Why is Stock Market Rising Today: सोमवारी शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्सने १,२०० अंकांची उसळी घेतली तर निफ्टीने ३०० अंकांची उसळी घेतली. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी बाजार उघडताच, कालची तेजी पुन्हा पाहायला मिळाली. सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये ७३९.५१ अंकाची उसळी पाहायला मिळाल्यामुळे निर्देशांक ७८,७२३.८९ वर पोहोचला. तर एनएसई निफ्टीमध्ये १९६ अंकाची वाढ झाल्यामुळे निर्देशांक २३,८५४ वर पोहोचला.
शेअर बाजारात पुन्हा तेजी येण्याची कारणे काय आहेत? गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह संचारण्याची अनेक कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक चित्र, अमेरिकन शेअर बाजाराला काल आलेला बहर, आयटी कंपन्यांना आलेली तेजी यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे परतल्याचे बोलले जात आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूक दलाल स्ट्रिटकडे परतले
शेअर बाजारातील तेजीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय शेअर बाजाराकडे पुन्हा वळले आहेत. दीर्घकाळ विक्रीचा सपाटा लावल्यानंतर गेल्या काही सत्रांमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
जिओजित इनव्हेस्टमेंट लिमिटेडचे प्रमुख डॉ. वि.के. विजयकुमार यांनी इंडिय टुडेला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, मागच्या तीन सत्रांमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जवळपास १३,७६५ कोटी शेअर्सची खरेदी केली आहे. यामुळे दलाल स्ट्रिटवर पुन्हा एकदा उत्साह संचारला असून किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलियोत पुन्हा हिरवा रंग पाहता येत आहे.
आयटी शेअर्समध्ये उसळी
बाजारात तेजी येण्याची आणखी एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन बाजारात आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ. अॅपल, एनव्हीडीया, टेस्ला यासारख्या प्रमुख अमेरिकन टेक शेअर्सचा या तेजीत मोठा वाटा होता. त्यामुळे आयटी क्षेत्राला चालना मिळाली. त्यामुळे भारतातही इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएलटेक यासारख्या प्रमुख आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
रुपया बलशाली
सोमवारी रुपया ३१ पैशांनी वाढून प्रति डॉलर ८५.६७ वर बंद झाला. ज्यामुळे या चलनाने तब्बल दीड रुपयांहून अधिक कमाईसह २०२५ मधील सर्व नुकसान भरून काढले. विदेशी गुंतवणुकीमुळेही रुपयाला आणखी बळकटी मिळाली.