Why Stock Market Fell Today: गेल्या काही दिवसांत वर वर जाणाऱ्या शेअर बाजारात आज पुन्हा खळबळ उडाली. बुधवारी (२६ मार्च) सेन्सेक्समध्ये ७०० हून अधिक अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळून ७७,२८८.५० वर बंद झाला. तर निफ्टीही १८२ अंकांनी घसरून २३,४८६.८५ वर आला. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यासह स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांतही मोठी घसरण पाहायला मिळाली. स्मॉलकॅप १.४५ अंकांनी तर मिडकॅप निर्देशांकांत ०.६७ अंकांची घसरण झाली.
गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी रुपये पाण्यात
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी उसळी पाहायला मिळत होती. याकाळात अनेकांनी नफावसुली केली. त्यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य रुपये ४१५ लाख कोटीवरून कमी होऊन ४११ लाख कोटींवर आले. एकाच दिवसांत गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी बुडाले.
बाजारातील नफावसुलीचा परिणाम सर्वाधिक बँकिंग, मीडिया आणि रिअल इस्टेट सेक्टरवर पडला. निफ्टी बँक ०.७७ टक्के, पीएसयू बँक १.१९ टक्के आणि खासगी बँक ०.९० टक्क्यांनी कमी झाले. तर निफ्टी मीडिया निर्देशांक २.४० टक्क्यांनी घसरल्यामुळे तो टॉप लुजरमध्ये गणला गेला. रिअल इस्टेट, आरोग्य सेवा आणि तेल आणि वायू या क्षेत्रात एक टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
शेअर बाजार कोसळण्याची कारणे काय?
नफावसुली – मागच्या दोन आठवड्यात शेअर बाजार बऱ्यापैकी वधारला होता. यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणुकीवरील नफावसुली करण्यास सुरुवात केली. या नफावसुलीमुळे एचडीएफसी बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची भीती – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत कमालिची अनिश्चितता आहे. ट्रम्प यांनी दिलेली २ एप्रिल ही मुदत आता जवळ आली आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या क्षेत्रावर अधिक कर लावणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळेच आयटी आणि फार्मा कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झालेली पाहायला मिळाली.
विदेशी गुंतवणुकदारांच्या माघारीची चिंता – चीनच्या शेअर बाजारात तेजी आणि तिथे मिळणारा आकर्षक नफा, यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेऊ शकतात. Buy China, Sell India या ट्रेंडमुळे बाजारात चिंता निर्माण झाली आहे.