तीन दिवसांच्या सुट्टयानंतर आज शेअर बाजार उघडताच त्यात मोठी तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ३३४.०३ अंकाची वाढ पाहायला मिळाली ज्यामुळे आतापर्यंतची सार्वकालीन उच्चांकी पातळी गाठत सेन्सेक्स निर्देशांकाने ७७,२३५.३१ टप्पा गाठला. तर निफ्टीमध्ये १०८.२५ अंकाची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच २३,५७३ वर पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. तर मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी रिॲलिटी आणि ग्राहपयोगी वस्तू याक्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक आघाडी घेतली. बाजारात इतर ठिकाणी तेजी दिसत असताना फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर लाल रंगात दिसत होते.

ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यामध्येही ०.५ ट्कक्यांची वाढ दिसून आली. ओएनजीसी शेअरने १.२ टक्क्यांची वाढ झाली. केंद्र सरकारने १५ जून पासून कच्च्या इंधनावरील विंडफॉल कर ५,२०० रुपयांवरून ३,२५० रुपये प्रति मेट्रिक टनावर आणल्यामुळे त्याचाही प्रभाव बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सरकारी कंपन्यांमध्येही एक टक्क्याची वाढ पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, आयआरसीटीसी, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांच्या बाजारमूल्यात २ लाख कोटींची वाढ

१४ जून रोजी बीएसईवर अधिसुचित असलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य एकूण ४३४ लाख कोटी इतके होते. आज म्हणजे १८ जून रोजी यामध्ये वाढ होऊन अधिसुचित कंपन्याचे बाजारमूल्य ४३६ लाख कोटींवर पोहोचले आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचा तब्बल दोन लाख कोटींनी नफा वाढला असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market opening bell sensex and nifty jumps all time high investors gains kvg
Show comments