिज फंड व टाटा डिजीटलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. Tata Neu अ‍ॅप लाँच करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दूरदृष्टी आणि उत्कृष्ट रणनितीमुळे टाटा समुहात माया टाटा यांचं नाव मोठं झालं आहे. त्यामुळे त्या देखील रतन टाटांच्या उत्तराधिकारी बनू शकतात.