Sensex, Nifty Today: आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. अशातच जागतिक संकेत अनुकूल नसल्यामुळे त्याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्क वाढविण्याची घोषणा केलेली आहे. २ एप्रिल रोजी त्याबाबत माहिती जाहीर केली जाईल. त्यामुळे जागतिक बाजारावर अनिश्चिततेचे सावट आहे. आज बाजार उघडताच (सकाळी ९.२५ वा.) बीएसई निर्देशांकांत ४०८.८१ अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी ५० ही ८२.१० अंकांनी घसरला. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरलेला पाहायला मिळाला. तर निफ्टीमध्येही ३०० अंकाची मोठी पडझड झाली.
अमेरिकेच्या शुल्क वाढीच्या घोषणेमुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला फटका बसला आहे. निफ्टी आयटी इंडेक्स १.५ टक्क्याने घसरला तर इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सारख्या कंपन्यांचे शेअर्स १ टक्क्याने घसरले.
बाजारावर परिणाम करणारे मुख्य घटक कोणते?
अमेरिकेची शुल्क वाढ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून जगातील सर्व देशांवर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. या कृतीला ट्रम्प यांनी मुक्ती दिन (Liberation Day) असे संबोधले आहे. ‘आम्ही सर्व देशांवर कर लादणार आहोत, मग पुढे काय होते ते पाहू’, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
जागतिक बाजारात काय परिस्थिती? – सोमवारी आणि मंगळवारी जागतिक शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली होती. गुंतवणूकदार ट्रम्प यांच्या कराच्या घोषणेतील स्पष्टतेची वाट पाहत होते. अमेरिकेतील शेअर बाजार तेजीने बंद झाला.
आरबीआयचे चलनविषयक धोरण – आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ७ ते ९ एप्रिल दरम्यान होणार आहे. २५ बेसिस पॉईंट्समध्ये कपात करण्यावर एकमत झाल्याचे समजते. आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या जीडीपी आणि महागाईच्या दराबाबत आरबीआयकडून घेतला गेलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.