अजय वाळिंबे
क्रिसिल लिमिटेड ही जागतिक स्तरावर वैविध्यपूर्ण विश्लेषणात्मक कंपनी असून, मुख्यत्वे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग), संशोधन, जोखीम आणि धोरणात्मक सल्ला इत्यादी सेवा ती प्रदान करते. एस ॲण्ड पी ग्लोबल इन्क. या आंतरराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी ‘क्रिसिल’ भारतातील अग्रगण्य सर्वात मोठी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय मोठ्या बँका तसेच आघाडीच्या वित्तीय संस्था, कॉर्पोरेशन्सना क्रिसिल रिसर्च विश्लेषण सेवा तसेच कर्ज साधनांच्या संपूर्ण श्रेणीतील सेवा पुरवते. कंपनीचा सल्लागार व्यवसाय इन्फ्रास्ट्रक्चर ॲडव्हायजरी आणि बिझनेस इंटेलिजन्स आणि रिस्क सोल्यूशन्स या दोन क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
आज ८००० पेक्षा जास्त मोठ्या आणि मध्यमस्तरीय कॉर्पोरेट्स आणि वित्तीय संस्थांबाबत क्रिसिलकडून पतमापन केले गेले आहे. पतमापन हा कंपनीचा सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे. या सेवेचा एकूण महसुलात केवळ २८ टक्के हिस्सा असला, तर नक्त नफ्यात त्याचा ५१ टक्के हिस्सा आहे. ‘सेबी’च्या नियमांमधील बदलांनुसार कंपनीने आपला क्रेडिट रेटिंग व्यवसाय पूर्णपणे विभक्त करून, क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड या उपकंपनीकडे वर्ग केला आहे. कंपनीचा संशोधन व्यवसायाचे महसुलात ६५ टक्के योगदान असून तो चार क्षेत्रांमध्ये विभागला आहे.
इंडिया रिसर्च – हे एक आघाडीचे स्वतंत्र संशोधन गृह असून ते भारतातील अर्थव्यवस्था आणि उद्योगांना सर्वात विश्वासार्ह माहिती प्रदाता आहे. यामध्ये भारतातील ७७ क्षेत्रांचा समावेश आहे. यात मुख्यत्वे भारतातील विमा आणि बँकिंग उद्योगाचा समावेश होतो.
ग्लोबल रिसर्च आणि ॲनालिटिक्स – या क्षेत्रात कंपनी १४० हून जास्त जागतिक आणि प्रादेशिक वित्तीय संस्थांना उच्च-अंत जोखीम, विश्लेषणे आणि संशोधन सेवा प्रदान करते. जागतिक स्तरावर अग्रगण्य गुंतवणूक आणि व्यावसायिक बँका, हेज फंड आणि मालमत्ता व्यवस्थापन तसेच विमा कंपन्यांचा समावेश होतो. अर्जेंटिना, चीन, पोलंड, लंडन, मेलबर्न, सिडनी आणि न्यूयॉर्क येथे कंपनीची सेवा केंद्रे आहेत. क्रिसिल कोलिशन – या अंतर्गत कंपनी जागतिक वित्तीय सेवा उद्योगातील २५ हून आधिक कॉर्पोरेट्स आणि इन्व्हेस्टमेंट बँकांना सेवा प्रदान करते. ग्रीनविच असोसिएट्स – ही क्रिसिलची एक उपकंपनी आहे जी वित्तीय सेवा उद्योगाला डेटा, विश्लेषणे आणि अंतर्दृष्टी प्रदान करते.
क्रिसिलचे शेवटच्या तिमाहीचे आणि २०२२ या आर्थिक वर्षाचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या तिसऱ्या तिमाहीच्या कालावधीत १९.६ टक्के वाढीसह ६८३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ५७१ कोटी), १४८ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ११३ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ३१ टक्क्यांनी अधिक आहे. वाढते व्याज दर आणि सातत्याने होणाऱ्या रोखे विक्रीमुळे कंपनीची अशीच कामगिरी नजीकच्या कालवधीत देखील अपेक्षित आहे. २०२४ मध्ये कंपनीची प्रगतीची घोडदौड वाढेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रॅंड आणि विस्तृत उत्पादन श्रेणी असलेली क्रिसिल पोर्टफोलिओसाठी म्हणून आकर्षक वाटते.
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
क्रिसिल लिमिटेड (बीएसई कोड ५०००९२)
प्रवर्तक : एस ॲण्ड पी ग्लोबल इंक
बाजारभाव: रु. ३०२० /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पतमानांकन
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ७.३० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६६.७२
परदेशी गुंतवणूकदार ६.६९
बँक/ म्यु. फंड/ सरकार १३.१०
इतर/ जनता १३.५०
पुस्तकी मूल्य: रु. २१५/- `
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: ४६००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७८.८०
किंमत उत्पन्न गुणोत्तर: —
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३.४
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०७
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १०५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ३९.५
बीटा : ०.६
बाजार भांडवल: रु. २२,०६५ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३,८६४/ २,५४०
अजय वाळिंबे / stocksandwealth@gmail.com