Advantage Assam 2.0 Investment and Infrastructure Summit 2025 : ईशान्य भारतातील राज्य आसाम अलीकडच्या काळात वेगाने विकसित होत आहे. आसामच्या विकासाचा हा वेग आता आणखी वाढणार आहे. ‘अ‍ॅडव्हान्टेज आसाम २.० इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर समिट २०२५’ या परिषदेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य व मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यावेळी उपस्थित होते. या बिझनेस समिटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी, जेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदाल, एस्सारचे प्रमुख प्रशांत रुइया, वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्यासह देश-विदेशातील अनेक मोठमोठे उद्योजक सहभागी झाले आहेत. या बिझनेस समिटच्या माध्यमातून आसाममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी व अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी मोठ्या घोषणा केल्या. भारतातील हे दोन्ही मोठे उद्योजक व त्यांच्या कंपन्या आसाममधील विविध व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. दोन्ही उद्योजकांनी आसाममध्ये प्रत्येकी ५० हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचं जाहीर केलं आहे. रिलायन्स व अदाणी समूह राज्यात १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज आसाममध्ये ५० हजार कोटी रुपये गुंतवणार

मुकेश अंबानी या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले, “आमची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी पुढील पाच वर्षांत आसाममध्ये ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मी ऊर्जा व सृजनाची देवी माता कामाख्याकडे प्रार्थना करतो की त्यांनी केवळ आसामच नव्हे तर संपूर्ण भारताला आशीर्वाद द्यावा. आगामी काळात आम्ही आसाम राज्याला तंत्रज्ञानाचा स्वर्ग बनवू. आसाममधील तंत्रज्ञानप्रेमी तरुण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नवा अर्थ देतील”.

गौतम अदाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५० हजार कोटी रुपये गुंतवणार

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी म्हणाले, “आमचा समूह या राज्यात येत्या पाच वर्षांत ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. राज्यातील विमानतळं, एअरोसिटी, सिटी गॅस वितरण, ट्रान्समिशन, सिमेंट व रस्त्यांचे प्रकल्प, उड्डाणपूलांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल”.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries adani group to invest 100000 crore assam across various sectors asc