भारतीय भांडवली बाजारातील आघाडीची कंपनी असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने फोर्ब्सच्या ‘ग्लोबल २०००’ सूचीत ४५ वे स्थान मिळविले आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या या प्रतिष्ठित सूचीतील कोणत्याही भारतीय कंपनीला मिळालेले हे सर्वोच्च स्थान आहे. विक्री, नफा, मालमत्ता आणि बाजार मूल्य या चार महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे जगातील आघाडीच्या दोन हजार कंपन्यांचा समावेश या ‘ग्लोबल २०००’ सूचीत केला गेला आहे. फोर्ब्सने २०२३ सालासाठी तयार केलेल्या सूचीत रिलायन्स इंडस्ट्रीजने आठ स्थानांनी झेप घेत ५३ वरून ४५ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण विक्री १०९.४३ अब्ज डॉलर आणि नफा ८.३ अब्ज डॉलरवर पोहोचल्याने ही मोठी झेप शक्य झाली आहे. रिलायन्सने ही मुसंडी घेताना, जर्मनीचा बीएमडब्ल्यू समूह, स्वित्झर्लंडच्या नेस्ले, चीनचा अलिबाबा समूह, अमेरिकेतील प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि जपानच्या सोनी यासारख्या नामांकित कंपन्यांना मागे सारले आहे. अमेरिकेतील आघाडीची वित्त कंपनी जेपी मॉर्गन ३.७ लाख कोटी डॉलर मालमत्तेसह २०११ पासून या सूचीत शीर्षस्थानी कायम आहे. त्यांनतर सौदी अरेबियाची तेल कंपनी आराम्को दुसऱ्या स्थानावर आहे, तर नंतरच्या तीन स्थानांवर चीनमधील सरकारी मालकीच्या बँकांचा समावेश आहे. तर अमेरिकी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अल्फाबेट आणि ॲपल अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. गेल्यावर्षी आघाडीवर असलेली वॉरेन बफे यांची बर्कशायर हाथवेची भांडवली बाजारातील पडझडीमुळे झालेल्या नुकसानीने ताज्या यादीत ३३८ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

हेही वाचाः सुभाष चंद्रा, पुनित गोयंका यांना कंपनी संचालकपद स्वीकारण्यास बंदी, सेबीच्या आदेशाविरोधात दोघांची ‘सॅट’कडे धाव

इतर भारतीय कंपन्या कुठे?

स्टेट बँक २०२२च्या क्रमवारीत १०५ व्या स्थानावरून यंदा ७७ व्या स्थानावर पोहोचली आहे. एचडीएफसी बँक १२८ व्या स्थानावर आहे (२०२२ मध्ये १५३) आणि आयसीआयसीआय बँकेने १६३ वे (२०२२ मध्ये २०४) स्थान गाठले आहे. या यादीतील इतर भारतीय कंपन्यांमध्ये सरकारी मालकीच्या ओएनजीसीचा २२६ वा क्रमांक लागतो आणि तर एचडीएफसी २३२ व्या स्थानी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने ३६३ वा क्रमांक पटकावला आहे. आहे, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस गेल्या वर्षीच्या ३८४ वरून ३८७ व्या क्रमांकावर घसरली आहे. तर यामध्ये अॅक्सिस बँक (४२३), एनटीपीसी (४३३), लार्सन अँड टुब्रो (४४९), भारती एअरटेल (४७८), कोटक महिंद्र बँक (५०२), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (५४०), इन्फोसिस (५५४), बँक ऑफ बडोदा (५८६), कोल इंडिया (५९१), टाटा स्टील (५९२), हिंदाल्को (६६०) आणि वेदांत (६८७) या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत एकूण ५५ भारतीय कंपन्यांचा स्थान मिळाले आहे.

हेही वाचाः ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये आले १०३ कोटी रुपये, गुंतवणुकीसाठी समजला जातो सुरक्षित पर्याय

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jumps to 45th in forbes list where are other indian companies vrd