Reinvest or cash out Matured Investments : एखाद्या गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो. पैसे काढायचे की भविष्याचा विचार करून पुन्हा नवी गुंतवणूक करायची? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशा वेळी आपली आर्थिक उद्दीष्टे आणि बाजाराची स्थिती पाहून निर्णय घेणं कधीही उत्तम. पुन्हा गुंतवणूक केल्याने आपली संपत्ती वाढवण्यास मदत होते. तर पैसे आत्ता काढले तर आत्ताचे खर्च भागवता येतील किंवा सध्याची आर्थिक आव्हाने पार करता येतील. दोन्हीपैकी कोणताही निर्णय घेतल्याने वेगवेगळे फायदे मिळतात. त्याचबरोबर काही तोटे देखील सहन करावे लागू शकतात.

एखाद्या गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मूळ रकमेपेक्षा अधिक पैसे मिळालेले असतात. म्हणजेच त्या पैशांबाबत सुज्ञ निर्णय घेण्याची संधी मिळालेली असते. ही गुंतवणूक कोणत्याही स्वरुपाची असू शकते, जसे की मुदत ठेव, रोखे किंवा शेअर्स

पुन्हा गुंतवणूक करायची का याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही घटक तपासण्याची आवश्यकता असते. ते घटक खालीलप्रमाणे. दी फिनॅन्शियल एक्सप्रेसने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

१. आर्थिक उद्दिष्टे

आपली सध्याची आर्थिक उद्दिष्टे तपासायला हवीत. तुम्ही जर दीर्घकालीन वाढ, तात्काळ परतावा किंवा आर्थिक स्थिरता शोधत असाल आणि त्यासाठीचा उत्तम पर्याय समोर उपलब्ध असेल तर पुन्हा गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

२. बाजाराची स्थिती

तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करायची आहे, मात्र बाजाराची स्थिती चांगली नसेल तर गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागेल. कारण या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे व्याजदर, महागाई व बाजारातील स्थिरतेचा विचार करून निर्णय घ्या

३. जोखीम किती आहे ते तपासा

तुमची जोखीम स्वीकारण्याची मानसिकता आहे का ते तपासा. म्हणजेच आर्थिक नुकसान झालं किंवा पुरेसा परतावा मिळाला नाही तर ते सहन करण्याची क्षमता असायला हवी. जिथे जोखीम जास्त तिथे परतावा अधिक मिळतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र त्यासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागू शकते. बाजाराची स्थिती खराब असेल तर बाजार पुन्हा सुस्थितीत येण्याची वाट पाहावी लागू शकते. तुमची वाट पाहण्याची तयारी आहे का हे तपासा.

४. करात सूट

तुम्ही ज्या प्रकारची गुंतवणूक करू इच्छिता त्याद्वारे तुम्हाला करात सूट मिळणार आहे का ते तपासा.

दरम्यान, तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते योग्य ठिकाणी वापरले जाणार आहेत का ते देखील तपासायला हवं.

१. इमर्जन्सी फंड

आपल्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये इमर्जन्सी फंड (आपत्कालीन निधी) असावा अशी शिफारस प्रत्येक आर्थिक सल्लागार करत असतो. तुमच्याकडे आपत्कालीन निधी नसेल तर तुमच्या गुंतवणुकीतील काही भाग अनपेक्षित खर्चांसाठी (उदा. वैद्यकीय गरजा) बाजूला काढून ठेवा.

२. कर्ज फेडणे

बाजाराची स्थिती बरी नसेल आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत नसेल, त्याच काळात तुमच्या एखाद्या गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाला असेल तर अशा वेळी तुम्ही कर्ज फेडण्याला प्राधान्य द्यायला हवं. अधिक व्याजदरामुळे अनेक कर्जदारांचं कंबरडं मोडलेलं असतं. अशा वेळी कालावधी पूर्ण झालेली गुंतवणूक वापरणं कर्जाचा हप्ता कमी करणं किंवा कर्जाची मुद्दल कमी करणं अधिक उत्तम मानलं जातं.

Story img Loader