SBI Savings Account : भारतीय स्टेट बँक (स्टेट बँक ऑफ इंडिया) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. १ जुलै १९५५ रोजी या बँकेची स्थापना झाली असून मुंबईत या बँकेचं मुख्यालय आहे. बँकिंग सेवा पुरवणे, बचत खाते, चालू खाते, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, विमा सुविधा व क्रेडिट कार्डसह ही बँक ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. भारतात या बँकेच्या २२ हजारांहून अधिक शाखा असून ६२ हजारांहून अधिक एटीएम आहेत. भारताबाहेर अनेक मोठ्या देशांच्या राजधान्या व प्रमुख शहरांमध्ये एसबीआयच्या शाखा आहेत. आज आम्ही तुम्हाला याच एसबीआयमधील ग्राहकांच्या खात्यांविषयी माहिती देणार आहोत.

बचत खाते व चालू खात्याविषयी सर्वांना माहिती असते मात्र एसबीआयमध्ये तुम्हाला आठ वेगवेगळ्या प्रकारची खाती पाहायला मिळतील. एसबीआय ग्राहकांच्या विविध गरजांनुसार वेगवेगळ्या प्रकारची खाती उपलब्ध करून देते.

एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक अकाउंट

एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक अकाउंट हे एक झिरो बॅलेन्स बचत खातं आहे. यामध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती रुपये ठेवावेत याबाबत कोणतीही मर्यादा नाही.

एसबीआय बेसिक सेव्हिंग्स स्मॉल बँक अकाउंट

एसबीआय बेसिक सेव्हिंग्स स्मॉल बँक अकाउंट केवळ केवायसी दस्तावेज नसलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींसाठीचं बँक खातं असतं. या बँक खात्यात कमीत कमी बॅलेन्सबाबत कोणतीही मर्यादा नाही. मात्र, ग्राहक या खात्यात ५०,००० रुपयांहून अधिक रक्कम बाळगू शकत नाही.

एसबीआय सेव्हिंग्स बँक अकाउंट

एसबीआय सेव्हिंग्स बँक अकाउंट एक सामान्य बचत खातं आहे. यामध्ये नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, चेक बूकसारख्या सुविधा मिळतील.

एसबीआय मायनर सेव्हिंग्स अकाउंट

एसबीआय मायनर सेव्हिंग्स अकाउंटमध्ये दोन सुविधा मिळतील. यामध्ये लहान मुलाचं त्याच्या आई-वडिलांबरोबर जोडलेलं बँक खातं उघडता येतं. तसेच १० वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांचं बँक खातं देखील उघडता येतं.

एसबीआय सेव्हिंग्स प्लस अकाउंट

एसबीआय सेव्हिंग्स प्लस अकाउंट हे एमओडीशी जोडलेलं एक बचत खातं असतं. या खात्यावर अधिक व्याजदर प्रदान केला जातो. कारण यामध्ये स्वीप-इन-फॅसिलिटी मिळते. या बचत खात्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त बैसे असतील तर अतिरिक्त पैसे आपोआप एफडीमध्ये (फिक्स्ड डिपॉझिट) रुपांतरित होतात. त्या पैशांवर एफडीसाठीचं व्याज मिळतं.

एसबीआय व्हिडीओ केवायसी सेव्हिंग्स अकाउंट

एसबीआयचं व्हिडीओ केवायसी बचत खातं नावाप्रमाणेच व्हिडीओ केवायसीद्वारे उघडलं जातं. त्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसते.

एसबीआय एमएसीटी क्लेम सेव्हिंग्स अकाउंट

एसबीआयचं हे बचंत खातं मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाद्वारे (एमएसीटी) दिली जाणारी भरपाई प्राप्त करण्यासाठी उघडलं जातं. यामध्ये केवळ एकच खातं उघडता येतं. या खात्यात व्याज जमा होतं. तसेच पासबूक, चेकबूक, इंटरनेट बँकिंगची व एटीएमची सुविधा देखील मिळते.