Stock Market Updates : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदा ७८ हजारांचा टप्पा गाठला आहे. तर निफ्टीची उच्चांकी दौड कायम असून आज दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक शिखर गाठले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ६५९.९९ अंशांची भर पडली आणि तो ७८,००० या सर्वोच शिखराच्या पुढे गेला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३,७१०.४५ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
भांडवली बाजाराने उच्चांकी स्तर गाठल्यामुळे गुंतवणूकदारांची मात्र चांगलीच कमाई झाली. आज गुंतवणूकदारांनी १६ हजार कोटींचा नफा कमविला. दरम्यान काही लोकांनी नफा काढून घेतल्यामुळे बीएसई मिडकॅप निर्देशांकात ०.२६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.०३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. बँकिंग आणि वित्तीय सेवांचा निर्देशांकात एक टक्क्यांची वाढ होऊन बंद झाला. तर रिॲलीटी, पॉवर आणि युटीलिटी समभागांच्या निर्देशांकात १ टक्क्यांची तूट होऊन बाजार बंद झाला.
बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्समध्ये ७१२.४५ अंशाची वाढ होऊन बाजार ७८,०५३.५२ वर बंद झाला. तत्पूर्वी सेन्सेक्सने ७८,१६४.७१ हा विक्रमी टप्पा गाठला. तर राष्ट्रीय बाजारातील निर्देशांक निफ्टी ५० मध्ये १८३.४५ अंशाची वाढ होऊन तो २३,७२१.३० वर स्थिरावला. आज निफ्टीनेही २३,७५४.१५ चा नवा उच्चांक प्रस्थापित केला.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची चिन्हे दिसत नसली तरी तिची गती मंदावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणुकांना सामोरे जात असलेल्या फ्रान्समधील वाढता राजकीय तणाव आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून विद्यमान वर्षात डिसेंबरपर्यंत व्याजदर कपात लांबणीवर पडण्याचे संकेत असल्याने जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटल्याने निर्देशांक उच्चांकी पातळीपासून खाली आले, असे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी व्यक्त केले.