Stock Market Crash Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी अमेरिकन नागरिकांसह जगभरातील अनेक देशांना धक्के देणारे निर्णय घेतले आहेत. नुकताच त्यांनी जगभरातील देशांवर परस्पर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारात पडझड झाली. ट्रम्प सरकारने भारतावरही २७ टक्के परस्पर आयात शुल्क लावलं आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे.
परिणामी अमेरिकेच्या निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या, त्यांचे समर्थन करणाऱ्या भारतीयांचे आता डोळे उघडले असतील असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले आहे. ते म्हणाले, “भारतीय शेअर बाजाराची अवस्था पाहून ट्रम्प समर्थक भारतीयांचं ‘अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणण्याचं धाडस होणार नाही.
गिरीश कुबेर म्हणाले, “आज भारतीय भांडवली बाजार जवळपास सव्वातीन हजार अंकांनी घसरला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जी भिती व्यक्त केली जात होती ती खरी ठरली आहे. काही लोकांना वाटत होतं की अमेरिकेचं आव्हान आपल्यासाठी तितकं गंभीर नाही, जे असत्य ठरलं आहे.”
“अगली बार ट्रम्प सरकार हा जो उन्माद चालू होता तो आता थांबेल”
दरम्यान, ‘अगली बार ट्रम्प सरकार’ हा जो काही उन्माद चालू होता तो आता थांबेल”, असं म्हणत कुबेर म्हणाले की “डोनाल्ड ट्रम्प मोदी यांचे मित्र आहेत ते आपल्याला काही करणार नाहीत. अमेरिकेत ट्रम्प यांचं सरकार आल्यावर आपल्यासाठी भारतात व अमेरिकेत छान वातावरण तयार होईल असं काहींना वाटत होतं. ही विचारधारा किती चुकीची होती हे देखील हे देखील आता अनेकांच्या लक्षात येईल.”
तीन दिवसांत अमेरिकन गुंतवणूकदारांना ६ ट्रिलियन डॉलर्सचा फटका
लोकसत्ताचे संपादक म्हणाले, “अमेरिकेने २ एप्रिलपासून नवं व्यापारी धोरण स्वीकारलं. त्यानंतर ३ एप्रिलपासून अमेरिकेचा भांडवली बाजार कोसळू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अमेरिकेत ६ ट्रिलियन डॉलर (सहा लाख कोटी डॉलर) इतक्या प्रमाणावर बाजारपेठीय मूल्य धुपलं आहे. भारतीय बाजारपेठेच्या आकारापेक्षा दिडपट नुकसान अमेरिकेने केवळ दोन ते तीन दिवसांत सहन केलं आहे. कारण भांडवली बाजार धुपला आहे. यामुळे आशियाई बाजारपेठा देखील गडगडल्या आहेत. जपान, सिंगापूरची स्थिती देखील वाईट आहे. या स्थितीत भारतावर परिणाम होणार नाही असं मानणारा जो वर्ग होता तो अज्ञानात सुखी होता असं म्हणावं लागेल. तसेच अमेरिकेतही असे अज्ञानी लोक होते. लोकांमधील हे अज्ञान दूर झाल्यावर आता अमेरिकेत निदर्शने होऊ लागली आहेत.