रिझर्व्ह बँकेने आता ईशान्य भारताकडे आपले लक्ष वळविले आहे. याअंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या उपकार्यालयाचे कोहिमामध्ये मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. इटानगर येथे नवीन उपकार्यालय सुरू करण्याची घोषणाही रिझर्व्ह बँकेने केली आहे. नागालँडची राजधानी कोहिमातील उपकार्यालयाचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर देवव्रत पात्रा यांच्या हस्ते झाले.
या निमित्ताने रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाचा ईशान्य भारतात आणखी विस्तार झाला आहे. आता ईशान्य भारतात रिझर्व्ह बँकेची आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये कार्यालये आहेत. आसाममधील गुवाहाटीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून सध्या अरुणाचल प्रदेशचे कामकाज चालते. अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये लवकरच नवीन कार्यालय सुरू करून तिथून कामकाज सुरू होणार आहे.
हेही वाचाः या वर्षी ६,५०० अतिश्रीमंत व्यक्ती भारताचा त्याग करणार : अहवाल
कोहिमातील उपकार्यालयात वित्तीय सर्वसमावेशकता व विकास विभाग, ग्राहक साक्षरता व संरक्षण, बाजारपेठ गुणवत्ता विभाग आणि मनुष्यबळ विकास विभाग असतील. नागालँडचा चलन व्यवस्थापन विभाग मात्र गुवाहाटी कार्यालयातूनच सुरू राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
हेही वाचाः ‘फोर्ब्स’च्या यादीत रिलायन्सची ४५ व्या क्रमांकावर झेप, इतर भारतीय कंपन्या कुठे?