Share Market Crash Today: आज १ एप्रिल पासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. मात्र बाजाराची सुरूवात घसरणीने झाली. बीएसई आणि निफ्टी या दोन प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्याहून अधिकची घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलपासून जगातील सर्व देशांवर टॅरिफ लागू करणार आहेत. त्यामुळे बाजारावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून आले. सर्वाधिक घसरण आयटी स्टॉक्समध्ये दिसून आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स १,१०६.२३ अंकांनी घसरून ७६,३०८.९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीमध्ये २४३.२५ अंकांची घसरण होऊन निर्देशांक २३,२७६.१० वर खाली आला.

बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ३ लाख कोटी रुपयांनी घसरले. वित्त, बँक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी तर निफ्टी बँक निर्देशांक १.५ टक्क्यांनी खाली आला. बजाज ट्विन्स, बजाज फिन्सर्व्ह, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसमध्ये मोठी घसरण दिसून आली.

शेअर बाजार कोसळण्याची तीन प्रमुख कारणे

१. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ लादण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून (२ एप्रिल) जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजेच परस्परपुरक शुल्क लागू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारावर दबाव पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प या दिवसाला अमेरिकेसाठी मुक्ती दिन असल्याचे संबोधत आहेत. त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांवर यापूर्वीच टॅरिफ लावलेला आहे. उद्या ते नेमक्या कोणत्या क्षेत्रांना लक्ष्य करतात तसेच कोणत्या देशांवर किती शुल्क लावतात, याबाबत अनिश्चितता आहे.

२. कच्च्या तेलाच्या किमती उसळल्या

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल अर्थात कच्च्या तेलाच्या किमती उसळल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे दर १.५१ टक्क्यांनी उसळून ७४.७४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे त्याचा भारतातील किरकोळ बाजाराला सर्वाधिक फटका बसतो. सर्वाधिक इंधन आयात करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक प्रमुख देश आहे.

३. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोका

गोल्डमॅन सॅक्स या ब्रोकरेज कंपनीने अमेरिकेत मंदी येणार असल्याची ३५ टक्के शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी शक्यतेच्या टक्केवारीत वाढ केल्यामुळेही बाजारावर दबाव दिसून येत आहे. याआधी त्यांनी मंदीची शक्यता २० टक्के असल्याचे म्हटले होते. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकूडन होणाऱ्या टॅरिफ वाढीचे संभाव्य आर्थिक दुष्परिणाम सांगून त्यांनी मंदीच्या शक्यतेची टक्केवारी वाढवली आहे. युरोपियन युनियनमध्येही संभाव्य तांत्रिक मंदी येणार असल्याचा इशारा गोल्डमॅन सॅक्सने दिला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणुकदारांच्या भूमिकेवर परिणाम झाला आहे.