Share Market Today Sensex And Nifty : हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालानंतर आणि त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टनंतर भारतातील शेअर मार्केटवर त्याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने सादर केलेल्या नव्या अहवालात त्यांनी सेबीच्या अध्यक्षांवर आरोप केले आहेत. यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. याचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होईल अशी भिती व्यक्त केली जात होती. याच गोष्टीची दखल घेत सेबीने रविवारी (११ ऑगस्ट) शेअर बाजाराबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यामुळे हिंडेनबर्गच्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली खरी मात्र त्याचा मोठा परिणाम झाला नाही.
सकाळी बाजार उघडल्यानंतर बीएसई सेन्सेक्स ३७५.७९ अंकांनी घसरून ७९,३३०.१२ अंकांवर थांबला. तर एनएसई निफ्टी ४७.४५ अंकांनी घसरून २४,३२०.०५ अंकांवर थांबला. सोमवारी बाजार सुरू होताच भारत डायनॅम्किसचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले. एनएसई निफ्टीवर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा व इन्फोसिससमोर हिरवा रंग दिसतोय, मात्र अदाणी एंटरप्रायजेस, अदाणी पोर्ट्स, अदाणी ग्रिड कॉर्पोरेशन व टाटा स्टीलचे शेअर्स घसरले आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्चने भारतीयांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात काहीतरी मोठं घडणार असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे. त्यापाठोपाठ त्यांनी सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलं होतं की माधवी बुच व त्यांच्या पतीची अदाणी मनी सायफनिंग घोटाळ्यात वापरलेल्या ऑफशोर फंडात भागिदारी होती. आम्ही त्याचे पुरावे सादर केले तरी सेबीने इतक्या मोठ्या घोटाळा प्रकरणात कोणतीही कारवाई केली आहे, उलट हिंडेनबर्गलाच नोटीस पाठवली. या सगळ्याचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसू लगला आहे. प्रामुख्याने अदाणी समुहाचे शेअर्स घसरले आहेत. हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अदाणी समुहाचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी घसरले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच ही घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं मोठे नुकसान झालं आहे.
हे ही वाचा >> Gold-Silver Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले? मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?
अदाणी समूहाच्या कोणते शेअर्स किती टक्क्यांनी घसरले?
१) अदाणी एंटप्रायजेस – ३.५५ टक्के
२) अदाणी पोर्ट्स अँन्ड एसईझेड – ४.८० टक्के
३) अदाणी ग्रीन एनर्जी – ४.४७ टक्के
४) अदाणी एनर्जी सोल्युशन्स – ४१.६ टक्के
५) अदाणी टोटल गॅस – ७.२२ टक्के
६) अदाणी विल्मर – ४.७२ टक्के