लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’च्या माध्यमातून दीर्घावधीत अतुलनीय परतावा गुंतवणूकदारांनी मिळविला आहे. तथापि दर महिन्याला ‘एसआयपी’मध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा केले जातात, त्या आधारावर परताव्याचे प्रमाण ठरते. महिन्याच्या पहिल्या दिवशी गुंतवणूक केल्यास ती अधिक फायदेशीर ठरते, असे दीर्घकालीन कामगिरीचा वेध घेतला असता दिसून आले आहे.
महागाईचा आगडोंब आणि शेअर बाजारात अस्थिरता असताना, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाचा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. व्हाइट ओक कॅपिटल या म्युच्युअल फंड घराण्याने केलेल्या निरीक्षणातून ‘एसआयपी’ गुंतवणुकीविषयी अनेक रंजक गोष्टी पुढे आल्या आहेत.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना महिन्यातील कोणत्याही तारखेला ‘एसआयपी’ सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्या माध्यमातून दर महिन्याला निश्चित केलेल्या तारखेला बँकेतून गुंतवणुकीचा हप्ता कापून इच्छित योजनेत जमा होत असतो. सप्टेंबर १९९६ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान महिन्याच्या विशिष्ट तारखेसाठी केलेल्या ‘एसआयपी’च्या दहा वर्षांचा सरासरी परताव्याचा अभ्यास व्हाइट ओक कॅपिटलने केला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी केल्या गेलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीने सर्वाधिक १५.८० टक्के परतावा, तर महिन्यातील आठव्या, नवव्या दिवशी केलेल्या गुंतवणुकीवर सरासरी १५.७१ टक्के असा सर्वात कमी परतावा मिळविला गेला आहे.
‘एसआयपी’ला वाढती पसंती
सरलेल्या सप्टेंबरमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून विक्रमी १२,९७६.३४ कोटींची गुंतवणूक आल्याचे आढळून आले. म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना – ‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२२ अखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही ५,८३,७७,६८४ कोटी अशी विक्रमी स्तर गाठणारी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून मासिक गुंतवणुकीने पहिल्यांदाच १० हजार कोटींपुढचा टप्पा गाठत, १०,३५१.३३ कोटी रुपयांची नोंद केली होती, तर ३० सप्टेंबर २०२१ अखेर ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येने चार कोटींच्या घरात मजल मारली होती.