Goldman Sachs about Gold: अमेरिकेतील सुप्रसिद्ध वित्तसंस्था असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’ने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सोन्याच्या दरात नजीकच्या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता गोल्डमन सॅक्सने वर्तविली आहे. ‘गो फॉर गोल्ड’ या नावाने एक अहवाल गोल्डमन सॅक्स या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने एक चांगला सुरक्षा पर्याय ठरू शकतो. नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अतिरिक्त अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क घटविल्यामुळे सोन्याच्या दरात तीन हजारापर्यंतची घसरण झाली होती. मात्र महिन्याभरातच सोन्याच्या दराने पुन्हा उसळी खाल्ली.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक लवकरच व्याज दरात घट करणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे तेथील पैसा सराफा बाजारात गुंतवला जाऊ शकतो. मागच्या दोन वर्षात पाश्चिमात्य देशातील पैसा सोन्यात उतरल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.
हे वाचा >> बाजारातली माणसं : डेव्हिड सोलोमन- वाहक… समृद्धी अन् मंदीचेही!
यावर्षी स्पॉट गोल्डच्या दरात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. २० ऑगस्ट रोजी २,५३१.६० डॉलर प्रति औंस होती. (प्रति तोळा ७५,९१० रुपये) सोन्याचा दराचा हा ऐतिहासिक उच्चांकी दर मानला गेला. सोन्याच्या दरात आलेल्या तेजीला पाहून गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या दराच्या वाढीचे लक्ष्य २,७०० डॉलर इतके ठेवले आहे. २०२५ च्या सुरुवातीला सोने हे लक्ष्य गाठू शकते, असा अंदाज गोल्डमन सॅक्सतर्फे वर्तविण्यात आला आहे.
चीन बनले कारण?
चीनकडून सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. फेड रिझर्व्हनेही व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिल्यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. इतर कमोडिटिजबद्दलही गोल्डमन सॅक्सने अधिक सतर्कता बाळगली आहे. तेलाच्या दरात थोडी वृद्धी होऊ शकते, असे त्यांचे मानने आहे. या उन्हाळ्यात तेल कंपन्यांना कमी तोटा झाला. त्यामुळे २०२५ मध्ये तेलाचे दर अधिक सरप्लस होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Money Mantra : हे शेअर्स येत्या वर्षात चमकणार; ‘गोल्डमन सॅक्स’चा आशावाद
एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात ८४ रुपयांची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दर ७१,६८५ रुपयांवर पोहोचला.