केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने UCO बँकेतील ८२० कोटींच्या आयएमपीएस व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राजस्थान आणि महाराष्ट्रामधील सात शहरात ६७ ठिकाणी छापेमारी केली आहे. मागच्या वर्षी १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान ८,५३,०४९ एवढे आयएमपीएस व्यवहार झाले होते. या व्यवहारांमध्ये एकून ८२० कोटींची रक्कम चुकीच्या पद्धतीने युको बँकेतील ४१ हजार बँक खात्यात वळविण्यात आली होती.
माहितीनुसार, सात खासगी बँकेच्या १४,६०० बँक खात्यामधून आयएमपीएस व्यवहाराद्वारे ८२० कोटी रुपये युको बँकेतील ४१ हजार बँक खात्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वळविण्यात आले. यामुळे युको बँकेत ८२० कोटी रुपये जमा झाल्याचे दिसले. पण ज्या बँकातून पैसे वळविण्यात आले होते, त्या बँक खात्यातून पैसे वजाच झाले नव्हते.
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, राजस्थान आणि महाराष्ट्रातील ज्या लोकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वळविण्यात आली होती, त्यांनी पैसे बँकेले परत न करता ते काढून घेतले होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली. सीबीआयने केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये कोलकाता आणि मंगळुरु या शहरांमध्ये १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी बँकेशी संबंधित अधिकारी आणि काही खासगी लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. या छापेमारीदरम्यान सीबीआयने युको बँक आणि आयडीएफसी बँकेशी निगडित १३० कागदपत्रे हस्तगत केली होती. तसेच ४३ डिजिटल उपकरणे (ज्यामध्ये ४० मोबाइल, २ हार्ड डिस्क आणि एक इंटरनेट डोंगल) तांत्रिक विश्लेषणासाठी जप्त केले होते.
अयशस्वी व्यवहार दाखवून पैसे लुटले
युको बँकेच्या म्हणण्यानुसार, या फसवणुकीत ज्या खात्यांमधून पैसे वळविण्यात आले होते ते अयशस्वी व्यवहार दर्शवत होते. पण युको बँकेच्या खात्यात पैसे येत होते. हा पैसाही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे खर्च केला. तसेच इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले. ही समस्या तांत्रिक समस्या असल्याचे वर्णन करताना यूको बँकेने सांगितले की, IMPS सेवेतील समस्येमुळे अडकलेल्या ८२० कोटींपैकी सुमारे ६४९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित १७१ कोटी रुपयेही लवकरच वसूल केले जातील. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की, सर्वात मोठी अडचण IDFC फर्स्ट बँकेच्या बचत खात्यातून UCO बँकेत IMPS करण्यात होती. यामध्ये IDFC फर्स्ट बँक खात्यातून पैसे डेबिट झाले नाहीत. पण UCO बँक खात्यात पैसे यायचे.