RBI cuts repo rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली असून व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जाते. रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका आता गृह आणि वाहन कर्जांवरील व्याजदर कमी करू शकतात आणि याबरोबरच मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) वरील व्याजदरही कमी होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर कर्ज स्वस्त होतात आणि एफडीवरील परतावा कमी मिळतो. तर व्याजदर जेव्हा वाढतो तेव्हा कर्ज महाग होऊन एफडीवर अधिक व्याज मिळते. करोना महामारीतून बाहेर पडण्यासाठी २०२० साली रिझर्व्ह बँकेने रेपो रेट अर्थात व्याजदरात ४० बेसिस पाईंट्सची घट केली होती. तेव्हापासून डिसेंबर २०२२ पर्यंत रेपो रेटमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. सलग वाढीमुळे व्याजदर ६.५ टक्क्यांवर पोहोचला होता. फेब्रुवारी २०२३ पासून व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.
रेपो रेट कपातीचा एफडीवर काय परिणाम होणार?
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पाईंट्सची कपात केल्यामुळे गेल्या चार वर्षांत कर्जासाठी जे उच्च व्याजदर होते, त्यात बदल अपेक्षित आहेत. कर्जावर उच्च व्याजदर असल्यामुळे बँकांमध्ये मुदत ठेवींवर (एफडी) आकर्षक व्याज मिळाल्यामुळे ठेवी वाढल्या. तथापि, आता कर्जे स्वस्त होणार असल्यामुळे एफडीवरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात होऊ शकते. ज्यामुळे निवृत्त कर्मचारी आणि पारंपरिक गुंतवणूकदारांवर परिणाम होऊ शकतो.
फेब्रुवारी महिन्याच्या पतधोरणात रिझर्व्ह बँक दर कपात करेल, अशी शक्यता असतानाही अलीकडेच काही बँकांनी एफडीवर आकर्षक परतावा दिला होता. मागच्या महिन्यात युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, कर्नाटक बँक आणि फेडरल बँक यासांरख्या बँकांनी मुदत ठेवी दरांमध्ये वाढ केली होती.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)
पीएनबी बँकेने १ जानेवारीपासून ३०३ दिवसांसाठी (७ टक्के), ५०६ दिवसांसाठी (६.७ टक्के) नवीन एफडी दर लागू केले होते. सामान्य नागरिकांसाठी एफडी दर ३.५ टक्के ते ७.२५ टक्के पर्यंत होते. ज्यामध्ये ४०० दिवसांच्या कालावधीवर ७.२५ टक्के हा सर्वोच्च दर दिला जात होता.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक (SFB)
शिवालिक बँकेने २२ जानेवारी रोजी नवीन एफडी दर जाहीर केले होते. सामान्य नागरिकांसाठी ३.५ ते ८.८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ ते ९.३ टक्के दर ठेवले होते.
कर्नाटक बँक
कर्नाटक बँकेने २ जानेवारी रोजी सामान्य नागरिकांसाठी एफडी दर ३.५० ते ७.५० टक्के पर्यंत वाढवले. ३७५ दिवसांच्या कालावधीसाठी ७.५० हा सर्वोच्च दर उपलब्ध होता.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँकेने १ जानेवारीपासून एफडीवर ३.५० ते ७.३० टक्के व्याज जर दिला. ४५६ दिवसांसाठी ७.३० टक्के हा सर्वोच्च दर दिला.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँकेने २७ जानेवारीपासून एफडी वर ३ ते ७.२५ टक्के व्याजदर दिला होता. ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ७.२५ टक्के हा सर्वोच्च दर दिला होता.
फेडरल बँक
फेडरल बँकेने १० जानेवारीपासून नवे दर जाहीर केले होते. सामान्य नागरिकांसाठी ३ ते ७.५० टक्के आणि ४४४ दिवसांसाठी ७.५० टक्के हा सर्वोच्च दर दिला होता.